STORYMIRROR

Rutuja Vairagadkar

Others

3  

Rutuja Vairagadkar

Others

कशी होऊ उतराई...

कशी होऊ उतराई...

9 mins
198


ओ टी मध्ये बाळाच्या रडण्याचा आवाज आला आणि सगळ्यांना अश्रू अनावर झाले.

रेवा आणि मिलिंद एकमेकांना बिलगून ढसाढसा रडले.

काही वेळात नर्स बाळाला घेऊन बाहेर आली.

“अभिनंदन, लक्ष्मी आली तुमच्या घरी. तुम्ही आई झालात.”

नर्सने बाळाला रेवाच्या हातात दिल. रेवा त्या गोंडस बाळाकडे बघतच राहिली.

“मिलिंद मी आई झाले आणि तू बाबा. मिलिंद मला इतका आनंद झालाय ना की मी शब्दात व्यक्त करू शकत नाही आहे. मी आई झाले..मी आई झाले.”

“सिस्टर आई कशी आहे.” मिलिंदने विचारलं.

“त्या बऱ्या आहेत. औषधीमुळे थोडी गुंगी आहे, पण थोड्याचवेळात त्या शुद्धीत येतील.”


काही वेळाने कुसुमकाकूंना ओ टी मधून नॉर्मल वॉर्ड मध्ये शिफ्ट केलं.

रेवा आणि मिलिंद दोघेही बाळाला घेऊन वॉर्ड रूम मध्ये गेले.

मिलिंद अगदी डोळे टक लावून आईकडे बघत होता, कधी आई शुद्धीवर येते आणि मी तिच्याशी बोलतो असं झालं होतं त्याला.

“रेवाचा आनंद तर गगनात मावेना झाला होता. ज्या दिवसाची ती आतुरतेने वाट बघत होती तो दिवस उजाडला होता.

“एखाद तासानंतर कुसुमला शुद्ध आली, त्यांनी डोळे उघडले तर मिलिंद आणि रेवा बाजूलाच बसलेले होते. त्यांनी चेहऱ्यावर हलकं स्मितहास्य आणलं आणि इकडे तिकडे बघू लागल्या.

रेवाच्या लक्षात आलं ती उठली, बाजूच्या पाळण्यात बाळाला ठेवलेलं होतं, रेवाने बाळाला घेतलं आणि आई जवळ येऊन बसली.

“आई लक्ष्मी आलीय.”

रेवाने बाळाला आई जवळ ठेवलं.

त्या बाळाला बघून अगदी खुश झाल्या.

.............................


रेवा वेल एज्युकेटेड , सुंदर, सुशील आणि खूप बोलणारी अशी मुलगी. एम कॉम झाल्यानंतर नोकरी सुरू असताना रीतसर कांदेपोह्याचा कार्यक्रम आयोजित करून लग्न ठरलं.

मिलिंद आय आय टी झालेला नामांकित कंपनीत उच्च पदावर नोकरीला होता.

रेवा खूप बळबळी ,तर मिलिंद अगदी विरुद्ध मितभाषी होता.

पारंपरिक पद्धतीने लग्न झालं, दोघांचा जॉब एकाच शहरात असल्यामुळे कुठेही शिफ्ट होण्याची गरज पडली नव्हती.

सुरुवातीचे दिवस खूप मस्त गेले. दोघांनीही लग्नासाठी सुट्या टाकलेल्या होत्या, त्यामुळे ते दोघे बाहेर फिरायला गेले. आठ ते दहा दिवसांचा टूर संपल्यानंतर दोघांनीही ऑफिस जॉईंट केलं. दिवस छान जात होते. सुरुवातीला आताच मुलं नको म्हणून दोघांनीही प्लॅनिंग केलं. सगळं त्यांच्या मनासारखं होत होतं. कुसुम ( रेवाची सासू ) त्यांना थोडं खटकायचं, कधी कधी दोघींमध्ये वाद व्ह्यायचा.


कामावरून दोघींची कुरबुर सुरू असायची. या दोघींच्या भांडणामुळे कधी कधी मिलिंद वैतागायचा.

आईची बाजू घेतली तर बायको चिडेल आणि बायकोची बाजू घेतली तर आई रागावेल या द्विधामनस्थितीत असायचा आणि मग दोघींशी पण अबोला धरायचा.

बघता बघता वर्ष उलटलं.


एकदा बाजूच्या शेजारच्या कुलकर्णी काकू आल्या.

“काय हो कुसुम ताई, तुमच्या मुलाच्या लग्नाला एक वर्ष झालं ना तरी अजून काही गोड बातमी मिळालेली नाही.”

“अहो कुलकर्णी ताई, ही आजकालची तरुण पिढी, यांना कुठल्याच गोष्टीची घाई नसते. त्यांचं सगळं ठरलेलं असतं. मला कधी कधी राग येतो पण आपण काही बोललं तर घरात वाद होतील. म्हणून मी आपली गप्प. आपण बोललं की आपलंच दिसतं त्यापेक्षा न बोललेलं बर.”


दोघींच बोलणं झालं आणि कुलकर्णी काकू निघून गेल्या.

रेवाच्या मैत्रिणीला मुलगा झाला, तीच बाळ बघताना किंवा तिला इतकं आनंदी बघताना रेवाच्या मनातही कुठेतरी चलबिचल सुरू होती. ती मिलिंद जवळ बोलली.

“मिलिंद आपण बाळाचा विचार करायचा का?” रेवा

“थांबूया ना काही महिने, एवढी काय घाई आहे.” मिलिंद

“तसं नाही, आता आपण नको नको म्हणतोय आणि समोर जेव्हा आपल्याला हवं असेल आणि....” रेवा

मिलिंदने तिच्या ओठावर बोटं ठेवले.

“असं काहीही होणार नाही. आपण करू विचार.”

रेवा खूप आनंदी झाली.

आता रेवाला आई होण्याची आस लागली होती. प्रत्येक महिन्यात वाट बघायची आणि पाळी आली की नर्व्हस व्ह्यायची.

पुन्हा वर्ष उलटला.


पाळी थांबत नाही म्हणून ती खूप रडायची.

“मिलिंद या ही महिन्यात पाळी नाही थांबली. मिलिंद मला आई व्हायचंय. तुला कळतंय का मी काय बोलतीय.” रेवा

“रेवा शांत हो,आपण डॉक्टरशी कन्सल्ट करू.

मिलिंदने डॉक्टरची अपॉईंमेंट घेऊन त्या तारखेला रेवाला घेऊन गेला.

मिलिंदने डॉक्टरला सगळं सांगितलं.

डॉक्टरने रेवाला तपासलं काही टेस्ट करायला दिल्या.

टेस्ट रिपोर्ट आल्यानंतर रेवाच्या रिपोर्ट मध्ये काहीच गडबड नव्हती. ती खूप आनंदात होती.

पुन्हा सहा महिने झाले, गर्भधारणा झाली नाही. आता कुसूम टचटच बोलायला लागली.

“जेव्हा वेळ असते तेव्हा प्लॅनिंग करत बसायचं आणि वेळ गेल्यावर रडत बसायचं.”

“आई हा माझा एकटीचाचं निर्णय नव्हता, मिलिंद आणि मी दोघांनी मिळून हे ठरवलं होतं. मग तुम्ही मला एकटीलाच का बोलता. मिलिंदला ऑफिसला जाऊ देता आणि मग मलाच बोलता.”

संध्याकाळी मिलिंद घरी आला तेव्हा रेवाने विषय काढला,

“मिलिंद बाळ न ठेवण्याचा आपला दोघांचा निर्णय होता ना मग आई मलाच का बोलतात.” रेवा बोलताना भावुक झाली.

“रेवा जाऊ दे ग, तिला आजी होण्याची आस लागली असणार म्हणून बोलली. तिचं काय मनावर घेतेस?” मिलिंद हसून बोलला.

“हसण्यावारी नेऊ नकोस, मला टेन्शन येत.”

मिलिंद तिला प्रेमाने समजावतो. आणि आईला सगळं सांगून तिलाही समजावतो.

पण तरी अधामधात सासू सुनेमध्ये खटके उडायचे. दोघींमध्ये वाद व्हायचे.


काही दिवसानंतर रेवा आणि मिलिंद पुन्हा डॉक्टरकडे गेले.. आता मिलिंदच्या सगळ्या टेस्ट झाल्या. त्याही सगळ्या नॉर्मल होत्या.

बघता बघता तीन वर्षे झालीत. आता रेवाला खूप ओक्वॉर्ड व्हायचं. शेजारी, नातेवाईक, ऑफिस कलीग सगळे विचारायचे,

“काय कधी गोड बातमी देणार.?”

रेवाच्या डोळ्यात टचकन पाणी यायचं.

काही महिन्यानंतर डॉक्टरांकडून कळलं की रेवाला गर्भाशयाचा कॅन्सर आहे.

हे ऐकून रेवा अगदी हादरून गेली. मिलिंद तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिला. बरेच दिवस गेले, रेवाला असं बघून मिलिंदही खचू लागला. दोघांच्याही चेहऱ्यावर काळजी दिसायची.

कुसुमच्या सगळं लक्षात आलं. सगळी परिस्थिती बघता तिने एक पाऊल पुढे टाकला.

रेवा खोलीत बसलेली असताना कुसुम ट्रे घेऊन खोलीत आली.

“आई तुम्ही, काही हवं होतं का? आवाज द्यायचा मी आली असती.” बोलता बोलता रेवाचा कंठ दाटून आला.कुसुमने हातातला ट्रे ठेवला, तिच्या बाजूला बसली.

“रेवा खचून जाऊ नकोस, सगळं नीट होईल. देव एक दरवाजा बंद करतो तर दहा दरवाजे उघडतो. तोच यातून मार्ग दाखवेल. पण तू संयम ठेव, थोडा धीर धर सगळं ठीक होईल.”

कुसुमने रेवाच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला, रेवा कुसुमकडे बघतच राहिली.

‘जी बाई आतापर्यंत मला टोचू टोचू बोलायची आता ती माझं सांत्वन करतेय, देवा स्वप्न तर नाही ना’ रेवाचे मनातल्या मनात विचार सुरू होते.

कुसुमने तीच डोकं स्वतःच्या मांडीवर घेतलं, रेवाने सगळं दुःख बाहेर काढलं


मिलिंद आणि रेवा चांगल्या कॅन्सर स्पेशालिस्ट ला भेटले. त्यांनी तपासून काही टेस्ट करायला सांगितल्या. काही दिवस गेले. आणि निदान आलं की गर्भाशयाच्या मुखाला कॅन्सरची लागण झालेली आहे. त्यामुळे ऑपरेशन करून गर्भाशय काढून टाकावं लागेल.

रेवा आणि मिलिंद घरी आले. मिलिंदने कुसुमला सगळं सांगितलं. आणि खोलीत गेला.

“मिलिंद मी ऑपरेशन करणार नाही. मिलिंद मला बाळ हवंय, मी ऑपरेशन केलं तर माझं स्त्रीत्व संपेल. मी कधीच आई होऊ शकणार नाही. मिलिंद तू डॉक्टरला सांग दुसरा काहीतरी उपाय करा, मी हे करणार नाही.” रेवा खूप रडली.

“रेवा शांत हो, आपल्याकडे दुसरा पर्याय नाही आहे. डॉक्टर सांगतील तसं आपल्याला करावं लागेल. रेवा आता ही फर्स्ट स्टेज आहे, सगळं आपल्या हातात आहे, उशीर व्हायला नको ग.” मिलिंदने रेवाला जवळ केलं.

“मिलिंद सगळं आपल्या हातात आहे,

पण माझं बाळ...माझं बाळ मिलिंद..माझं बाळ कुठे आहे मिलिंद.” रेवा जोरजोरात रडायला लागली.

“रेवा मला बाळापेक्षा तू महत्वाची आहेस. तू माझं आयुष्य आहेस, तुला काही झालं तर मी कसं जगायचं?” मिलिंद

“पण मला बाळ महत्वाचं आहे मिलिंद.”

थोडया वेळाने कुसुम खोलीत आली,

रेवाच्या डोक्यावरून हात फिरवत

“पोरी का जीवाला त्रास करून घेतेस, जे व्हायचं ते होतचं. नियतीच्या खेळाला आपण नाही बदलवू शकत. आणि आपल्या घरात बाळ नक्की येईल बघचं तू.” कुसुमने रेवाला जेवण भरवलं.

काही दिवसांनी रेवाचं ऑपरेशन यशस्वीरीत्या पूर्ण झालं.


त्यानंतर वर्षभर तरी घरी कुणीच बाळाचा विषय काढला नाही. एक दिवस मिलिंद एकटाच डॉक्टरला जाऊन भेटला. त्यावेळी डॉक्टरांनी त्याला टेस्ट ट्यूब बेबीची कल्पना दिली.

मिलिंदला डॉक्टरचं म्हणणं पटलं, तो घरी आला आणि त्याने लगेच आईला हे सगळं सांगितलं. कुसूम जुन्या विचाराची, तिला ते पटलच नाही. पण मुलासाठी त्या तयार झाल्या. असं नाही तर तसं वंश तर आपलाच असणार आहे.

सगळं ठरलं पण प्रश्न निर्माण झाला तो हा की गर्भधारणेसाठी अशी व्यक्ती कुठून आणायची जी नऊ महिने हा जीव पोटात वाढवेल.

आठ दिवस याच विचारात गेले. एक दिवस रेवा ऑफिसला गेलेली असताना कुसूम मिलिंदशी बोलली.

“मिलिंद बाळा एक विचार माझ्या डोक्यात आलाय.” 

“काय आई? बोल ना.”

“मिलिंद हे बाळ जर मी माझ्या उदरात वाढवलं तर?” कुसुम

“काय? आई पण हे कसं शक्य आहे.या वयात तू हे सगळं?” मिलिंद

“एकदा डॉक्टरांशी बोलायला काय हरकत आहे.” कुसुम

“नाही आई, लोकं काय म्हणतील. समाज थुथु करेल माझ्यावर. नको आई मी हे असं काहीही करणार नाही आहे.” मिलिंद

“अरे तू लोकांबद्दल विचार का करतो आहेस? ते तुला बाळ आणून देणार आहेत का? आपला विचार आपणच करायचा असतो.”

काही वेळाने मिलिंद तयार झाला.

दोघेही हॉस्पिटलमध्ये गेले.

डॉक्टरच्या कानावर सगळं घातलं.

“हे बघा तुमचं वय बघता, तुम्हाला जर कुठलाही हेल्थ प्रॉब्लेम नसेल तर आपण हे करू शकतो. आधी मला तुमचं फुल बॉडी चेकअप करून घ्यावं लागेल.”

“डॉक्टर मला काहीच हेल्थ प्रॉब्लेम नाही आहे. तरी तुम्ही तुमच्या फॉर्मालीटी पूर्ण करा.” कुसुम

“कुसुम ताई खरच मला तुमचं खूप कौतुक वाटतंय, तुम्ही तुमच्या सुनेसाठी किती धाडसी निर्णय घेतलात. खरच मला तुमचा खूप अभिमान वाटतोय.” डॉक्टर खूप उत्साहाने बोलल्या.

“खरं सांगू का डॉक्टर मी आधी तिच्याशी काही बरी वागायची नाही, पण हळू हळू तिचा त्रास बघता, तीच दुःख बघता माझ्या मनात तिच्या विषयी सहानुभूती निर्माण झाली. शेवटी मी पण एक स्त्रीचं आहे. एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीचं दुःख समजून घ्यायला हवं.” कुसुम

“मी ऐकलं होतं एक स्त्रीच स्त्रीची वैरी असते पण इथे एक स्त्री दुसऱ्या स्त्रीची मैत्रीण आहे.” डॉक्टर

“आणि हो जेव्हा एक स्त्रीने दुसऱ्या स्त्रीला साथ दिली ना तर मग त्यांना कुणीही हरवू शकत नाही.” कुसुम

दोघ्याही हसल्या.

कुसुमच्या सगळ्या टेस्ट झाल्या सगळं नॉर्मल होत.


संध्याकाळी रेवा घरी आली तेव्हा मिलिंद आणि कुसुम मस्त आरामात चहा पीत बसले होते. रेवाला थोडं आश्चर्य वाटलं.

“मिलिंद आज तू लवकर आलास?”

“नाही, अग मी आज गेलोच नाही.”

“काय? का?” रेवा

“आज मी एका महत्वाच्या कामासाठी आई सोबत बाहेर गेलो होतो अँड यु नो व्हॉट? ते काम सक्सेस झालंय.” मिलिंद

मिलिंदने रेवाला सगळं सांगितलं.

रेवाने तोंडावर हात ठेवला.

“तू खरं सांगतोस.”

मिलिंदने होकारार्थी मान केली तशीच रेवा कुसुमला जाऊन बिलगली.

“थँक यु आई, थँक यु सो मच.”


काही दिवसांनी प्रोसेसला सुरुवात झाली. आणि तब्बल दोन महिन्यानंतर कुसुमच्या गर्भात गर्भ टाकला गेला. आता रेवाने नोकरी सोडली, ती चोवीस तास कुसुम सोबत असायची. कुसुमचं खाणं-पिणं, औषध, मेडिकल टेस्ट, मंथली चेकअप सगळं रेवा करायची. 

सकाळच्या चहापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत सतत सोबत असायची. दुपारी छान छान कथा ऐकवायची, गर्भसंस्कारचं पुस्तक वाचून सांगायची. 

बघता बघता पाच महिने पूर्ण झाले, पोट वाढल्यामुळे कुसुमला उठायला बसायला थोडा त्रास जाणवायचा त्यातही रेवा सगळं करायची.

“ रेवा, बाळा किती करतेस माझ्यासाठी? तू हो थोडा आराम करत जा. दिवसभर माझ्या मागे मागे करत असतेस, तुला पण स्ट्रॉंग राहायला हवं की नाही, बाळ आल्यानंतर सगळं तुलाच करायचं आहे.”

कुसुमच्या बोलण्यावर रेवा फक्त असायची.

“खर सांगू का रेवा, आता माझाच मला हेवा वाटतोय. मिलिंदच्या वेळी असे भरभर दिवस गेले ना की मला काही कळलंच नव्हतं. पण आता मी एक एक क्षण अनुभवते आहे. थँक्स रेवा बाळा, आता असं वाटतंय तू माझी आई आहेस आणि मी तुझी मुलगी.” 

दोघीही खळखळून हसल्या.

असेच आनंदाने दिवस सरकत गेले.

थोडा शरीराला व्यायाम म्हणून रेवा आणि कुसुम संध्याकाळी पार्क मध्ये फिरायला गेल्या. रस्त्याने जाताना सगळ्यांच्या नजरा कुसुमच्या पोटावर होत्या. कुसुमला खूप ओक्वॉर्ड फिल होत होतं, पण रेवाकडे बघून ती सगळं विसरायची.

पार्क मध्ये बाकावर बसल्या, बाजूला बायांचा घोळका जमलेला होता. त्या सगळ्या कुसूमकडे बघत होत्या. 

त्यातली एक

“काय बाई, कश्या कश्या बाया असतात, त्यांना काही लाज शरम नाही, या वयात हे सगळं शोभतं का?”

“हो ना आपलं वय काय? आपण करतोय काय? कुठलं काही भानच नाही.” त्यातली दुसरी बाई

हे ऐकून कुसुमच्या डोळ्यात पाणी तरळलं.

रेवाने कुसुमकडे बघितलं, तिला डोळ्याने इशारा करत दिलासा दिला. आणि उठून त्या बायांकडे गेली.

“झाल्या तुमच्या चर्चा करून? जोपर्यंत तुमच्या सारख्या बाया या समाजात राहतील ना तोपर्यंत आपला समाज सुशिक्षित होऊच शकत नाही. किती बुरसटलेल्या विचारांचे आहात तुम्ही, एक बाई असून दुसऱ्या बाईचा प्रॉब्लेम तुम्हाला कळू शकत नाही.” रेवा

“ये कोण ग तू? आणि आम्हाला काय शहाणपण शिकवतेस?” त्यातली तिसरी बाई


“ज्या बाईला तुम्ही बोलताय ना. त्याच बाईची मी सून आहे. एक सासू म्हणून त्यांनी माझ्यासाठी जे केलंय ना ते तुमच्या विचाराच्या पलीकडे आहे. कारण तिथपर्यंत पोहोचण्याची तुमची कुवतच नाही. त्यांच्या जागी दुसरी सासू असती ना तर माझी सून मला नातवंड देऊ शकत नाही म्हणून मुलाचं दुसरं लग्न लावलं असतं. पण माझ्या सासूने तस नाही केलं, उलट त्या माझ्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. त्यांच्या पोटात जे बाळ वाढतंय ना ,ते माझं बाळ आहे. मी तुम्हाला हे का सांगतीय, तुमच्यात तर माणुसकीच नाही आहे.”

रेवाच्या बोलण्यावर सगळ्या बायांनी माना खाली घातल्या. आणि जमा झालेल्या सगळ्यांनी रेवासाठी टाळ्या वाजवल्या.

नातेवाईकही असेच बोलायचे, रेवा त्यांनाही असंच बोलून गप्प करायची


सहा महिने पूर्ण झाले. कुसुमला बाळाची हालचाल जाणवायची, बाळ कधी किक मारतं याची दोघ्या वाट बघत बसायच्या. रेवा कुसुमच्या पोटाला हात लावून अनुभूती घेण्याचा प्रयत्न करायची.

हसत हसत नऊ महिने पूर्ण झाले आणि डॉक्टरने डिलिव्हरी तारीख ठरवली.

डिलिव्हरीच्या दिवशी रेवा सकाळी लवकर तयार झाली आणि पूजा पाठ करून कुसुमच्या खोलीत गेली.

“आई आरती आणलीय, प्रसाद घ्या. तयार झालात ना? आपल्याला निघायचंय.” रेवा

“सगळं नीट होईल ना ग, मला भीती वाटातीय.”

“आई सगळं ठीक होईल.” तिघेही हॉस्पिटलला पोहोचले.”

.................

रेवाच्या खांद्यावर कुणीतरी हात ठेवला आणि रेवा भानावर आली.

बाजूला मिलिंद उभा होता.

चार दिवसानंतर हॉस्पिटलमधून सुट्टी झाली. रेवाने बाळाच्या आणि बाळाच्या आईच्या स्वागताची जय्यत तयारी केली.

मिलिंद आईला घेऊन घरी आला.

रेवाने दोघींना ओवाळलं.

रेवा कुसुमच्या पाया पडली आणि 

“आई मी याची परतफेड कधीच करू शकणार नाही आहे. आई कशी होऊ उतराई.”

दोघीही एकमेकींना बिलगल्या..


(समाप्त)


Rate this content
Log in