माझी ओळखहाच माझा दागिना २
माझी ओळखहाच माझा दागिना २


मागच्या भागात आपण पाहिले कसा जोरात महिला दिन साजरा करतायत सहजीवन सोसायटी मधील बायका..... पहिला कार्यक्रम झाला सायकल आणि बाईकचा. आता दुसरा कार्यक्रम होता पाककला, रांगोळी आणि चित्रकला. इथेसुद्धा देशमुख मॅडमनी सर्वांना सांभाळून घेतले होते. जेणेकरून लहान मुलींपासून तेे सर्व आजीपर्यंत त्यांनी सर्वांना भाग घ्यायला लावला. 2 तास वेळ दिली होती आणि मग् सर्वांना जेवण... सर्व अगदी मन लावून करत होत्या. सावीला लहान असल्यापासून चित्र काढायला आवडत असे आणि स्वयंपाकपण... पण नियम होता... एक व्यक्ती जास्तीत जास्त २ स्पर्धांमध्ये भाग घेऊ शकते. पण वेळ वाढवून मिळणार नाही. पण वेगळे बक्षिस मात्र होते. त्यासाठी सावीने दोन्हीमध्ये भाग घेतला आणि अगदी छान स्पर्धा झाल्या. सुधाकाकूंनीसुद्धा पाककलांमध्ये भाग घेतला होता आणि नेमके दोघींचे टेबल एकच आले. मायलेकींनी कशीबशी वेळ सांभाळून नेली पण त्यांची सून अंकिता तिला काही हे पटत नव्हते. ती वाट बघत होती, कधी एकदा सावी तिला भेटते... तिने वाट बघितली आणि सर्व बायका जेवण करण्यासाठी गेल्यावर तिला बोलायला सुरुवात केली? तू का आलीस परत? एकदा आमची शोभा करून गेलीस ना मग आता परत काय आहे? तू मुद्दाम आलीस आम्हाला त्रास द्यायला....तू निघून जा या सोसायटीमधून...आणि हो आजसुद्धा पुढचा कार्यक्रम करायला थांबू नकोस... त्या कार्यक्रमामध्ये स्वतःची ओळख करून द्यायचे... आणि त्यातून ते निवडणार आहेत मिस आणि मिसेस ऑफ सहजीवन सोसायटी... तू येशील तेव्हा काय ओळख करून देशील गं? आमची इज्जत घालवायची आहे का परत? सगळ्यांना नाही माहिती तुझं नि आमचं नातं... आणि आम्हाला ते माहिती करून द्यायचे पण नाही... तुझी काय ओळख आहे गं... सावी काहीच बोलली नाही... तेवढ्यात देशमुख मॅडम आल्या आणि तिला जेवायला घेऊन गेल्या.
थोड्या वेळात हळदी कुंकूचा कार्यक्रम होता आणि मग निवडणार होते मिस आणि मिसेस ऑफ सहजीवन सोसायटी. सर्व बायका तयारी करायला गेल्या. तेवढ्यात परीक्षकांनी येऊन सर्व स्पर्धा बघितल्या आणि रिझल्ट देशमुख मॅडमकडे दिले आणि पुढच्या कार्यक्रमासाठी त्यासुद्धा तयारी करायला गेल्या. हळदी कुंकू म्हणून सर्व बायका अगदी नखशिखांत नटून आल्या. पायापासून डोक्यापर्यंत दागिने घालून... कॊणी नऊवारी, कॊणी पैठणी, कॊणी गुजराथी, तर कॊणी बेंगाॅली थीम करून फोटो काढत होत्या. सावी आली अगदी सिम्पल नारायण पेठ साडी... नाकात नथ... आणि गळ्यात मंगळसूत्र आणि बारीक ठुशी... तिला बघितलं आणि अंकिताला राग आला. तुला बोलले होते ना येऊ नको... का आलीस? आलीस ती आलीस परत ही अशी... खोटे दागिने मिळतात ते तरी घालायचं... पण सावी मात्र गप्प... ती नुसती हसली आणि म्हणाली, अगं वहिनी हळदी कुंकू आहे... त्याला कधी पाठ करू नये गं म्हणून आले... अंकिता कुत्सितपणे हसली आणि म्हणाली खरं आहे गरीब असला तरी नवरा आहे तुझा... सुधा काकू दागिने घेऊन आल्या आणि म्हणाल्या, हे घाल आणि आमची लाज राख. सावी म्हणाली, आई तू सुद्धा असे बोलतेस... नको मला...
पुढच्या कार्यक्रमाची सुरवात झाली. देशमुख मॅडम येऊन सावीला घेऊन गेल्या. पण सावी मात्र भूतकाळात गेली. बघू या काय आठवत असेल तिला? आणि कार्यक्रमाचे काय होते?... (क्रमशः)