कर्तव्य !
कर्तव्य !
मेघा थोड्या नाखुशीनेच या कार्यक्रमाला सामोरं जायला तयार झाली . तिला बघायला पाहुणे येणार होते . येणारे पाहुणे काही अनोळखी नव्हते पण रीतसर मागणी घालून मुलगा आणि मुलीच्या पसंतीने लग्न व्हावे अशी मुलाच्या वडिलांची इच्छा होती .
मेघाच्या वडिलांचे बालमित्र रोहित काका , त्यांचा मुलगा ध्रुव आणि त्याची आई असे तिघे जण मेघाला बघायला येणार होते . मेघा लग्नाला तयार नव्हती . तिच्या वडिलांचे थोड्याच दिवसापूर्वी निधन झालेले , त्यांचा गारमेंटचा छोटासा कारखाना होता , तिथे वीसेक कामगार काम करत होते . वडीलांच्या निधनानंतर मेघाने त्या कारखान्याची धुरा सांभाळत ती त्या गरजू कामगारांचा आधारवड बनली होती .कारखान्याची हळू हळू प्रगती होत होती .तिच्या पप्पांचे मोठ्या कारखान्याचे स्वप्न तिला पूर्ण करायचे होते . तिच्या मनमिळावू आणि व्यवहारकुशल स्वभावाने ती कामगारांमध्ये अतिशय प्रिय होती . तिची कामगारांच्या प्रती असणारी तळमळ पाहून कामगार पण तिला योग्य ती साथ द्यायला कायम तयार असत .
अश्या परिस्थितीत मेघाला लग्नाच्या बंधनात अडकायचे नव्हते पण आईच्या सांगण्याला विरोध करणे तिला जीवावर आले होते म्हणून मग नंतर काय ते बघू या विचाराने ती तयार झाली .
ठरल्या वेळी ते तिघेही आले , बघायचा कार्यक्रम झाला आणि मोठ्या माणसांच्या सांगण्यावरून ते दोघेही एकमेकांसोबत बोलायला गच्चीत गेले .
दोघांनी एकमेकांना अगदी लहान असताना पाहिले होते . मोठे झाल्यावर ध्रुव परदेशात शिकायला गेला होता आणि त्याचे आईवडील सुध्दा दुसऱ्या शहरात शिफ्ट झाले होते . त्यामुळे तसा दोन्ही कुटुंबाचा संपर्क तुटला होता . मेघाच्या वडिलांच्या निधनानंतर पुन्हा एकदा ते संपर्कात आले होते . मेघाला पाहिल्यानंतर रोहित काकांना तिला सून करून घ्यायची इच्छा झाली . त्या दृष्टीने प्रयत्न करत शेवटी आज सगळा योग जुळून आला आणि ते दोघे एकमेकांसमोर आले होते .
जुजबी बोलणे झाल्यावर मेघा धृवला खाली चल म्हणाली .
दोघे खाली आल्यावर मेघा ध्रुवच्या आई वडिलांना म्हणाली , " काका , काकू मी सर्वात आधी तुमची माफी मागते कारण तुमच्या इच्छेचा मी मान ठेवू शकत नाही . मला आत्ताच लग्न करायचे नाही . मला माझ्या पप्पांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे , पप्पांच्या मागे कारखान्यात असणाऱ्या कामगारांवर काम बंद पडल्यामुळे उपाशी रहाण्याची वेळ आली होती . आत्ताच कुठे सारे सुरळीत चालू होत आहे . तो कारखाना , तिथले कामगार हे माझे प्रथम कुटुंब आहे , मी लग्न करून फक्त माझा स्वार्थ नाही बघू शकत . रादर मला माझ्या या लोकांसाठी अविवाहित राहायला सुध्दा आवडेल .माझा कारखाना माझे पहिले प्रेम आहे आणि त्यासाठी मी माझे सारे आयुष्य अगदी आनंदाने पणाला लावायला तयार आहे . त्यात मला कोणीही वाटेकरी आणायचा नाही . "
" तुम्ही मला समजून घ्या आणि मी लहान तोंडी मोठा घास घेतला त्यासाठी मला माफ करा . मी माझा निर्णय सांगितला आहे . माझी आज एक महत्त्वाची मीटिंग आहे त्यामुळे मला लगेच निघावे लागेल . "
एवढे बोलून मेघा तिच्या रूम मध्ये गेली आणि साडी बदलून साधा ड्रेस घालून बाहेर आली . सगळ्यांना परत एकदा नमस्कार करून आईच्या आणि देवाच्या पाया पडून मोठ्या आत्मविश्वासाने तिथून बाहेर पडली .
