Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Niranjan Niranjan

Others


4  

Niranjan Niranjan

Others


मोठया मनाचा माणूस - अंतिम भाग

मोठया मनाचा माणूस - अंतिम भाग

9 mins 597 9 mins 597

भाग ११

डॉ. राजेंद्र भिडे आपल्या केबिन मध्ये बसले होते. थोड्याच वेळात ते एक ऑपरेशन करणार होते. आज मुंबई मध्ये त्यांचं स्वत:च एक हॉस्पीटल होतं. मुंबई, पुणे, बँगलोर सारख्या शहरांमध्ये त्यांचे कित्त्येक बंगले आणि जमिनी होत्या. नोकर चाकर सर्वकाही होते. तरीसुद्धा एकटेपणा त्यांना त्रस्त करत होता. वीस वर्षांपूर्वी घडलेल्या त्या दुर्दैवी घटनेमुळे त्यांचं आयुष्य बदललं होतं. हो हे तेच राजेंद्र भिडे जे नरसोबाच्या वाडीला दत्ताच्या दर्शनाला गेले असता त्यांचा एक वर्षाचा मुलगा हरवला आणि परत मिळालाच नाही. तेव्हा डॉक्टर आणि त्यांची पत्नी सरिता भिडे या दोघांनाही नैराश्याने ग्रासलं. डॉक्टरांनी कसं बसं स्वतःला सावरलं पण सरिता भिडे मात्र नैराश्यातून बाहेर येऊ शकल्या नाहीत. जसे जसे दिवस जात होते तसे तसे त्यांचं मानसिक संतुलन बिघडत होतं. तशा त्या नीट वागायच्या पण मधूनच डॉ. राजेंद्रकडे जाऊन “मला माझा मुलगा पाहिजे, माझा मुलगा परत आणून द्या” असा हट्ट करायच्या. एखाद्या लहान मुलाप्रमाणे हट्ट करायच्या. अख्खं घर डोक्यावर घ्यायच्या. रस्त्यावर एखादं लहान मुल दिसताच जणू आपलंच मुल असल्याप्रमाणे कडेवर घ्यायच्या. बायकोच्या अशा या वागण्यामुळे डॉक्टरांना खूपच त्रास होत होता. मानसोपचार तज्ञाचे उपचार चालू होते. पण त्याचा फारसा परिणाम सरितावर होताना दिसत नव्हता. शेवटी सरिताला मेंटल हॉस्पिटल मध्ये भरती केलं गेलं. डॉ. राजेंद्रना फार वाईट वाटत होतं. आधीच त्यांनी मुलालाही गमावलं होतं आणि आता बायकोही दूर गेली. त्यांना आता खूप एकटं एकटं वाटत होतं. आता ते स्वतःचं मन कामात रमवत होते. दिवसातले सोळा तास ते कामात व्यस्त असत. एक प्रथीतयश सर्जन असा त्यांचा लौकीक पूर्ण मुंबईत झाला होता. हॉस्पिटलची नोकरी सोडून त्यांनी स्वतःचं हॉस्पिटल काढायचं ठरवलं. स्वतःच्या मुलाचं नाव त्यांनी हॉस्पिटलला दिलं, अमर्त्य हॉस्पिटल. थोड्याच वर्षात अमर्त्य हॉस्पिटल मुंबईतल्या टॉप हॉस्पिटल पैकी एक बनलं. डॉक्टर अधूनमधून मेंटल हॉस्पिटलमध्ये जाऊन सरिताला भेटत असत. अजूनही तिच्या वागण्यात काही बदल झाला नव्हता. अमर्त्यची आठवण आली की ती त्याचे जुने फोटो पाहत असे. आपला मुलगा परत कधीतरी आपल्याला भेटेल अशी वेडी आशा त्यांना अजूनही होती. आज तब्बल वीस वर्षानंतर त्यांचं वय जरी पन्नासच्या आसपास असलं तरी ते साठच्या पुढचे वाटत. आता त्यांच्या डोक्यावर थोडेच केस उरले होते. तेही पांढरे झाले होते. चेहऱ्यावर सुरकुत्या दिसत होत्या.

डॉक्टरांनी ऑपरेशनची तयारी केली आणि ऑपरेशनरूम कडे निघाले. तब्बल तीन तास ऑपरेशन चाललं. ऑपरेशन संपून ते परत केबिनमध्ये आले व त्यांनी कंपाउंडरला विचारले, “कुणाचा फोन वगैरे आला होता का?” “जी सर, इन्स्पेक्टर मुजुमदारांचा आला होता.” “काय म्हणाला विकास?” “अर्जंट काम आहे असं म्हणाले.” “ठीक आहे. तू जा” एवढे बोलून त्यांनी मुजुमदारांना फोन लावला. इन्स्पेक्टर मुजुमदार आणि डॉ राजेंद्र अगदी शाळेपासूनचे मित्र. मुजुमदारांनी फोन उचलला. “डॉक्टर साहेब किती वेळा फोन केला तुम्हाला.” डॉक्टर म्हणाले, “साहेब कधीपासून म्हणायला लागला मला.” “बर बाबा राजूच म्हणीन.” “अरे तुझ्याकडे एक काम होतं. एका फॅक्टरीत काम करणाऱ्या कामगाराने एका गुन्हेगाराला जो त्याचाच सहकारी होता त्याला पकडून दिलंय. त्याचा सत्कार आम्ही करणार आहोत, तर त्याचा सत्कार तुझ्याहातून व्हावा अशी माझी इच्छा आहे आणि विशेष म्हणजे त्या कामगाराचे नाव सुद्धा राजूच आहे. त्यामुळे जर तू त्याचा सत्कार केला तर राजूचा सत्कार राजूच्या हातून होईल.” आपल्याकडून झालेल्या शाब्दीक कोटीचं डॉक्टरांनाही कौतुक वाटलं आणि ते हसले. “अरे मलाही आवडले असते पण पुढचा पूर्ण आठवडा मी खूप बिझी आहे” डॉ. राजेंद्र म्हणाले. “आपल्याला काही गडबड नाही. तुला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा सांग. त्या दिवशी आपण सत्कार समारंभ घेऊ.”

“ठीक आहे पुढच्या आठवड्यात बुधवारी मी फ्री आहे”. “बरं मग मी ती तारीख ठरवून टाकतो.” “चालेल फक्त एकदा मला आठवण कर.” एवढे बोलून डॉक्टरांनी फोन ठेवला आणि परत ते आपल्या कामाला लागले.

एकदाचा बुधवार उजाडला. मुजुमदारांनी सत्कार समारंभाची सगळी सोय अगदी चोख केली होती. समारंभ सुरु होण्याची वेळ झाली. व्यासपीठावर पोलीस कमिशनर, जिल्ह्याचे कलेक्टर, असिस्टंट कमिशनर तसेच महापालिकेतील काही माननीय व्यक्ती असे उच्च पदस्थ बसले होते. खाली मुंबई पोलीसचे इतर कर्मचारी तसेच काही सामान्य नागरिक बसले होते. पुढच्या रांगेत राजू, बबलू, बाळू तसेच इतर काही कामगार बसले होते. फॅक्टरीचा मालक प्रकाश ही तिथे होता. समोर काही पत्रकार हातात कॅमेरा घेऊन उभे होते. डॉक्टरांची खुर्ची अजूनही रिकामीच होती. थोड्याच वेळात डॉक्टरांची मर्सीडीज तिथे आली. गाडीतून डॉक्टर उतरले आणि थेट व्यासपीठावर आले. व्यासपीठावरील मान्यवरांसोबत हस्तांदोलन करून ते आपल्या जागेवर बसले. इन्स्पेक्टर मुजुमदार व्यासपीठावरच उभे होते. ते आता माईकवरून बोलू लागले, “आदरणीय कलेक्टर साहेब जगदीश मेहंदळे, मुख्य पोलीस निरीक्षक जयसिंघ यादव, अमर्त्य हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉक्टर राजेंद्र भिडे साहेब यांनी त्यांच्या कामातून वेळ काढून आजच्या कार्यक्रमाला उपस्थिती दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. तसेच इतर मान्यवरांचे ही आभार. तर आज आपण इथे अशा एका व्यक्तीच्या सन्मानासाठी जमलो आहोत, ज्याच्या चाणाक्ष बुद्धीमुळे आणि त्याने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे आज आम्हाला एका अतिशय धोकादायक गुन्हेगाराला पकडण्यात यश आले. राजूने जी कामगिरी केली ती खरच अविस्मरणीय आहे. पोलीस खात्याला राजूसारख्या धाडसी तरुणांची गरज आहे. त्याच्या या कामगिरीबद्दल सगळ्या पोलीस डिपार्टमेंटच्या वतीने त्याचे आभार मानतो आणि त्याला स्टेजवर येण्याची विनंती करतो.”

राजू उठला आणि स्टेजवर आला. तो खूप खुश होता, पण थोडासा संकोच त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता. एवढ्या लोकांसमोर बोलण्याची त्याची पहिलीच वेळ होती.

इन्स्पेक्टर मुजुमदार पुढे बोलू लागले, “डॉक्टर राजेंद्र भिडे साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन राजूचा सत्कार करावा.” डॉक्टर उठले. डॉक्टरांनी आधी नारळ आणि नंतर पुष्पगुच्छ राजूच्या हाती दिला. राजूने नारळ आणि पुष्पगुच्छ समोरच्या टेबलावर ठेवला आणि खाली वाकून डॉक्टरांच्या पाया पडल्या. त्याने टेबलावरचे नारळ व पुष्पगुच्छ उचलले व तो पाठमोरा झाला. डॉक्टरांनी त्याच्याकडे पाहिले आणि एखादी हरवलेली गोष्ट परत मिळाल्यासारखा त्यांचा चेहरा प्रफुल्लित झाला. डॉक्टर घरी आले. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक आली होती. त्यांच्या घरातील गडी माणसांना आणि नोकरांनाही हा त्यांच्यात झालेला बदल दिसत होता. त्यांनी कित्येक दिवसांनंतर डॉक्टरांना असं हसताना पाहिलं होतं. घरी येताच ते थेट आपल्या खोलीत गेले. त्यांनी जुन्या फोटोचे अल्बम काढले आणि अमर्त्यचे फोटो पाहू लागले आणि एका फोटोवर डॉक्टरांची नजर स्थिरावली. त्या फोटोत सरिताने अमर्त्यला कडेवर घेतले होते. अमर्त्यच्या मानेवरच्या त्या ठळक उठावदार तीळाने त्यांचे लक्ष वेधून घेतले. तसाच तीळ त्यांना राजू पाया पडत असताना त्याच्या मानेवर दिसला होता. राजूच्या मानेवर उजव्या बाजूला थोडसं खाली तीळ होता अगदी तसाच. जसा त्या फोटोत अमर्त्यच्या मानेवर दिसत होत. त्यांच्यातली आशा आता जागी झाली होती. जणू काही आपला हरवलेला मुलगा अमर्त्य परत मिळाल्याच्या आनंदात त्यांनी इन्स्पेक्टर मुजुमदारांना फोन लावला. इन्स्पेक्टरनी फोन उचलला आणि थोडं चिडून म्हणाले, “अरे राजू ही काय वेळ आहे का फोन करायची. रात्रीचे बारा वाजलेत, झोपू तरी दे मला.” “अरे, मला माझा मुलगा मिळालाय.” “काय बोलतोयस राजू? तुझं तुला तरी कळतंय का?” “अरे मी खरंच सांगतोय. माझा मुलगा म्हणजे राजूच ज्याचा मी आज सत्कार केला.” “डॉ राजेंद्र हे ऐकण्याची माझ्यात ताकद नाही आणि मला खूप झोप येतेय. हवंतर आपण उद्या बोलू. मी झोपतो आता.” “कृपा करून फोन नको ठेवूस. माझं ऐकून तरी घे.” “बर बोल बाबा”, मुजुमदार चिडलेल्या सुरात म्हणाले. डॉक्टर सांगू लागले, “काल जेव्हा मी राजूला नारळ व पुष्पगुच्छ दिला तेव्हा राजू माझ्या पाया पडला व जाण्यासाठी वळला तेव्हा मला त्याच्या मानेवरचा तीळ दिसला, अगदी तसाच तीळ अमर्त्यच्या मानेवर सुद्धा होता. तेवढंच नाही राजूचा चेहरा सुद्धा मला सरिताच्या चेहऱ्यासारखा वाटला आणि तू जर नीट पाहिलंस तर तुझ्यापण लक्ष्यात येईल की तो बऱ्यापैकी माझ्यासारखाच चालतो.” “मुलाच्या विरहामुळे तुला धक्का बसलाय आणि इतकी वर्ष होऊन देखील तू अजून या धक्क्यातून सावरलेला नाहीस, म्हणून तुला असे भास होतात.” “भास नाही मी खरच पाहिलाय राजूच्या मानेवर तीळ. डीएनए टेस्ट करायला देखील मी तयार आहे.” “आतापर्यंत तू चार मुलांच्या डीएनए टेस्ट करायला लावल्यास आणि चारीही चुकीचे निघाले. तुझ्या पदाला, तुझ्या सारख्या सर्जनला असं वागणं शोभत नाही. काढून टाक हा विचार मनातून.” “कृपा करून असं बोलू नकोस. बापाचं मन आहे माझं, ही शेवटची संधी दे मला. मला खात्री आहे यावेळी टेस्टचा रिझल्ट पॅासीटीव्ह येईल.” “बरं. तू काही ऐकायचा नाहीस. मी आधी राजूची चौकशी करतो. आपल्याला डीएनए टेस्टसाठी राजूचीही परवानगी घ्यावी लागेल. मग आपण टेस्ट करू. आतातरी झालं का तुझं समाधान?” “हो रे बाबा झालं माझं समाधान. पण जे काही आहे ते लवकरच कळव मला म्हणजे झालं.” एवढं बोलून डॉक्टरांनी फोन ठेवला. आता त्यांना शांत झोप लागली.

दुसऱ्या दिवशी इन्स्पेक्टर मुजुमदारांनी राजूला पोलीस स्टेशन मध्ये बोलावलं. राजू थोड्याच वेळात स्टेशनमध्ये हजर झाला. आपल्याला इन्स्पेक्टर साहेबांनी का बोलावलं हे राजूला कळत नव्हतं. मुजुमदार राजूला म्हणाले, “मला तुझ्याकडून काही माहिती हवी आहे.” “विचारा ना साहेब” राजू म्हणाला. “तुझ्या आई वडीलांच नाव काय?” राजू म्हणाला, “आईच नाव रखमा आणि वडीलांचं नाव राम्या. पण आता ते दोघेही नाहीत. आई काही वर्षांपूर्वी वारली आणि वडील मी लहान असतानाच वारले.” “तू लहान असताना तुम्ही कुठे राहायचा आणि तुझे आईवडील काय काम करायचे?” मुजुमदारांनी विचारले. “आम्ही कोल्हापूरच्या जवळच शिंगणापूर नावाच्या गावात झोपडपट्टीत राहायचो. माझे आईवडील आधी देशी दारूच्या दुकानात काम करायचे. सगळं व्यवस्थित चालू असताना एका गुंडाने माझ्या बापाचा खून केला. माझ्या आईने पुढचे काही दिवस दारूच्या दुकानातच काम केलं पण तिथे तिचं मन रमेना शेवटी तिने भिक मागण्याचा निर्णय घेतला. ती रोज अंबाबाईच्या देवळाबाहेर बसून भिक मागायची. थोडे दिवस मी पण तिच्या बरोबर जायचो. पण काही दिवसातच तिने मला शाळेत घातले. खूप कष्टानं तिने मला वाढवलंय.” राजूच्या डोळ्यात पाणी होतं.

इन्स्पेक्टर मुजुमदारांनी सगळं ऐकून घेतलं. थोडा वेळ शांततेत गेला. आता मुजुमदार राजूला म्हणाले, “जर तुला कोणी सांगितलं रखमा आणि रामू तुझे खरे आईवडील नाहीत तर तुला काय वाटेल?” राजू ताडकन खुर्चीवरून उठला आणि म्हणाला, “तुम्ही हे काय बोलताय इन्स्पेक्टर साहेब?” “आधी तू शांत हो. तुला सगळं सांगतो.” इन्स्पेक्टर मुजुमदार शांतपणे राजूला म्हणाले. राजू खाली बसला. मुजुमदार बोलू लागले, “काल रात्री मला डॉ राजेंद्र भिडेंचा फोन आला होता. त्याचं असं म्हणणं आहे की तू त्यांचा मुलगा आहेस.” राजूचा आपल्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. तो म्हणाला, “हे कसं काय शक्य आहे? रखमा आणि रामूच माझे आईवडील आहेत.” “मला माहित आहे तुझा यावर विश्वास बसणं अवघड आहे. पण मी तुला डॉक्टरांची गोष्ट सांगतो.” राजू ऐकत होता. मुजुमदार पुढे बोलू लागले. त्यांनी डॉक्टरांना कसं मुल होत नव्हतं, मुल होण्यासाठी केलेला नवस, मुल झाल्यावर नवस फेडण्यासाठी बाळाला घेऊन नरसोबाच्या वाडीला आले, तेव्हा त्यांचं बाळ हरवलं तिथपासून काल डॉक्टरांनी त्याच्या मानेवरचा तीळ पाहिला व कसा त्यांच्या बाळाच्या मानेवरचा तीळ तसाच होता हे सगळं मुजुमदारांनी राजूला सांगितलं. तसेच डॉक्टरांची डीएनए टेस्ट करायची इच्छा आहे, हे देखील सांगितलं. राजू हे सगळ ऐकून सुन्न झाला होता. त्याला काहीच सुचत नव्हतं. साहेब मला थोडा वेळ द्या एवढं बोलून राजू तिथून निघाला.

राजू खोलीवर पोहचला. त्याला मोठं कोडं पडलं होतं. जर मी रखमा आणि रामूचा मुलगा नाही तर मी लहानपणापासून त्यांच्या घरात कसा वाढलो? रखमाने स्वतः भिक मागून आपल्याला वाढवलं. आपल्याला कशाचीच कमी पडू दिली नाही. मग ती आपली आई नाही हे कसं शक्य आहे. आपल्या मानेवर जसा तीळ आहे तसाच तीळ डॉक्टरांच्या बाळाच्या मानेवर होता. पण कित्येक लोकांच्या मानेवर तीळ असतो. पण एवढे मोठे डॉक्टर साहेब उगाच कशाला असं म्हणतील. कदाचित त्यांच्या मुलाच्या विरहामुळे त्यांच्या मनावर परिणाम झाला असेल. अशा अनेक विचारांनी त्याच्या मनात काहूर माजलं होतं. पण शेवटी त्याने डीएनए टेस्ट करण्याचा निर्णय घेतला. राजूने मुजुमदारांना डीएनए टेस्ट करण्याचा निर्णय कळवला.

राजूशी झालेलं बोलणं मुजुमदारांनी डॉक्टरांना सांगितलं होतं. तसेच तो डीएनए टेस्ट करण्यासाठी तयार असल्याचं सांगितलं. डॉक्टर खूप खुश झाले. डॉक्टरांचं बाळ नरसोबाच्या वाडीलाच हरवलं होतं व राजूने सांगितल्याप्रमाणे तो लहानपणी कोल्हापुरलाच राहायचा. कोल्हापूर नरसोबाच्या वाडीपासून फार लांब नाही. त्यामुळे डॉक्टरांचा विश्वास जास्तीच दृढ झाला होता.

डीएनए टेस्ट झाली. रिपोर्ट पॅासीटीव्ह आले होते. डॉक्टर राजेंद्र भिडे आणि राजू म्हणजेच अमर्त्य त्यावेळी मुजुमदारांच्या केबिन मध्ये होते. डीएनए टेस्ट अचूक आलीये हे कळताच डॉक्टरांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. ते आता केवळ उभे राहून नाचायचे बाकी होते. राजू मात्र अजूनही आपल्या विचारातच गुंतला होता. रखमा आणि रामू आपले खरे आईवडील नाही ही गोष्ट त्याला सहन होत नव्हती. थोड्या वेळाने डॉक्टर भानावर आले. केवळ आपल्या निष्काळजीपणामुळे राजू आपल्यापासून दुरावला हे त्यांच्या लक्षात आलं होतं. डॉक्टरांची मुद्रा आता गंभीर झाली होती. ते राजूकडे पाहून म्हणाले, “केवळ माझ्या निष्काळजीपणामुळे तुला खूप भोगायला लागलं, खरंतर मी तुझा गुन्हेगार आहे. मला माफ कर बाळा”. डॉक्टर राजू समोर हात जोडून उभे होते. थोड्यावेळाने राजू बोलू लागला, “तुम्ही माफी मागायची काही आवश्यकता नाही. खरंतर तुमच्या निष्काळजीपणामुळेच मला गरिबी अनुभवता आली. गरिबी किती भयानक गोष्ट आहे हे मला समजलं.” “मग मला तुझा वडील म्हणून स्विकार करशील?” या प्रश्नाचं राजू काय आणि कसं उत्तर देतो हे पाहण्यासाठी मुजुमदारही उत्सुक होते. “माझी एक अट आहे” राजू म्हणाला. “बोल, तुझी एक काय हजार अटी मान्य आहेत मला.” “जर तुम्ही तुमच्या संपत्तीतील ९० टक्के भाग गोरगरिबांसाठी खर्च करण्यास तयार असाल तर मी तुमचा वडील म्हणून स्विकार करेन” हे ऐकून डॉक्टरांनी राजूला एकदम मिठी मारली. इतक्या मोठ्या मनाचा मुलगा आपल्याला दिल्याबद्दल त्यांनी मनोमन देवाचे आभार मानले. थोडयावेळात भावनावेग ओसरला. “चल आता आपण तुझ्या आईला भेटूयात. कदाचित तुला तिची अवस्था पहावणार नाही. पण देवाच्या मनात असेल तर तुला पाहून ती कदाचित बरी देखील होईल.” डॉक्टर राजूला म्हणाले आणि ते तिथून निघाले. त्यांच्या पाठोपाठ राजूही निघाला. मुजुमदारांनी बाप लेकाच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहिले आणि ते गालातल्या गालात हसले. राजूची म्हणजेच अमर्त्यची चालायची पद्धत अगदी डॉक्टरांसारखीच होती.Rate this content
Log in