लज्जा आणि बरंच काही
लज्जा आणि बरंच काही


"मोहे आयी ना जगसे लाज, मै इतना जोरसे नाची आज की घुंगरु टूट गए.... " रेडीओ वरच गाण ऐकताना मनात आलं....
माझे 'लज्जा' या विषया बद्दलचे पराक्रम सांगायचेचं झाले तर नेमकं कुठून आणि कस सुरु करावं?
बराच विचार केला पण ते काही सुचत नव्हतं आणि सांगितल्या शिवाय आता मोकळही वाटणार नव्हतं! म्हणून मग शेवटी आज केली आहे हिंमत तुम्हाला सांगायची.... बघा जमलं तर घ्या सांभाळून.
पॉलिटेक्निकला असताना तिची आणि माझी ओळख झाली. आम्ही एकाच वर्गात होतो. तिच्याशी गप्पा मारताना तिच दिलखुलास वागण आवडायला लागलं. 'हरप्रीतकौर' तिचं नाव. नावा प्रमाणेच कुणालाही आवडावी अशी लाघवी!
माझं शिक्षण मराठी मिडीयम मधे झालेलं. त्यामुळे एन्ग्रजी विषयाच कौतुक आणि भिती दोन्हीही होतच माझ्या मनात. या उलट तिचं इंग्लिश एकदम भन्नाट! बर्याचदा इंग्लिशच्या क्लासला आम्ही ठरवून शेजारीशेजारी जवळ बसायचो. सोबत राहत ओळख वाढत गेली तस आमचं प्रेमही..
कॉलेजहून घरी जाताना आमच्या कॉमन असलेल्या अर्ध्या रस्त्या पर्यत आम्ही सोबतच जाऊ लागलो. डबा सुद्धा एकत्र बसून खाणं सुरु झालं.
"एक लडकी को देखा तो ऐसा लगा..." या सारखं तिच्या बद्दल कौतुक आणि कौतुकच मनात भरून वाहत राहिलं.
एकदा तिला सरप्राईज द्यायला थेट तिच्या घरी धडकायच ठरवलं आणि तस मी केल सुद्धा !
तिला सरप्राइज देण तस मला महागातच पडलं. ती काय, तिच्या घरचे कुणीच घरी नव्हते जेव्हा आंम्ही तिच्याघरी गेलो. चौकशी केल्यावर आम्हाला समजले की ती आणि तिच्या घरातले सगळे मागच्या कॉलंनीत एका कार्यक्रमाला गेलेत.
आम्ही तिथेही जाऊन पोहचलो आणि तिथे दिमाखात स्वत:ची ओळख दिली, "आम्ही सगळे हरप्रीत चे क्लासमेटस म्हणून!
आमचे स्वागत करत हरप्रीतला आवाज देण्यात आला. थोड्याच वेळात एक काकू आणि त्यांचा हरप्रीत नावाचा मुलगा समोर हजर झाले आणि आमच्या तोंडचे पाणी पळाले. आम्ही कसबस सांगायचा प्रयत्न केला केला की आम्ही या हरप्रीतचे क्लासमेट नाहीत.
हुश्श !! मुलं आणि मुली एकमेकांचे मित्र आहोत असं उघडपणे सांगण्याचा काळ नव्हता तो...आणि इथे तर ज्या 'हरप्रीत ला' शोधायला आम्ही आलो होतो ती ही नव्हती... मग कशाला उगाचच गैरसमज वाढवा? अस आमच्या मनात आलं आणि आम्ही "सॉरी ! चुकिच्या घरी आलो आम्ही बहुतेक"... असं म्हणत तिथून पळ काढला.
तिथे त्याच्या आई सोबत आमच्या समोर आलेल्या हरप्रीतने नंतर त्याच्या घरच्यांना कसे समजावले होते की, 'आम्ही त्याच्या क्लासमधेच काय पण कॉलेज मधे पण नाही आहोत आणि कधी एकमेकांना भेटलोही नाही हया आधी!' हे त्याला बिचार्यालाच ठाउक!
झाला तो प्रसंग जसाच्या तसा दुसर्या दिवशी हरप्रीतला सांगून टाकला. तिनेच मग आम्ही परत असे पराक्रम करायला नको म्हणून आम्हाला तिच्या सोबत घरी नेले एकदा आणि ओळख करुन दिली तिच्या घरच्यांशी ! त्यामुळे आमची मैत्री आणखी वाढली. मला आणि तिला सोपे झाले मग एकमेकांच्या आवडी अधिक जाणून घ्यायला.
यातून एक नवा शोध लागला की तिला वाचनाची आवड आहे. आमची वाचनाची आवड कॉमन असल्याने आम्ही अधूनमधून चर्चा करायचो काही नवे वाचले की! दिवस भरा भरा कसे पुढे जात होते कळाले नाही.
बोलता बोलता कॉलेजच पहिल वर्षं संपत आल आणि कॉलेजच्या गैदरींगची गडबड सुरु झाली. तिने सगळया मैत्रिणींना घेऊन छान 'गिद्दा' हा पंजाबी डांस बसवला. मुल करतात तो भांगडा आणि मुली करतात त्याला गिद्दा म्हणतात हे तेंव्हा समजल मला. जसं हरप्रीत हे मुलाचं किंवा मुलीच दोघांच नाव असू शकतं फक्त मुलगी असेल तर नावापुढे कौर लावतात हे लक्षात आलं होतं तिच्या घरी पोहोचलो आणि तिच्या मामे भावाला ज्याचं नाव सुद्धा हरप्रीत होते त्याला भेटलो तेंव्हा.
ती मलाही डान्स मधे भाग घे म्हणाली होती पण माझी केस जरा वेगळी होती. वड
िलांना मुलींनी उशिरापर्यंत कॉलेजच गैदरींग बघायला जाण आवडायचं नाही. आमच्या घरा समोरच एक कॉलेज होते. मोठी बहिण जायची नेहमी विचारुन आणि बोलणे ऐकून. हिम्मतवान होती ती ! माझ्या सारखी भित्री नव्हती.
वडीलांची परवानगी घेण्याची माझ्यात हिंमत नव्हती मग डान्स मधे भाग कसा घेणार ? हरप्रीतला सरळ सांगून टाकल आपण दुसर्या एखाद्या स्पर्धेमधे एकत्र भाग घेऊ.
ती संधी आम्हाला लगेच मिळाली. तिने मला तिच्या सोबत 'क्वीझ' मधे भाग घेते का असं विचारलं. मी लगेच होकार दिला कारण या स्पर्धा आमच्या कॉलेजच्या वेळेत होणार होत्या.
आम्ही त्यात एकमेकींच्या पार्टनर बनून भाग घेतला आणि विशेष म्हणजे आम्ही दोन ड्रेस डिझायनिंग शाखेच्या मुलींनी कॉलेजच्या इतर शाखेतल्या बऱ्याच मुलांना मागे टाकत शेवटची फ़ेरी गाठली.
आम्हाला वाटणार आमचं अतिसामान्य ज्ञान इतरांपेक्षा वरचढ़ ठरत गेलं हे आमचं भाग्यच म्हणायच.
शेवटच्या फेरीत चुरस वाढली आणि एका टप्प्यावर टाय झाला. शेवटचा एक प्रश्न दोन्ही गटांना विचारला जाणार होता आणि तो ठरवला गेला आमच्या निवडीवर. समोरच्या गटाने निवड केली 'करंट अफ़ेअर्स ' आणि आम्ही विषय घेतला 'लिटरेचर'!
परीक्षक हुशार होते त्यांनी त्या दोन्ही विषयांवर एकच प्रश्न विचारला.
"लज्जा या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण?"
प्रश्न ऐकून दोन्ही गट गप्प! भयाण शांतता पसरली. सगळ्यांची उत्सुकता वाढली पण आम्ही कोणी उत्तरं द्यायला तयार नाही. शेवटी असे ठरले की बरोबर उत्तराला दोन गुण मिळतील आणि जर उत्तर चुकले तर एक गुण कमी करणार आमचा.
थोडा विचार केला आणि आपसात आमची दोघींची चर्चा झाली. दोघींनाही उत्तर येत नव्हतं म्हणून तर्क मांडला.
"नावावरुन तरी खुप जुने पुस्तक आहे असं मला वाटतं" ती म्हणाली. तस मी पण सांगायला सुरुवात केली की मी अशात 'यांची' बरीच पुस्तक वाचलीत आणि त्यांच्या पुस्तकांची नावं साधारणपणे अशीच असतात आणि ते हिंदी सहित्यासाठी प्रसिद्ध आहेत."
गबन, सेवासदन, प्रेमा, रुठी रानी, प्रतिज्ञा, गोदान...." माझ्या या यादीला ऐकून हरप्रीत ने मला, "बस बस...मुझे यकीन हो गया...यही राइटर का नाम बताते है...! ग्रेट यार...तूने तो काफी पढ़ा है...." असं म्हणत थांबवले.
बस एका झट्क्यात मी तिच्या नजरेत कौतुकाची धनी झाले आणि स्पर्धेत शेवटची घोषणा झाली, "कुणाला उत्तर माहिती असेल तर"..... आणि आम्ही उत्साहात बेल दाबली. समोरचा गट त्यामुळे थोडा गडबडला. स्वत: उत्तराचा शोध घेत परत ते आपसात चर्चा करणार त्याआधी आम्ही दोघी एका सुरात उत्तर देत म्हणालो, " लज्जा या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक आहेत.... मुन्शी प्रेमचंद!"
परीक्षकांचा कौतुकाने भरलेला चेहरा खाडकन उतरला. प्रेक्षकांमधून काही हसण्याचे आवाज आले आणि समोरचा गट आनंदी झाला. आम्हाला अजुनही कळायला मार्ग नव्हता की नेमकं काय झालं?
"फार तर काय उत्तर चुकले असेल आपले, तरी आपण उपविजेते तर झालो ना! मग इतके का हसतायेत सगळे? स्वत: तर भाग ही घेतला नाही आणि आले मोठे आपल्याला हसणारे" हे सगळे आम्ही एकमेकिंना सांत्वन पर दिलेले बोल होते.
निकालाची घोषणा झाली तेव्हा आम्ही उपविजेते ठरलो याचं वाईट तर वाटलं पण लज्जा वाटेल असं यापेक्षा मोठं कारण नेमकं काय आहे हेही लक्षात आलं. जेव्हा परीक्षक उद्गारले, "लज्जा हे प्रसिद्ध पुस्तक बांगला देशातील लेखिका तस्लीमा नसरीन यांनी लिहिलेले आहे आणि हे पुस्तक बरेच वादग्रस्त ठरल्याने त्यांना त्यांच्या देशातूनच नव्हे तर अनेक देशातून बाहेर काढले गेले आहे आणि त्या भारतात आता आश्रय मागत आहेत. गेला आठवडाभर जगभरात याची चर्चा सुरू आहे."
आमच्यापैकी फार कमी लोकांना हे ठाऊक होते. दुसऱ्या दिवशी आधी ते पुस्तक विकत घेऊन वाचायला सुरुवात केली होती. कारण...
कारणं... सांगायला हवं की... आलं लक्षात? नसेल आलं तर मिळवा ते पुस्तक आणि वाचा...