Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Suresh Kulkarni

Others


3  

Suresh Kulkarni

Others


काली!

काली!

13 mins 1.4K 13 mins 1.4K

"बापरे, चष्मा फुटलाच कि !" आता त्याच्यावर, चुकून का होईना, बसल्यावर काय होईल ?

मला खूप लहानपणापासून चष्मा लागलाय, म्हणजे लावायला लागला. याला माझे क्रिकेटचे वेड कारणीभूत होते. असेन दहा बारा-वर्षाचा, फॉरवर्ड शॉर्ट लेग माझी फिल्डिंग पोझिशन, नेहमीचीच. तेव्हा आजच्या सारखी हेल्मेट्स नव्हती. त्या दिवशी काय झाले माहित नाही, बॉल बुलेटच्या वेगाने माझ्या डोक्यावर आदळला. खाली पडलो. हॉस्पिटल दोन दिवस कोमात होतो म्हणे. दोन दिवसांनी डोळे उघडले, तर अंधुक दिसू लागले. खूप तपासण्यांती पाऊण इंच जाडीच्या भिंगाचा, चष्मा डोळ्याला लागला ! वर 'नेहमी वापरा. काढू नका. नजर खूप कमजोर झालीय आणि ती सुधारण्याचा शक्यता शून्य आहे ! तेव्हा काळजी घ्या ! 'हा सल्लाही डॉक्टरांनी दिला. तेव्हा पासून म्हणजे, बारा पंधरा वर्षां पासून चष्मा वापरतोय. इमर्जन्सी साठी एक स्पेअर सेट ठेवतो. कारण याचे ग्लासेस पटकन मिळत नाहीत. आज नेमका स्पेअर सेटही कामी आला ! आता चार सहा दिवस घरीच राहावे लागणार. कालीला कळवू का ?नको. धडपडत येईल, ताडताड बोलेल. त्याच काही नाही म्हणा, पण तिला त्रास होईल, येण्या जाण्याचा. तिला त्रास देणं माझ्या जीवावर येतं. 


मी लेन्सकार्टच्या दुकानाला फोन करून, माझ्या ग्लासेसची स्पेसिफिकेशन्स दिली. चार सहा दिवसांनी डिलेव्हर करतो म्हणाला. 

मोबाईल वाजला. 

"हा बोल काली!"

"कुठे आहेस?"

"मी --मी. चेन्नईत आहे. मिटिंगसाठी आलोय ! चार दिवसात परततोय !"

"आला कि कळावं. वाट पाहतोय ! हा फार सिगरेटी फुंकू नकोस !"

"आग, मी सिगरेट सोडली -----"

तिने फोन कट केला. हि न अशीच आहे. निर्णय सांगून फोन बंद करते. ऐकून पण घेत नाही. मी तिला एकदा विचारलं पण होत, कि ती अशी का करतेस ? काय म्हणाली माहित आहे ? ' मला माहित असतं तू काय सांगणार ते !' काली म्हणजे कालिंदी. मी तिला कालीच म्हणतो. नावावर जाऊ नका, चांगला कोकणस्थी रंग आहे! ती खूप अपिलिंग, सेक्सी, आयटम वगैरे अजिबात नाही. पण ती खूप खूप लोभस आहे ! मला ती तशीच आवडते.  ती खूप वेगळी मुलगी आहे. तिला आणि मलाही आमचं प्रेम मिरवावे वाटत नाही. तीन वर्ष झाली, आम्ही एकमेकांना ओळखतोय. भेटतोय.  पण अजून एकदाही मी किंवा तिने I LOVE YOU म्हणलेले नाही. त्याची गरज आम्हास कधी पडली नाही आणि पडणार हि नाही!


                                                                              ००० 


चष्मा आला तसा, अधाशासारखा घराबाहेर पडलो. सी.सी.डे गाठून कालीची वाट पाहू लागलो. घड्याळात पहिले पाचचा सुमार होता. 

"कशी झाली मिटिंग?"

काली या स्काय ब्लु ड्रेस मध्ये काय क्युट दिसतीय!

"सुरश्या, मी काय म्हणतेय?"

" काले, तू खूप्प खास दिसतेस. "

"माझ्या प्रश्नाचं उत्तर ?"

" सॉरी, काले, माझी मिटिंग नव्हती ! माझा चष्मा फुटला होता ! तू धावत येशील म्हणून, मिटिं चा बहाणा ----- " मी दोन्ही कान पकडून तिची माफी मागितली. नाही, मला तिच्याशी खोटे बोलता येत नाही आणि मला ते खोटे लपवताही येत नाही. पटकन एक्सपोज होतो. 

"तुन खरच बावळट आहेस. अरे, हेच फोनवर सांगितले असतेस तर, भात -खिचडी नसती का आणली मी?"

"म्हणूनच नाही सांगितलं! "

कालीचा पटकन समजून घेण्याचा अन चटकन माफ करण्याचा गुण वाखाणण्याजोगा आहे. 

"बर, आधी ते डोळ्यावरच झापड काढ, मला तुझे डोळे पाहू दे! "

"अन ते कशाला? "

"हेच पाहायचाय कि तू इतके दिवस घरी काय करत होतास ? सिग्रेटी किती ओढल्यास ? काय दारू बिरू पिलास का?"

"मग मी सांगतो ना ? अन, तिथं तुला काय दिसणारय ?"

"नो ! मला तुझ्या डोळ्यात सगळं दिसतं ! " 

हि न बया ऐकायची नाही. हिला काय माझ्या डोळ्याचं वेड आहे माहित नाही. चार सहा दिवस झाले कि 'डोळे बघू .' म्हणते. मी चष्मा काढला. मला नजरेला काहीतरी वेगळं जाणवलं. पण कळालं नाही. कालिंदीचा चेहरा, चष्म्या शिवाय जरा स्पष्ट वाटला. 

"बापरे! सुरश्या, आज तुझे डोळे काय भयानक दिसताहेत?"

"का ग, काय झालं?"

"तुझे डोळे बघून मला आबाची आठवण होतीय!" आबा म्हणजे कालीचे आजोबा. जगाच्या पाठीवर मी, वॅनिला आईस्क्रीम, आणि आबा यांच्या इतके तिला काहीच प्रिय नाही. 

"आबा ?"

"हो, त्यांच्या कडे एक चांदीची डबी आहे. त्यात ते त्यांची काळपट तपकीर भरून ठेवतात. त्या तपकिरीच्या रंगाचे तुझे डोळे दिसताहेत ! पण आज न मला त्यात एक अजब निळसर झाक दिसली! "

"काले तू दिवसेनदिवस खोडकर होत चालीयस! कितीदा तरी माझे डोळे निरखून पाहतेस. दर वेळेस तुला काहीतरी नवच दिसत! मागल्या वेळेस 'काळेकुट्ट कावळ्या सारखे , आज काय तर तपकिरी वर निळसर झाक!"

"नाय रे, आज एकदम खर्र संगतीय!"

खूप गप्पा मारून, कोल्डकॉफी विथ आईस्क्रीम खाऊन (कि पिऊन ) काली निघून गेली. नवाचा सुमार झाला होता. काली सोबत वेळ कसा जातो कळत नाही. बहुदा आयुष्य कसे संपले हेही कळणार नाही!

मी सहज चष्मा डोक्यावर सरकवला. पुन्हा मघासारखेच काहीसे वेगळे जाणवले ! एस ! सभोवतालचं जग कृष्णधवल दिसत होते ! म्हणजे कलर ब्लाइंड झालो कि काय? पुन्हा चष्मा लावला, तर जग सामान्य ,विविध रंगातील !

                                                                        ०००        मग मला तो चाळाच लागला. आधन -मधनं मी चष्मा काढून पाहू लागलो आणि फरक मनात नोंदवू लागलो. या नोंदीतून मला विस्मयकारक वस्तुस्थितीची जाणीव होऊ लागली. चष्म्याशिवाय मला कृष्ण-धवल दिसतंय. दुसरा बदल जाणवू लागला कि वरचेवर अस्पष्टपणा निवळतोय! दृश्य सुस्पष्ट होत चालली आहेत ! पांढरा आणि काळा या पट्ट्यातले सर्व ग्रे शेड स्पष्ट दिसत होते ! जग, जुन्या सिनेमा सारखे काळे -पांढरे तरी रसरशीत आणि जिवंत दिसत होते! पण या शिवाय काही तरी जाणवत होते ! पण उमगत नव्हते. 


सकाळी दुधाची पिशवी आणायला मुद्दाम बिन चष्म्याचा गेलो. नो प्रोब्लेम ! रंगाशिवाय सबकुछ ओ के! संध्याकाळी पुन्हा 'नो ग्लासेस' ट्राय केले. चष्मा पुन्हा घातला, पुन्हा काढला. मग मात्र खात्रीच पटली ! सकाळ आणि संध्याकाळच्या ग्रे कलर मध्ये किंचितही फरक नव्हता ! रंगाची तीव्रता सारखीच होती ! म्हणजे --- या ग्रे कलरला --काळा वेळेचे बंधन नव्हते ? इतक्यात निर्णय नको रात्रीची नोंद घेऊन पाहू. माझा अंदाज खरा ठरला. रात्री पण दृश्यात सेम इंटेन्सिटी होती ! या शिवायही काही तरी आपल्या आकलनातून निसटतंय असे राहून राहून वाटत होते ! पण काय ?

                                                                    ०००           मी फोन करून कालीला हा प्रकार सांगितला . 

"ठीक आहे! मी अपॉइंटमेंट घेते ! तू टेन्शन घेऊ नकोस! "

"कसली अपॉइंटमेंट? डोळ्याच्या डॉक्टरची?"

" ना! सायकिऍट्रिसची!"

"काय?"

"मॅड झालास! म्हणे सकाळ, दुपार सारखाच दिसतंय!"

"काले ,खरं सांगतोय!"

"स्टुपिड! मॅडकॅप!"

तिने फोन कट केला. 

                                                                      ०००         माझ्या आकलनातून जे सुटतंय असे जे मला राहून राहून वाटत होते ते, अचानक मला जाणवले! आणि ---आणि ते सूर्यप्रकाश इतके मला स्पष्ट दिसत होते! प्रत्येक वस्तूला, मग ती सजीव असो व निर्जीव, प्रकाशात तिची सावली पडते. हे नैसर्गिक होते. तशा सगळ्यांच्या सावल्या मला दिसत होत्या. पण काही जणांना अजून एक सावली मला स्पष्ट दिसत होती! ती पांढऱ्या रंगाची होती! ती समोरच्या बाईला, कुत्र्याला, गाईला, माणसाला होती, पण लाईटच्या पोलला नव्हती, कारला नव्हती! म्हणजे पांढरी छाया फक्त सजीवांना होती! मी माझ्या समोर पहिले, माझे पांढरी छाया माझ्या समोरच्या बाजूस दिसत होती. मागे मान करून पहिले, मागे नेहमीची सावली होती. मला काय वाटले कोणास ठाऊक मी पूर्ण म्हणजे एकशे ऐन्शी कोनातून वळलो. आता दोन्ही -पांढरी आणि काळी छाया एकत्र होत्या! मी इतरांच्या पांढऱ्या छाया बारकाईने पहिल्या. माझा अंदाज खरा होता. काळी सावली प्रकाशाच्या दिशेवर अवलूंबून होती, पण पांढऱ्या छायेला प्रकाशाशी काही देणं घेणं नव्हते! ती त्या जिवाच्या समोरच्याच बाजूला पडत होती! 

पण हे - हे सार मलाच का दिसत होत?

                                                                     ०००           अर्धवट झोपेत होतो. अंतर्मन काळ्या -पांढऱ्या छायेच्या गुंत्यात काही तरी सुचवू पाहत होते. मधेच काली स्वप्नात दिसत होती. ती काय बोलतीय?

" सुरश्या, काळी सावली आपल्या भूतकाळाची असते!"

" मग, पांढरी?"

"तुलाच दिसतीय, तूच विचार कर!" ती खळखळून हसतोय! 

काळी जर भूत काळाची तर मग पांढरी वर्तमानाची? का भविष्य काळाची?

झोप आणि विचारांची शृंखला मोबाईलच्या आवाजाने तुटली. रात्रीचे तीन वाजले होते. 

" हा बोल. काली" असा अपरात्री काली कधीच फोन करत नाही. आम्ही रात्री नऊ ते सकाळी नऊ कधीच फोनवर भेटत नाही. 

" आबा दवाखान्यात ऍडमिट आहे! जिन्यातून पडलाय! तू ये! मी खूप घाबरलीय! आई-बाबा कोकणात गेलेत!"

" हॉस्पिटल बोल! आलोच! "

मी हॉस्पिटलला पोहचलो. घाबरी काली गळ्यात पडली. 

"काले, घाबरू नकोस! आपण करू सार नीट! " 

आबा डोक्याला बँडेज लावून सलाईनवर होते. प्रकृती 'स्टेबल ' असल्याचे डॉक्टर म्हणाले! पण धोका टळला नव्हता! 

मी कालिंदीच्या आई - बाबाना फोन केला. ते परत निघाले होते. दुपारी अकरा -बारा पर्यंत पोहचणार होते. मी कालीला घेऊन कँटीनला आलो. आम्ही कॉफी घेतली. मी आल्याने आणि कॉफीने काली थोडी स्थिरावली होती. 

"काले, आता कस वाटतंय?"

"तुला पाहिलं कि खूप धीर आला रे. "

 बाहेर आता फटफटलं होत. कॅन्टीन बाहेर मोकळ्या लॉन वर काही सिमिटाची बाकडी ठेवली होती. त्यातल्या एका बाकड्यावर आम्ही बसलो. समोरच्या झाडीतून कोवळी ऊन लॉनवर उतरत होती. 

मी समोर पहिले माझी आणि कालीची पांढरी छाया एकत्र दिसत होती! मी स्वतः शी हसलो. 

" का रे ? का हसतोयस ?"

"काही नाही, उगाच!"

" अन हे काय सुरश्या ? तू बिन चष्म्याचाच आलास ?"

" अग घाईत आलोना ! विसरलो!"

"ये ! ते बघ ! गुबगुबीत मांजर तुझ्या पाया जवळ बसलंय !"

मी पायाकडे पाहिलं. एक गोजिरवाणं, क्युट मांजर माझ्या बुटाला टेकून कोवळं ऊन खात होतं. मी हलकेच त्याला उचलून घेतलं. बापरे हे काय ? या मांजराला ती पांढरी छाया दिसत नाहीय! असे कसे ? मला आहे. कालीला आहे. मग या मांजरालाच का नाही ?  मांजराच्या देहाची उष्णता मला जाणवतीय, आणि तरी ---- का माझी थेयरी चुकतीय?

मी अचानक त्या मांजराला घेतलेलं त्याला आवडलं नसावं. त्याने फटक्यात आपला नख बाहेर काढलेला पंजा, माझ्या गालावर जोरकस मारला आणि जीव एकवटून माझ्या हातून सुटका करून घेतली. पण त्याचे दुर्दैव, त्याने जी उडी घेतली ती, नेमकी येणाऱ्या बाईकच्या चाकासमोर. पायाखाली एखादी वाळलेली फांदी यावी आणि ती मोडावी तसा आवाज झाला ! त्या आवाजाने माझ्या अंगावर सरसरून काटा आला ! क्षणापूर्वी माझ्या जे हातात होतं, ते क्युट मांजर मेल होतं ! 

"ई SSS !" दोन्ही हात कानावर ठेऊन काली किंचाळली. 

बापरे ! या मांजराला पांढरी छाया नव्हती ! म्हणजे त्याने भविष्य संपले होते ! काळाने डोळ्यादेखत झडप घातलीच ! माझ्या हाती थोडा वेळ ते विसावलं असता तर ? तर कदाचित जगलं असत ! 

" तू त्या मांजराला सोडायला नको होतं ! हा मला अपशकुन वाटतोय!" काली रडवेल्या सुरात म्हणाली. 

तेवढ्यात तिचा मोबाईल वाजला. 

"हॅल्लो ---आबा SSS ---" तीने आबाच्या वॉर्डकडे धावली. मीही मागे पळालो. 

आबाला व्हेंटिलेटर लावत होते. दोन्ही हातात सलाईनच्या सुया होत्या! डॉक्टरांची धावा -धाव वाढली होती! 

"व्हेरी सिरिअस! मे गो इन कोमा! " माझ्या प्रश्नार्थक चेहऱ्याला डॉक्टरांना खालच्या आवाजात उत्तर दिले ! काली तोंडात दुपट्ट्याचा कोंबून रडत होती! 

मी निरखून पाहिले. आबांची पांढरी छाया उघडझाप करत होती! काही क्षणात चमत्कार झाल्याप्रमाणे पांढरा ग्लो वाढू लागला ! त्या छायेची उघडझाप पूर्णपणे थांबली होती! 

मी कालीला हलकेच त्या रूमबाहेर काढले. दाराच्या बाहेरच्या खुर्चीत बसवले. 

" काले, बी ब्रेव्ह. अशी रडू नकोस ! मी काय सांगतो ते नीट ऐक. आजोबा शंभर टक्के बरे होणार आहेत ! आणि आपल्या पायानी चालत घरी जाणार! "

"खोटी आशा नको दाखूस ! आबा कोमात सरकतोय ! अन तू म्हणतोस चालत घरी जाणार! तू वेडा झालास!"

तेव्हड्यात कालीचे आई -बाबा आले. कालीने, रडण्याचा पहिला बहर सम्पल्यावर, सर्व घटना त्यांना सांगितल्या. 

" कालू, तू आता घरी जाऊन विश्रांती घे. आम्ही आहोत येथे. रात्रभर जागरण झालाय तुला. " कालीची आई म्हणाली. 

"काकू, मी कालिंदीला सोडतो घरी. "

"थँक्स, तुझी खूप मदत झाली." कालीचे बाबा मला म्हणाले. 

मी कालीला घेऊन घरी निघालो. एका उडपी हॉटेलसमोर गाडी थांबवली. काली नाही म्हणाली तरी तिला भूक लागलीच असणार. डोसा, कॉफी झाली. काली आई बाबा आल्याने थोडी स्टेबल झाली होती. तरी सिरीयसच वाटत होती. 

"काले, कम ऑन. आजोबाना काही होणार नाही! "

"कशावरून ?"

" माझे म्हणणे खरे झालेतर काय देणार?"

"काय देऊ?"

"माझ्याशी लग्न करशील?"

" बेवकूफ! --- नाही तरी तुझ्याशीच लग्न करणार आहे!"

                                                                 ०००              अर्थात माझे म्हणणे खरे झाले. दोन दिवसांनी आजोबा डॉक्टरांना आश्चर्यात टाकून, स्वतःच्या पायानी हॉस्पिटल बाहेर पडले! कालीच्या बाबानी गाडी आणली होती. कालीने आजोबाना मागच्या सीटवर बसण्यासाठी मदत केली. बाबा ड्रायव्हिंग सीटवर होते. गाडी निघाली की, मीही बाईकला किक मारणार होतो. काली आजोबा शेजारी बसण्यासाठी कारला वळसा घालून ड्राइव्हर साईडचे दार उघडण्याच्या बेतात होती. 

"काली SSS "मी ओरडलो. जिवाच्या आकांताने झेप घेतली! तिच्या कमरेला मिठी मारून तिला होईल तितक्या दूर लोटली! कारण तिच्या समोर तिची पांढरी छाया मला दिसत नव्हती ! मागून येणाऱ्या त्या काळ्या कारने मला उडवले ! मी आणि कालीच्या कारचे मागले दार काळ्या कारच्या बोनेटला लटकत होतो ! काली कपडे झटकत उठत होती! मी पाहिले माझी पांढरी छाया माझ्या सोबत नव्हती! ती --ती काली सोबत होती! आता तुमच्या पासून काय लपवू ? तिला ढकलताना मीच ती तिच्या सोबत दिली होती! ती आता तिच्या सोबतच राहणार होती ! मेंदूने कार्य थांबले आणि मी बॉनेट वरून गळून पडलो. माझी शुद्ध हरवली. 

                                                                       ००० 

चार दिवसांनी मी दवाखान्याच्या बेडवर डोळे उघडले. मल्टिपल फॅक्चरमुळे, मी इजिप्तच्या पिरॅमिडमधल्या ममी सारखा दिसत होतो. माझ्या बेड शेजारी काली बसली होती. मी डोळे उघडल्याच तिच्या लक्षात आलं. आस-पास कोणी नाही हे आधी तीन खातरजमा केली, मग हळूच आपल्या जागेवरून उठली आणि माझ्या चेहऱ्यावर झुकली---

" सुरश्या, तू मला ढकलून दिलंस आणि माझा जीव वाचवलास. तेव्हा पासून मला माणसांच्या दोन सावल्या दिसताहेत ! एक काळी अन एक पांढरी!" ती माझ्या कानात हळूच म्हणाली. 

मी वेड्या सारखा तिच्याकडे पाहतच राहिलो! Rate this content
Log in