Anuja Dhariya-Sheth

Others

3.5  

Anuja Dhariya-Sheth

Others

माझा शिक्षक होण्याचा प्रवास...

माझा शिक्षक होण्याचा प्रवास...

5 mins
278


माझे शिक्षण म्हणाल तर मी कॉम्पुटर इंजिनीरिंग करून मस्त विप्रो कंपनी मध्ये जॉब करत होते.. पण लग्न झाले आणि त्यानंतर लगेचच आलेली गुड न्युज या मुळे जॉब जो सुटला तो सुटलाच..


लग्न झाल्यावर वर्षातच काही वैयक्तीक कारणांमुळे पुणे सोडून गावी यावे लागले... आणि इकडे आल्यावर दोन मुले, जॉईंट फॅमिली यात एवढी अड़कुन गेले की जॉब, आपले शिक्षण ह्या साऱ्याचा विसर पडला... कधी एकांतात खूप जाणवत रहायच, मन उदास व्हायचं.. निर्णय चुकला की काय असे वाटायचं.. एवढा छान जॉब.. करिअर?? खुप त्रास व्हायचा..


पण खचून न जाता ठरवले की,जे होऊन गेले त्याचा विचार कशाला करायचा? आता काय करता येईल ते बघायला हवे... पण मुलगी लहान म्हणून गप्प होते.. घरचा मसाल्याचा बिझनेस आहे, पण नवरा, दीर , सासरे सगळे बघतात त्यामुळे त्यात माझी तेवढी काही गरज नव्हती... खुप चिडचिड व्हायची माझी.. खचून गेले होते मी.. काय उपयोग माझ्या शिक्षणाचा असे वाटायचं मला...


माझ्यामधली वर्कींग वुमेन मला गप्प बसू देत नव्हती.. आजू बाजूला असलेल्या शाळेत जाऊन आले कॉम्पुटर टीचर चा पार्ट टाइम जॉब असेल तरी चालेलं अशी माझी अवस्था झाली होती... पण मी राहते तें शहर खूप छोटे.. मिळणारा पगार इतका कमी सांगायचे की तो विषय तिथेच राहायचा...


पैसे हवे म्हणून जॉब हवा असे काही नव्हते तरी पण मोठा आकडा घ्यायची सवय असली की त्यापेक्षा कमी पगार...?? मन तयारच होत नव्हते... हे सगळं करताना दुसरी गोड बातमी आली मग् परत दोन वर्षे निघून गेली त्यात... ह्या दोन वर्षात एवढ्या गोष्टी घडून गेल्या की स्वाभिमान दुखावला गेला माझा...


आता मनाने ठरवलं काही तरी करायचच... नेमक काय तें शोधायचे होते... मुलगी सिनियर केजी ला असेल तिला Phonics हा विषय होता... मला अभ्यास घेता घेता आवडायला लागले...


लगेच गुगल महाशय ओपन केले आणि या बाबतीत सर्व माहीती शोधून काढली... पुणे नाहीतर मुंबई या दोन ठिकाणी कोर्स होता... आणि ऑनलाईन होते..पण इथले नेटवर्क त्याची गॅरेंटी काय??


पुण्यात आमचा फ्लॅट आहे पण पिल्लू लोकांचे काय?? कोण सांभाळणार त्यांना मी क्लासला गेल्यावर आणि एवढे दिवस पुण्यात कोण राहणार आमच्या सोबत?


मग् माझी गाडी मुंबईकडे वळली... मुंबई मध्ये बऱ्याच ठिकाणी होते... पण मला माझी आत्या राहते तिथे जवळ असलेल्या क्लास बरा वाटला...


लगेच ताई म्हणून हक्काने आते बहिणीला फोन करून ऑर्डर सोडली... ऍड्रेस पाठवला आणि चौकशी करून यायला सांगितल... त्यांचे शॉर्ट सेशन होते पण तसे आत्यापासून देखील तें बऱ्यापैकी लांब होते... त्यात एवढी महिती नाही मुंबईची मग् काय? परत प्रश्न काय करावे??


पण मी पक्की होते काही झाले तरी आता मागे हटायचे नाही... हे सर्व ठरवले तेव्हा फेब्रुवारी महिना होता... माझ्या मुलीची शाळा,परीक्षा हे झाल्या शिवाय तर शक्यच नव्हते... त्यात आमचे राहते घर नुकतेच बांधून पूर्ण होत आलेले म्हणजे मग् शिफ्टींगची गडबड पण याच दरम्यान येतं होती... सगळ्याचा मेळ बसेल की नाही काही माहीती नव्हते... पक्का होता तो माझा निर्धार..


आते बहीण त्या इन्स्टीट्युट मध्ये जाऊन सर्व चौकशी करून आली होती... आणि लवकर सीट बुक केली तर फी मध्ये काही सुट होती... प्रश्न पैशाचा नव्हता... पण मी तिथे एकदा बघून यावं आणि मग् ऍडमिशन घ्यावी असे मला वाट्त होते.. पण दोन लहान मुले, शाळा या मुळे वीकएन्डला जावे लागणार होते आणि एक दिवसासाठी जाणे मिस्टरांना शक्य नव्हते... मग् काय दोन मुलाना घेऊन मी बस ने जायचे ठरवले... आता मुंबईला दोन मुलांना घेऊन जाणार म्हणून सगळ्यांना टेन्शन, उतरताना कसे होईल.. मला बस चा प्रवास नवीन नव्हता.. पण दोन मुलांना घेऊन एकटीने जायचा आणि ते पण बसने हा नवीन अनुभव होता... त्यामुळे सर्वांना काळजी वाट्त होती...


हा प्रवास कायम लक्षात राहील असाच झाला.. पनवेल ला आल्यावर ड्राइवर ची तब्येत बिघडली म्हणून दुसरी गाडी देत होते..पण सर्व प्रवासी तयार नव्हते... कारण त्यांचे म्हणणे आम्ही ac गाडीचे पैसे भरले आहेत आम्हाला ac च गाडी हवी.. ह्या सगळ्यात मी मात्र रडवेली झाले... शेवटी गोळी घेऊन, थोडा आराम करून तोच ड्राईव्हर आला... त्याच्या डोळ्यावर झापड आली की गाडी हेलकावे खात होती... मला तेव्हा खूप टेन्शन आले.. म्हटलं आता जर काही झाले तर संपले सर्व... मी घाबरून गेले होते... पण म्हणतात ना ' इच्छा तेथे मार्ग '.... त्याप्रमाणे मी सुखरूप पोहचले... दुसऱ्या दिवशी जाऊन ऍडमिशन घेतले... आणि हा असा अनुभव ऐकल्यावर माझे मिस्टर मला वाशीला घ्यायला आले आणि आत्या सोडायला...


१६ एप्रिल ची बॅच घेतली... आणि घरी आल्यावर तयारी सुरू केली... एप्रिल महिन्यात आमची स्वारी परत आत्याकडे.... तिथुन पण दोन बस बदलून जावे लागत होते त्यात फार काही माहिती नाही... माझी आतेबहीण पहिल्या दिवशी माझ्यासोबत आली सर्व समजावून सांगितलं तिने, बस नंबर आणि रुट... मग् पुढचे दिवस मी गेले.. तेव्हा मुलांना सांभाळले ते माझी बहीण,आत्या आणि दोन आतेबहीणी यांनीं.... त्यांनी ती जबाबदारी घेतली आणि माझे काहीतरी करायचे हे स्वप्न खरे झाले... एक्साम होती लगेच तेव्हा अहो आले होते.. बहिणीला ऑफिस मुळे जावे लागले...या सगळ्यांच्या मदतीमुळे आणि माझ्या प्रबळ इच्छेमुळे मी हा कोर्स पूर्ण करू शकले...


एक्साममध्ये छान ग्रेड मिळाली आणि मी "Certified Phonics Teacher" झाले... बर इथे येऊन तर खरी सुरुवात होती...तसेही कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात तितकी सोपी नसतेच, त्यात आम्ही राहतो तिथे Phonics म्हणजे काय हे जास्त कोणाला माहित नाही... मग् काय? पालकांसाठी आधी छोटे सेशन घेतले ... आणि मग् मुले क्लास ला येऊ लागली.... माझ्याकडे येणारी सर्व मुले ही ४-८ या वयाेगटात मोडणारी... त्यामुळे "माझा फ्रेंड करतो तसेच मी करणार" एवढीच समज असते... खूप छान रिस्पाॅन्स होता सुरुवातीला... मी पण एक शिक्षक म्हणून घडत होते...


दिवाळीची मोठी सुट्टी आली आणि छोटी मुले कंटाळा करू लागली कारण सुट्टीमुळे कंटाळा आला होता... मग् हा नाही म्हणून मी नाही असे करत संख्या गळू लागली... मला वाटले मी कमी पडते की काय?? पण जी शेवट पर्यंत होती त्यांनी मन लावुन क्लास पूर्ण केला आणि त्यांच्या मध्ये जे बदल झाले तें बघून पुढल्या वर्षा साठी आधीच ऍडमिशन झाल्या....


अजून एक किस्सा सांगतें... नवीन क्लास म्हटले की पालक खूप उत्सुक असतात.. असेच एका मुलाची आई त्याला घेऊन क्लासला आली... तो खूप हट्टी होता, रडत होता... दोन दिवस त्याची आई स्वतः त्याला घेऊन बसली... पण शेवटी त्याच्या हट्टापुढे तिने हार मानली... पण जेव्हा तें वर्ष संपून पुढच्या वर्षी मी क्लास सुरू केला आणि त्या मुलाने स्वतः त्याच्या आईला सांगितलं की मला Phonics क्लास ला जायचं आहे... आणि एक महिन्यातच तो कोणताही इंग्लिश शब्द वाचू लागला... लिहू लागला... तेव्हा स्वतःहून त्याने आईला सांगितलं की मिस किती छान शिकवतात, मला आता लिहिता येते, वाचता येते.. जर मी मागच्या वर्षी रडलो नसतो तर अजून छान करता आले असते... आणि हे सर्व त्याच्या आईने मला सांगितलं तो दिवस म्हणजे ५ सप्टेंबर २०१९ हो मागच्या वर्षीचा शिक्षक दिन खुप मोठे गिफ्ट होते हे माझ्यासाठी...


हा असा खडतर प्रवास करत शेवटी आज मला Phonics Teacher अशी ओळख मिळाली... आणि मी ती सार्थ केली असे वाट्ते मला... कारण इतर कोणत्याही बिझनेस म्हणा किंवा अजून काही त्यामध्ये तुम्ही घेतलेल्या मेहनतीचे फळ तुम्हाला लगेच मिळते...पण शिक्षकाचे तसे नाही...


जसे आपण बीज लावतो मग् योग्य खत- पाणी घालून त्याचे रोपटे होते मग् झाड आणि मग् आपल्याला फळे आणि फुले मिळतात... शिक्षक सुद्धा या विद्यार्थी रूपी रोपाला ज्ञानरूपी खतपाणी घालत असतात... आणि त्यांची झालेली प्रगती हेच त्यांच्या कष्टाचे फळ असते...


Rate this content
Log in