Shital Thombare

Others

3  

Shital Thombare

Others

मला ती गवसली

मला ती गवसली

6 mins
452


निशू दहा वर्षांची अल्लड मुलगी. दुनियादारीची अजून समजही नसलेली. आई ममता गृहिणी तर वडिल सुरेश एका कारखान्यात मोठ्या हुद्द्यावर कामाला. एक त्रिकोणी सुखी कुटुंब.पण या सुखी कुटुंबाला काळाची नजर लागली. निशू ची आई कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराला बळी पडली. अनेक डॉक्टर केले. पण उपयोग काही झाला नाही. निशू च्या आईला मृत्यु पेक्षा आपल्या इवल्याशा लेकीचं कसं होईल ही काळजी अधिक त्रास देत होती. आजारापेक्षा या काळजीनेच तिला मृत्युच्या अधिक जवळ नेलं.सहा महिने या आजाराशी लढत अखेर तीची प्राणज्योत मालवली. निशूच्या डोक्यावरच मायेचं छत्र हरपलं. सुरेश चे आईवडील गावी शेती पाहत होते सुरेशने निशू साठी त्यांना आपल्या जवळ रहायला बोलावले. पण शेतीच्या कामामुळे त्यांना शक्य झालं नाही. शेवटी ममताची आई निशू ची आजी निशूच्या देखरेखीसाठी सुरेश अन निशू सोबत रहायला आली. आजी अन निशूची तशी आधी पासूनच गट्टी होती त्यामुळे आजी आल्यावर सुरेशची निशू बद्दलची काळजी थोडी कमी झाली. ममताच्या आईने आपल्या जावयाला म्हटले," तुम्ही निशू ची काही काळजी करु नका तुमच्या कामावर लक्ष द्या. माझ्या ममता ची निशाणी आहे ती जिवापलिकडे जपेन तिला. तुम्ही अगदी निश्चिंत रहा." "आई खरच देवासारख्या धावून आलात तुम्ही. मला खरंच निशूची फार काळजी लागून राहिलेली. मी आता निवांतपणे माझं काम करु शकेन. तुमचे खूप उपकार झाले " त्या दिवसापासून सुरेश निश्चिंत झाला की आपण निशू ची उत्तम सोय केली आहे. आता तिला ममता ची उणीव भासणार नाही. काही दिवस छान गेले.पण हळूहळू निशूचं अभ्यासावरच लक्ष उडालं. ती एकटीच उदास बसू लागली. मित्रमैत्रिणींची सोबत तिने सोडून दिली. शाळेतून तिच्या बद्दल तक्रारी येऊ लागल्या तिचा अभ्यास घसरला.परिक्षेत मार्क्स कमी पडू लागले. सुरेशला समजेना निशूला अचानक झालयं काय?? सरेशच्या एका जवळच्या मित्राने त्याला सल्ला दिला. " सुरेश तू लग्न कर. तुला बायकोची आणि निशू ला आईची गरज आहे" "नाही रे मला नाही वाटत लग्न करून हा प्रश्न मिटेल.मुळात मला निशू साठी सावत्र आई नकोच आहे. आणि माझ म्हणशील तर ममताची जागा मी कोणालाच नाही देऊ शकत" "सुरेश तुझ्या भावना समजू शकतो मी अरे! पण तुला नसली तरी निशूला आईची गरज आहे कोवळ वय आहे रे तिच तिला समजून घेणारं असं कोणी हवं तिच्या आयुष्यात आताच जर तिला मातृत्वाच सुख मिळाल तरच ही कळी उमलेल रे नाही... तर उमलण्याआधीच कोमेजून जाईल " सुरेशने खूप विचार केला.सरतेशेवटी निशूच्या भवितव्यासाठी त्याने लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण लग्न करण्यासाठी सुरेश ने नवरयामुलिसाठी एक अट ठेवली.लग्नानंतर निशूलाच आपलं मूलं मानायचंं.स्वत: च्या मुलाची अपेक्षा ठेवायची नाही. या अश्या विचित्र अटीमुळे एकही मुलगी सुरेशशी लग्न करायला तयार होईना.

अचानक एक दिवस सुरेशच्या मामेभावाचा रितेशचा फोन आला. त्याला कुठून तरी सुरेशच्या लग्नाची अन त्याच्या विचित्र अटिची कुनकुन लागली. " सुरेश तू लग्न करतो आहेस अस समजलं. अगदी योग्य निर्णय घेतला आहेस तू. माझ्या कडे तुझ्या साठी एक उत्तम स्थळ आहे". "रितेश स्थळाच ठिक आहे पण तुला माझी अट माहित आहे न.ती अट जर मुलीला मान्य असेल तरच पुढचं बोलणं करुयात अन्यथा हा विषय इथेच थांबव." "काही काळजी करु नकोस सुरेश मी मुलीला आधीच सर्व कल्पना दिली आहे आणि तिला सर्व मान्य आहे. पण मला तुला मुली बद्दल काही सांगायचयं. ते ऐकून तू लग्नाला तयार होशील की नाही माहित नाही. मी फक्त कोणालाही अंधारात ठेवणार नाही ना तिला ना तुला." "अरे ! बोल ना रितेश सत्य समजल्याशिवाय मी ही हे लग्न करणार नाही" ऐक तर ...मुलीचं नाव माया आहे. माझ्या बायकोची चुलत बहिण ती. आई वडिल शेतकरी आणि घरी तिच्या पाठीवर फक्त एक लहान भाऊ. शिक्षण जेमतेम सातवी झालयं. बाकी घरकामात मुलगी फार हुशार अगदी शेतीची कामे करण्यातही तरबेज. वयात आली अन आईवडिलांनी लग्न ठरवलं.पण लग्नाच्या आदल्या दिवशी नवरया मुलाचे वडिल देवाघरी गेले. मुलाकडच्या मंडळींनी सारं खापर मायावर फोडलं. अपशकुनी ठरवून लग्न मोडलं. त्यानंतर मात्र अपशकुनी पणाचा शिक्काच बसला तिच्यावर तेव्हापासून तिच्याशी लग्न करायला कोणी मुलगा तयार होईना. खर तर मुलगी खूप चांगली आहे. मी तिला तुझी अट सांगितली अन ती एका क्षणात या लग्नाला तयार झाली. आता तू ठरव लग्न करायचं की नाही मी तिचा फोटो तुला पाठवतो. मी फोर्स करणार नाही. अंतीम निर्णय तुझाच असेल." सुरेश ने फोटो न पाहताच लग्नाला होकार दिला अन रितेशला म्हणाला,"या सगळ्या अंधश्रद्धा आहेत मी त्यावर विश्वास ठेवत नाही." कोर्टात चार लोकांच्या उपस्थितीत सुरेश अन मायाचा विवाह पार पडला. सावळा रंग नाकी डोळी नीटस माया अंगावरच्या कांजीवरम साडीत अधिकच खुलून दिसत होती. साधेपणा कपड्यातच नाही तर स्वभावातूनही दिसत होता. इकडे ममताच्या आईला मात्र हा विवाह मान्य नव्हता. आपल्या लेकीची जागा अन्य कोणी घ्यावी हे त्यांना पटत नव्हतं. म्हणूनच अगदी पहिल्या दिवसापासून त्यांनी निशूला तिच्या सावत्र आई बद्दल पढवायला सुरुवात केली. सावत्र आई कित्ती वाईट असते. लहान मुलांचा कसा छळ करते. तुझी ही नवी आई सुद्धा तुझा छळ करणार. अजून काय काय त्यांनी इवल्याश्या निशूच्या मनात भरवले. पहिल्या दिवसापासूनच निशू आपल्या नव्या आईचा द्वेष करू लागली. आपल्या आईची जागा घेणारी माया तिच्या साठी एखाद्या चित्रपटातील सावत्र आई वाटू लागली.

खरेतर माया नावाप्रमाणेच मायाळू होती.पण ममताच्या आईने निशूच्या मनात माया बद्दल इतकी कटुता निर्माण केली होती की निशू ला आपल्या नव्या आईचे प्रेम दिसतच नव्हते. माया आपल्या परिने निशूचं मन जिंकण्याचा प्रयत्न करित होती. पण तिने याबद्दल एक अक्षर ही सुरेशला सांगितले नाही. पण घरातील परिस्थिती सुरेशच्या नजरेतून सुटली नाही. सुरेशची डोकेदुखी कमी होण्यापेक्षा अधिकच वाढली. करायला गेलो एक अन झाल भलतच असा विचार त्याच्या मनात आला.

ममताच्या आईची गावी जमीन होती आणि भाऊबंदकिच्या वादात अडकली होती.कोर्टाच काम होतं म्हणून ती सुरेशला आपल्या सोबत घेऊन गेली. कामासाठी आठ दिवस तरी लागतील.निशूची शाळा बुडू नये म्हणून तिला माया जवळ ठेवण्यात आलं. निशूची मुळीच इच्छा नव्हती. आपल्या सावत्र आइसोबत राहण्याची पण नाईलाजास्तव तिला रहावं लागलं. त्याच काळात चीनमध्ये कोरोना नावाच्या एका भयानक विषाणू ने जगभर मृत्युचं तांडव सुरु केलं.त्याची झळ भारतालाही जाणवू लागली. पंतप्रधानांनी एकवीस दिवसांच्या लॉक डाऊन ची घोषणा केली. सुरेश अन ममताची आई गावी अडकले. इकडे निशू आपल्या सावत्र आई सोबत घरात बंद झाली.ना मैत्रिणी ना शाळा ना खेळने सारे काही बंद झाले. निशू सोबत वेळ घालवायची ही जणू काही देवानेच आपल्याला संधी दिली आहे अस मानून तिच मन जिंकण्यासाठी प्रयत्न सुरु केले. निशू ने दोन दिवस तर टिव्ही पाहिला.पण तिला त्याचाही कंटाळा येऊ लागला.घरात बसून तिला काय करावे काही सुचेना. तेव्हा माया पुढे सरसावली गावी लहानपणी खेळलेले सारे खेळ ती निशू सोबत खेळू लागली. सुरुवातीला निशूला माया सोबत खेळने आवडत नसे पण हळूहळू माया ने दाखवलेले खेळ खेळताना तिलाही मजा येऊ लागली. निशू अन माया घरातल्या घरात सापशिडी, सागरगोटे,चल्लस आठ, क्यरम, पत्ते असे अनेक खेळ खेळू लागल्या. माया ने निशूला अगदी सुईत दोरा कसा ओवायचा, साधे टाके कसे टाकायचे, बटण लावणे, चहा बनवणे, कपड्यांच्या घड्या घालणे अनेक छोट्या मोठ्या गोष्टी शिकवल्या. हे सगळं करताना निशूलाही मजा येऊ लागली. तीला दिवस कधी सुरु होतो असं होऊन जाई अन तो दिवस संपूच नये असे वाटे. एक दिवस निशूच्या मैत्रिणीचा फोन आला. " निशू यार जाम बोअर झालेय गं मी कधी या सुट्ट्या संपणार? आणि आपण खेळायला जाणारं तुला नाही का आला कंटाळा" " मुळीच नाही ग उलट पहिल्यांदा मी माझ्या सुट्ट्या इतक्या एन्जॉय करतेय" "एन्जॉय !!! निशू तुला वेड तर नाही लागले. आम्ही सगळे फ्रेंडस या सुट्टी ला कंटाळलोय तू कशी काय एन्जॉय करु शकतेस" "अगं माझी ही सावत्र आई आहे न ती मला रोज काही ना काही शिकवत असते. त्यात माझा वेळ कसा जातो समजतच नाही." "निशू तू खरच खूप लकी आहेस गं तुझी सावत्र आई असुनही किती काळजी घेते तुझी. नाही तर माझी मम्मा घरी असुनही वर्क फ्रॉम होम करतेय.माझ्यासाठी तिच्याकडे वेळच नाही.काश तुझी मम्मा माझी मम्मा असती. तर माझ्या सुट्ट्या ही मी एन्जॉय करु शकले असते." निशूला तीची चूक लक्षात आली. जीला सावत्र आई म्हणून तिचा नेहमी द्वेष करत आले. ती मला किती जीव लावते आहे या काही दिवसात माया ने निशू साठी जे काही केलं ते खरच कौतुकास्पद होतं. आज निशू ला आपली नवी आई उमगली. निशूने मायाला आज पहिल्यांदाच आई म्हणून हाक मारली. निशूच्या या हाकेने माया ही सुखावली. आज खरया अर्थाने माया लेकिंची भेट झाली. दोघीही मायेच्या ओलाव्यात न्हाऊन निघाल्या. लॉक डाऊन मुळे देश जरी बंद झाला असला तरी निशू अन मायाच नातं त्यानिमित्ताने सुरु झालं..... एका मुलीला आपली आई उमगली...अन गवसली.... ( कथा आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा पण लेखिकेच्या नावासहित)


Rate this content
Log in