मला परत एकदा लग्न करायचय..!!!
मला परत एकदा लग्न करायचय..!!!
लग्न ही अशी गोष्ट आहे जी प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एकदाच होते... त्यामुळे आपले लग्न स्पेशल कसे होईल या साठी सर्वच जण प्रयत्न करत असतात... छोटे खानी करायचे की राजेशाही हा प्रत्येकाचा वैयक्तीक प्रश्न आहे... पण, तरीही आपल्या आयुष्यात येणारा हा लग्न नावाचा विधी आपण खूप एन्जॉय करतो कारण तो आपल्या साठी खूप स्पेशल असतो.... आज मॉम्सप्रेसो ने हा विषय दिला आणि मला माझ्या लग्नाची आठवण झाली... खरच जर भूतकाळ बदलता आला तर... मला माझ्या लग्नाच्या आठवणी बदलायला आवडतील...
आमच्या घरातले नवीन पिढीतले माझे पहिलेच लग्न... आता पहिले म्हटलं की सर्वांचा उत्साह कसा आणि किती असतो हे मी तुम्हाला सांगायला नको नाही का?? अगदी असेच होते माझ्या बाबतीत सुद्धा... मग् तुम्ही म्हणाल का हिला आठवणी नको आहेत त्या हि लग्नाच्या?? नवरा चांगला नाही की सासरचे? तर तसे सुद्धा काही नाही बरं का... नवरा म्हणजे माझा मित्र असल्यासारखा अन सासरबद्दल काय बोलू, " सासर माझे खूप भाग्याचे आहे ...!!!" आता तुम्हाला सांगते ती कडू आठवण... ज्यामुळे मला ती बदलावीशी वाटते...
आमचे लग्न ठरले तेव्हा पावसाळा होता... त्यामुळे डिसेंबरची तारीख काढण्यात आली...चांगले पाच-सहा महिने होते तयारीला त्यामुळे जोरात तयारी सुरू होती... घरातल्या सर्वांची, छोट्या भाऊ-बहींणींची तर धमाल...!! असे करायचे, तसे करायचे, काय घालायचे? फटाके किती फोडायचे? डीजे आणायचा... बाप रे काही विचारू नका... सगळ्यांच्या आनंदाला उधाण आले होते... लग्नाला वेळ असला तरी साखरपुडा लगेचच करायचा ठरला... त्याला सुद्धा सर्वांची उपस्थिती एवढी होती की सगळ्यांचा आनंद, जोश दिसुन येत होता....
लग्नाची तारीख जशी जवळ येतं होती तसे, खरेदी, पत्रिका, आमंत्रणं, आचारी, मंडपवाले, फोटोग्राफर, ... सर्व चर्चांना उधाण आले होते... प्रत्येक चर्चेत लहान-मोठे सर्वच उत्साहाने भाग घेत होते...
आमच्याकडे सासू पापड करायची पद्धत आहे... पापड पूर्ण न सुकवता थोडे ओले असतानाच त्यावर खाण्याचा रंग किंवा गुंजा वापरून सासरकडच्या सर्व माणसांची नावे लिहिली जातात... माझ्या सर्व काकू, माझी आजी नसली तरी माझ्यावर आजीची माया करणाऱ्या माझ्या काकू आजी म्हणजेच माझ्या बाबांच्या काकू सगळ्यांनी एकत्र येऊन हे पापड केले... माझी सर्वात मोठी काकू आजी तर गाणे म्हणत म्हणत पापड करत होती... खुप छान वाट्त होते आता लग्नाला फ़क्त १५-१६ दिवस होते... बाहेर गावची आमंत्रण होत आली होती... गावातलीच राहिली होती...
पण या सगळ्याला दॄष्ट लागावी असेच झाले... अन लग्नाला फ़क्त १३ दिवस असताना माझी मोठी काकू आजी गेली... आता काय करायचे? लग्न कसे होणाऱ? पुढे ढकलावे तर एवढ्या कमी दिवसात झालेल्या आमंत्रणाना निरोप कसा मिळणार?? आणि सूतकाच्या घरात लग्नाचे विधी कसे होणाऱ?? आई- बाबा यांना तर सूतक पाळायला हवे... काहीच सुचत नव्हते... सगळीकडून नको असलेल्या चर्चांना उधाण आले होते... सर्व जण उपदेश करत होते... पण मदतीचा हात कॊणी पुढे करायला तयार नाही....
लग्न होणाऱ नाही आता... पुढे ढकला एक व्यक्ती अगदी मोठ्या आवाजात बोलून गेली... माझ्या बाबांचे डोळे पाण्याने भरले... मुलीकडची बाजू... सासरची माणसे जरी चांगली असली तरी... कोणत्या तोंडाने बोलू??दोन्ही कुटुंबातले आम्ही दोघे ज्येष्ठ त्यामुळे घरातील पहिले- वहिलं लग्न म्हणून दोन्ही कडून मिळून १५०० पत्रिका वाटून झाल्या होत्या तर काही बाकी होत्या.... एवढ्या सर्वांना कसे सांगणार...?? तरी माझ्या बाबांनी त्या व्यक्तीला तिथेच मोठ्या आवाजात सांगितलं... लग्न ठरल्या दिवशी, ठरल्या वेळी होईल... हे मात्र नक्की....!!
लोकं मागून वाटेल तें बोलत होते... काही तर राहिलेल्या पत्रिका वाटायला ज्या व्यक्तीला पाठवले तिला उपहासाने बोलत होते... लग्न होणाऱ आहे ना...?
ज्याच्यावर प्रसंग येतो ना त्याला समजते.... पण आम्ही त्या वेळेस शांत राहणे पसंत केले... माझे मामा-मावशी मला त्यांच्या गावी घेऊन गेले... आता कसलाच उत्साह नव्हता... सगळ्यांना फक्त एकच टेन्शन होते यातून मार्ग कसा काढायचा??? बोलणारे दोन्ही बाजूने बोलत होते... नात्यात उगाच क्लीष्टता वाढवत होते...
प्रत्येकजण वेगवेगळे मत मांडत होता... आमच्यामधली वयाने मोठी असलेली एक व्यक्ती सहज बोलून गेली... मामा लोकांना करायला सांगा सर्व... बोलणे किती सोपे असते... आपल्या मुलीच्या लग्नाला आपण जाऊ शकत नाही... असा विचार सुद्धा कोणते आई-वडील करू शकतील का?? आणि ८ दिवसात सर्व तयारी मामा लोकं तरी कशी करतील?? पण त्या क्षणी मात्र सर्वांना माझे लग्न पुढे जावे असेच वाटत होते... त्यावर पर्याय काढायला कोणीच तयार नव्हते.... खरच बोलण्याएवढे सोपं असते का सर्व?? याचा विचार बोलताना का कोणी करत नाही तेच कळंत नाही मला...
शेवटी अनेक ब्राम्हण लोकांशी चर्चा करून ठरले की, १० दिवसाचे सूतक काढले की माझ्या आई- बाबांनी त्या घरी जायचे नाही... आमच्याकडे येणारा ब्राम्हण तिकडे तें विधी करायला तिकडे गेल्यामुळे लग्नाचे आदल्या दिवशीचे विधी करायला लागणारा ब्राम्हण शोधण्यापासून आमची तयारी होती... मामा- मावशी, माझ्या सख्ख्या आत्या... आणि माझ्या सासरच्या सर्व मंडळींच्या सहकार्यामुळे लग्न अगदी ठरल्या दिवशी पार पडले... ज्या दिवशी लग्न लागले त्याच वेळेला तिकडे १३ व्याचा घडा देत होते... दुपारी १२:३० ची वेळ... कसे वाटते नाही विचार करूनच...!!!
माझ्यासाठी सगळ्यांनी किती उत्साह दाखवला तरी, काहीतरी कमी होते... आणि ही कडू आठवण लग्नाचा वाढदिवस आला की, नाहीतर मग् बाकीच्यांचे लग्न होताना परत जागी होते... आता दहा वर्षे झाली या गोष्टीला त्यामुळे नवीन असताना जेवढे वाटायचं तेवढे नाही वाईट वाटत... पण तरीही ही आठवण बदलावी असे वाटते मला...
माझे मन या आठवणीने दुःखी झाले की माझे मिस्टर म्हणतात, मुले थोडी मोठी झाली की.. सर्व विधी परत करू अन आपण परत लग्न करू.... मग् माझ्या चेहेऱ्यावर गोड हसू येते...आम्ही परत एकदा लग्न करू की नाही माहीत नाही... पण त्यांच्या अशा बोलण्याने या कडू आठवणींचा विसर पडतो... काही वाईट झाले तर त्यातून पुढे नक्कीच चांगले होते... असा अनुभव मात्र मला नक्की आला आहे.... माझ्या प्रत्येक कलागुणाला वाव देणारा नवरा आणि सासर मिळाले मला हे मात्र खरे....!!!
