AnjalI Butley

Children Stories Classics Inspirational

4.8  

AnjalI Butley

Children Stories Classics Inspirational

लुडबुड

लुडबुड

6 mins
329


लहान असताना आजीबरोबर वेळ घालवत असताना, तिच्या अवतीभवतीच जग असायचं... ती कधी रागवायची तर कधी मायेने समजून सांगायची...


सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ती आपली स्वयंपाकघरात चुलीपुढे काही ना काही काम करतच राहायची, चुल मातीने सारव, चुल पेटव, चुलीसमोरची जागा सारव, स्वयंपाकाची तयारी... सकाळचा चहा, नाश्ता, जेवण, दुपारचं काही तरी खायला, रात्रीचे जेवण... सगळं टापटिप, स्वच्छता लागायची तिला... मी आपली तिच्या मागे मागे फिर. तिने सारवून ठेवलेल्या जागेत मी आपले पावलाचे ठसे कसे छान उमटले करत तिला दाखवणार.. तर ती मला रागवणार... शेवटी जावयाचेच पोर करून... तेव्हा काही कळत नसायचं ती का रागवते म्हणून... आता कळतं किती त्रास देत होतो तिला... माफी मागायची तर ती सोबत नाही...


आम्ही सुट्टीचे आजीकडे गेलो की खास पुरण पोळी, सांजा पोळी, रताळ्याच्या पोळीचा बेत असायचा... आजोबांनी एका स्टिलच्या डब्यात तूप विकत आणले की समजायचे... एक दोन दिवसात पुरण पोळीचा बेत आहे!!


हरबऱ्याची डाळ निवडून साफ केली जायची, कणिक चाळून ठेवायची, वेलची-जायफळाचा कुट करून ठेवणे अशी पूर्वतयारी चालू असायची... नातवंडं आली की तिचा उत्साह ओसंडून वाहायचा... हळूहळु ती आम्हाला समजणार नाही अशा पद्धतीने तयारी करायची... तरी लक्ष जायचंच...


आजीला डाळ निवडून देते करत.. डाळ तशीच निवडता निवडता तोंडात टाकली जायची.. आजीचं लक्ष गेले की ती रागवायची... पोट दुखेल म्हणून... तिला काळजी आमच्या तब्बेतीची.. सुट्टीत आले आहेत तर आजारी पडू नये याची... ऊन जास्त असल्यामुळे बाहेर दुपारचं खेळायचं नाही... घराच्या आतच बसून खेळायचं.. कधी कधी गावात राहणारे मावशीची, मामाची मुले येत आम्हाला भेटायला, खेळायला... आजी हळूच त्यांनापण आमंत्रण द्यायची... परवा पुरणाचा बेत आहे या जेवायला... आमचा नाकावरचा राग आजीला लागलीच कळायचा... तसेही वाटून खाण्यात, एकत्र बसून खाण्यातली मज्जा आजीकडची वेगळीच असायची... ती सगळ्यांच्या आवडी निवडी ओळखून असायची, त्या पद्धतीने कमी जास्त पदार्थ वाटायची...


तर हा पुरण पोळीचा घाट .. एक दोन दिवस चालायचा... किलोचा.. पायलीचा... तरी पुरण एकावेळेस केले जायचं... सुगरण आजी अनुभवातून हाताच्या पाच बोटात, मुठीत पकडून इतर पदार्थ अचुकपणे टाकायची.. 


मोठे मोठे तिचे ४-५ तरी पितळी गंज बाहेर निघायचे,कधी कधी त्यात बसुन छान गिरकी घायची, अजुन जर कोणी खेळायला सोबत असेल तर धमाल, सगळ्यांची आळीपाळीने यात बसुन मज्जा लुटायची... कधी कधी भांडण व्हायची... आजी रागवायची...तीला ती मोठी मोठी गंज नीट ठेवायचे असायचे, परत आम्हा कोणाला त्याची काठ लागु नये याची काळजी असायची. 

ती त्या सगळ्या गंजांना धुवून, आतून कल्हई करून घेत असे... कल्हईवाला येत असे दारावर रोज... त्याच्या कल्हई म्हणण्याची नक्कल केली जायची... कल्हई केलेले गंज.. अरे हो त्याला पातेले म्हणतात.. असे आजीला सांगत, तिच्या खास 'चांदा'करी भाषेत... मग ती आमचा समाचार घ्यायची.. तुमची पुस्तकी भाषा तुम्ही बोला करत... ती भरपूर म्हणींचा वापर करायची बोलताना.. ते सगळं डोक्यावरून जायचं! या कल्हई केलेल्या पातेल्यांना बाहेरून चिकण मातीचा लेप लावला जायचा... नटलेले गंज बघायला मजा वाटायची.. 


आजी हे सर्व काम स्वतः करायची कोणी हात लावलेला तिला आवडायचं नाही.. तरी माझी आपली सतत लुडबुड चालूच असायची, कधी त्याला लांबूनच बघते करत, जवळ गेल्यावर बोट फसकन त्या माती लावलेल्या गंजात खुपसायचं.. ओली माती बोटाला लागून तिथे खड्डा पडायचा... आजीच्या लक्षात आमचे प्रताप लागलीच यायचे.. थोड्यावेळ वातावरण एकदम गंभीर बनायचं... कधी पाठीवर रपाटा, धपाटा खायला मिळायचा तर कधी फक्त शब्दमार... शब्दमारापेक्षा धपाटा बरा असायचा... डोळ्यातल्या आसवांच्या धारा आपल्या मऊ हाताने पुसत आजी जवळ घ्यायची... आमचा शब्द प्रश्न मारा तिच्यावर चालू व्हायचा... माती का लावली गंजांना, पुरण शिजवताना त्यात पडलं तर वगैरे... ती त्यामुळेच आम्हाला बाजुला ठेवत होती... पुरण एका गंजात करणार मग हे बाकीचे गंज कशासाठी?


तर असे हे सारवलेले गंज पुरण करण्यासाठी आदल्या दिवशी तयार असायचे... चुलीवरचा स्वयंपाक असल्यामुळे गंज खालून जळू नये म्हणून मातीने लेपून सारवतात... डाळ स्वच्छ धुवून गंजात टाकली जाते, मापाने गरम केलेले पाणी गंजात टाकून, गंज पेटत्या चुलीवर चढवतात... अरे हो त्या आधी चुलीची हळद-कुंकू वाहुन मनोभावे पूजा केली जाते... 


तोपर्यंत दुसऱ्या पदार्थांची तयारी, दुसरे पदार्थ म्हणजे कढी, भजे, भात, वरण, भाजी, पोळ्या, कोशिंबीर वगैरे... कणिक पुरण पोळीसाठी भिजवून ठेवणे, साध्या पोळीसाठी कणिक भिजवणे... दोन्ही पोळींसाठी वेगळ्या पद्धतीने कणिक भिजवल्या जायची!


अधुन मधुन चुलीवर शिजत असलेल्या हरबरा डाळीवर आजीचं लक्ष असायचं, उकळी वर आली की त्याबरोबर वर आलेला पांढरा मळ चमच्याने बाहेर काढणे, पाणी हवे तेवढे आहे की नाही, शिजली की नाही, हवी तशी शिजली की प्रमाणाची काढून ठेवलेली साखर त्यात टाकणे... मोठ्या चमच्याने ते हालवणे, पाक वर उडल्या जायचा चटका लागायचा पण ती हू की चू नाही... हसत प्रसन्नमुद्रेने आपलं काम करत राहायची... माझी तिला मदत करण्याच्या बहाण्याने लुडबुड चालूच राहायची... ती रागवायची चुलीपुढे येऊ नको म्हणून. खरं तर पुरणाचा तो खास वास भूक चाळवायचा... भूक लागली भूक लागलीची आमची भुनभून चालू व्हायची.. तसे गरम गरम पुरण एका वाटीत वरून तुपाची धार टाकलेली जेवढी बच्चे मंडळी असायची त्यांच्या पुढ्यात द्यायची... सावकाश हळू खा, गरम आहे, जीभ भाजेल... खुश झालेलो आम्ही ती काय सांगते हे ऐकायचो नाही मग... जीभेला चटके बसायचेच!! 


तुला जास्त, मला कमी यावरून हमखास भांडणं व्हायची... तोपर्यंत आजी आत पाटा-वरवंट्यावर पुरण वाटत बसायची... वाटलेले पुरण छान दिसायचे... मग आमचा मोर्चा तिच्या जवळ पुरण वाटून देते करत... तिचं सर्व पुरण वाटून झाले की थोडे पुरण ती मला वाटायला द्यायची... आमच्या मग वरवंटा किती जड आहे, हालतच नाही, पाटाच हालतो वगैरे तक्रारी सुरू व्हायच्या... त्यातूनच पाटा-वरवंट्याचा उपयोग कसा पदार्थ बारीक करायला वापरतात हे कळले...


पाटा वरवंटा धुताना जे पुरणाचे पाणी बाहेर काढून ठेवायची त्याची ती आमटी करायची का? आठवत नाही... नाशिकला आल्यावर 'पुरण पोळी, कटाची आमटी' असा बेत असतो हे कळले, 'कट' म्हणजे पुरणाची डाळ बारीक करून जो उरलेला भाग असतो पाट्यावर तो परत वापरण्यासाठी पाण्याबरोबर पातळ केला जातो!!


मग आमचं लक्ष एका कोपऱ्यात बाजूला ठेवलेल्या गंजाकडे, जो बाहेरुन पूर्ण काळा झालेला व त्याच्या आतल्या भागातल्या बुडाला लागलेल्या पुरणाची खरवड काढून देते करत सरळ गंजाला लावलेला हात, आतापर्यंत हात काळे झालेले व तेच काळे झालेले हात तोंडाला व फ्रॉकला पुसलेले... तसाच तो काळा हात पुरण खरडावयाला गंजात, खरडवलेले पुरण तोंडात... शांतपणे आवाज न करता हा आमचा कारभार चालूच... आमचा आवाज आला नाही म्हणून आजी हातचं काम बाजूला करत शोधत आमच्यापर्यंत पोहोचते... 


परत धपाटा पाठीवर बसणार असे वाटताच आमचं डोळ्यातलं अश्रू शस्त्र तयार... दोघीपण हासत सुटतो... थोडा धीर नाही... वगैरे!!

तोंड, हातपाय, फ्रॉक बदल व जेवण तयार आहे, जेवायला बसा... ताट वाढते सगळ्यांना...

मग उड्या मारत मारत हातपाय धुवून, फ्रॉक बदलून परत आजीसमोर हजर... ताट-वाटी लावून देते करत... 

गरम गरम पुरण पोळी तव्यावरून थेट आमच्या ताटात पडायची. दोघे तिघे असेल तर चतकोर चतकोर आधी ताटात द्यायची... सोबत गरम तुपाची वाटी... ताटात बरेच पदार्थ असायचे सगळे गरम!!! हे गरमा गरम पदार्थ तोंडात घालतांना हाताला चटका बसायच. तोंड पोळायच. काहीतरी पदार्थ कपड्यावर सांडायचे... खाता खाता लक्ष आजीच्या हाताची चाललेली लयबद्ध हालचाल बघण्यात असायच, मधुनच तीला प्रश्न असायचा हातावर कसे काय पुरणपोळी करते. पोळपाट का वापरत नाही... पोळी अशी मऊ झाली... मी करून बघु का?... उद्यापण मिळेल का... थोड पुरण उद्यासाठीपण ठेव...  अजुन कोणाला बोलवु नकोस पुरणपोळी खायला वैगरे... आजी सगळ एकटीच करत असे चुलीपुढचा स्वयंपाक... परत कोणी आले गेले त्यांच्याकडेही लक्ष ठेवायचे, त्यांनापण जेवायला बसायचा आग्रह...


नाही म्हटले की चहा... त्यात पण आमची लुडबुड चालूच असायची... एकदा ती कढी करत होती, ताकाला फोडणी घालून झाली होती... व एका छोट्या वाटीत डाळीचं पीठ पाणी टाकून पातळ केलं होतं.. तिच्या अंदाजाप्रमाणे.. तेवढ्यात कोणी आलं म्हणून ती बोलायला गेली बाहेर तर मी एवढंसं डाळीचं पीठ कसे पुरेल करत त्या वाटीत दोन तीन चमचे पीठ टाकलं... आजी परत स्वयंपाक घरात आल्यावर तिने उकळत्या ताकात ते वाटीतलं पीठ पातळ केलेले टाकले... तेव्हा तिच्या लक्षात आलंच मी काही तरी गडबड केली आहे... तर त्या दिवशी कढी पिण्याजोगी नाहीतर खाण्या जोगी झाली होती... थोडक्यात काय तर ताकातलं पिठलं बनलं होतं... आजोबा जेवायला पाटावर बसले होते, ताट वाढली होती म्हणून जशी कढी बनली होती तशीच वाढल्या गेली... आजोबांनी फक्त 'बेस' झालं हा शेरा दिला... आजी व मी गालातल्या गालात हसत होतो... सगळ्यांची जेवणं झाल्यावर तिने आमचा कान पिळला, प्रत्येक पदार्थ करताना जिन्नस कीती टाकायचे हे अनुभावाने ठरवत टाकायचं असतं... 


असो तर पुरण पोळी करताना आल्या गेल्यासोबत वाटून खायची, सोबत पण द्यायची त्यांच्या घरी... शेजारीपण नेऊन द्यायची... हा आजीचा गुण काही केल्या समजत नव्हता तर म्हणे वाटुन खाव म्हणजे आपल पोट दुखत नाही... 


दुसऱ्या दिवशी शिळी पुरण पोळी जास्त गोड, रूचकर लागते!!! पुरणपोळी करण्याचा, खाण्याचा एक सोहळाच असायचा...

लुडबुड करत शिकण्यातली मज्जापण भारीच!!!


शिकवणाऱ्याला आपण शिकवतो हे वाटत नाही व शिकणाऱ्याला पण काही मुद्दाम शिकतोय असे वाटत नाही... हसत खेळेत, रागवत कधी कस शिकलो हे कळत नाही,पण शिक्षण, संस्कार प्रक्रिया घडत राहाते!!!


Rate this content
Log in