STORYMIRROR

Pranali Kadam

Children Stories Drama Classics

4  

Pranali Kadam

Children Stories Drama Classics

इरा...

इरा...

5 mins
0



हा वर्षांची इरा नेहमीच थोडी लाजरी होती. तिला गर्दीपेक्षा शांतता जास्त आवडायची. शनिवारी शाळेला सुट्टी असते तेव्हा एका शनिवारी ती तिच्या आईसोबत जुन्या ग्रंथालयात गेली, तिथे तिला सर्वात शेवटच्या कोपऱ्यात एक निळ्या रंगाचे पुस्तक दिसले. त्यावर कोणतेही नाव नव्हते, फक्त एक चांदीची किनार होती. इराला ते पुस्तक खूप वेगळे वाटले. ते तिला आवडले, तिने ते पुस्तक विकत घेतले. 


घरी आल्यावर इराने पुस्तकावर आपले नाव लिहिण्यासाठी पेन उचलले. तिने पहिल्या पानावर 'इरा' असे लिहिले, पण आश्चर्य म्हणजे ते शाईचे अक्षर क्षणात गायब झाले. तिथे आपोआप काही शब्द उमटले, "तुझे स्वागत आहे, इरा! आज आपण कोणती सफर करायची?" इराचे डोळे विस्फारले.


इराने हळूच विचारले, "तू माझ्याशी बोलू शकतेस?" पुस्तकाच्या पानावर लगेच एका घनदाट जंगलाचे चित्र उमटले. त्या चित्रातून पक्षांचा किलबिलाट आणि पाण्याचा झुळझुळ आवाज येऊ लागला. इराला जाणवले की हे केवळ पुस्तक नाही, तर हे एक जिवंत जग आहे.


इराने आपली आई, सुमित्रा, हिला या पुस्तकाबद्दल सांगितले. सुमित्राला सुरुवातीला वाटले की हे इरेचे कल्पनाविलास आहे. जेव्हा तिने इराला त्या पुस्तकाशी हसताना आणि गप्पा मारताना पाहिले, तेव्हा तिला समजले की इराने एक खूप मौल्यवान मित्र शोधला आहे. ती त्या पुस्तकाशी मैत्री प्रमाणे बोलत आहे. आईला हे पाहून बरे वाटले. 


शाळेत समीर हा तिचा मित्र असतो, पण तो इराची सारखी मस्करी करत असतो. एक दिवस इरा शाळेत तेच पुस्तक घेऊन गेली होती तेव्हा शाळेत समीरने नेहमीप्रमाणे इराची मस्करी करायला सुरुवात केली,"काय ग, नेहमी ते जुने पुस्तक घेऊन काय फिरतेस? त्यात तर काहीच लिहिलेले नाही!" असे म्हणून त्याने इराच्या हातातून पुस्तक ओढण्याचा प्रयत्न केला. इरा घाबरली, पण तिने पुस्तक घट्ट धरून ठेवले



त्या दिवशी इरा खूप रडली. तिला समीरचा राग आला. घरी आल्यावर तिने आईला सांगितले, आईने तिला धीर दिला आणि तिला गप्प केले. तिला वाटले की ती सर्वांपेक्षा वेगळी का आहे? तेव्हा लगेच पुस्तकाने स्वतःहून एक पान उलटले. त्यावर एका छोट्या ताऱ्याची गोष्ट होती जो दिवसा दिसत नव्हता, पण रात्री सर्वात जास्त चमकत होता. पुस्तकाने इराला तिची किंमत समजावून सांगितली. इराला त्याने धीर दिला,"इरा घाबरू नको मी आहे तुझ्या सोबत", हे ऐकून इरा हसू लागली.



एके दिवशी बागेत खेळताना इराचे लक्ष विचलित झाले आणि ती तिचे पुस्तक बाकावरच विसरली. घरी आल्यावर तिला आठवण झाली,"अरे! आपण पुस्तक तिथेच विसरून आलो, आता तिथे असेल का?" हा विचार करून ती कासावीस झाली. बाहेर अंधार पडत होता, पण इरा धावत बागेत गेली. तिला वाटले जणू तिचा श्वासच हरवला आहे.



पण बाकाखाली एका कोपऱ्यात ते पुस्तक पडले होते ते तिला दिसले, थोडे धुळीने माखलेले होते. इराने ते उचलले आणि प्रेमाने आपल्या ओढणीने साफ केले. "मला माफ कर, मी तुला पुन्हा कधीच एकटे सोडणार नाही," ती पुटपुटली. पुस्तकाची पाने हळूच फडफडली, जणू ते म्हणत होते, "मी तुझी वाट पाहत होते."



आता इरा आणि त्या पुस्तकाचे नाते शब्दांच्या पलीकडे गेले होते. इराने आता स्वतःच्या कविता आणि स्वप्ने त्या पुस्तकात लिहायला सुरुवात केली होती. ती जेव्हा लिहायची, तेव्हा पुस्तकातील चित्रे तिच्या शब्दांना रंग द्यायची. ते दोघे मिळून एक नवीन जग रचत होते.



काळ बदलला, इरा मोठी झाली, पण तिचे आणि त्या पुस्तकाचे नाते कधीच जुने झाले नाही. जगासाठी ते एक साधे पुस्तक होते, पण इरासाठी तो तिचा आरसा होता, तिचा आधार होता. पुस्तक आणि मुलगी यांमधील हे अतूट नाते कायमचे टिकून राहिले.



हा वर्षे उलटली, छोटी इरा आता एक तरुण मुलगी झाली होती, पण तिचे ते निळे पुस्तक अजूनही तिच्या सोबत होते. तिने आपल्या आयुष्यातील प्रत्येक सुख-दुःख आणि पाहिलेली स्वप्ने त्या पुस्तकातील जादूच्या पानांवर शब्दांच्या रूपाने मांडली होती. तिच्यासाठी ते केवळ पुस्तक नव्हते, तर तो तिच्या आत्म्याचा एक भाग बनले होते



तिकडे समीरसुद्धा खूप बदलला होता. एकेकाळी पुस्तकांची मस्करी करणारा समीर आता एका मोठ्या शहरात साहित्याचा अभ्यास करत होता. लहानपणी इराच्या हातातून पुस्तक ओढण्याचा प्रयत्न केल्याची त्याला आता खूप लाज वाटत होती. त्याला उमजले होते की पुस्तके ही केवळ कागद नसून ती जगण्याची प्रेरणा असतात.



एका पावसाळी दुपारी, इरा जुन्या शाळेच्या ग्रंथालयात काही संदर्भ शोधायला गेली होती. तिथेच तिची आणि समीरची भेट झाली. दोघेही एकमेकांना पाहून थबकले. काळ बदलला होता, पण त्या जुन्या आठवणी अजूनही ताज्या होत्या. समीरने पुढे येऊन इराला हॅलो केले. तिने सुद्धा त्याला हॅलो केलं. 


समीरला अजूनही वाईट वाटत होते, जे लहानपणी आपण इराबरोबर वागलो होतो. मग समीर म्हणाला, "इरा, मला माफ कर. लहानपणी मी तुला खूप त्रास दिला. खरं तर, मला वाचायला खूप भीती वाटायची आणि म्हणून मी तुझी मस्करी करायचो. पण तुझे ते निळे पुस्तक पाहूनच मला पुस्तकांच्या जगाची ओढ लागली." समीरच्या डोळ्यांत पश्चात्ताप आणि प्रामाणिकपणा दिसत होता.



इराने हसून आपले ते निळे गुपित पुस्तक काढले आणि समीरसमोर ठेवले. "त्या पुस्तकानेच मला सावरले, समीर. तुला पाहायचे आहे का यात काय आहे?" तिने हळूच पुस्तक उघडले. पुस्तकातून एक सोनेरी प्रकाश बाहेर आला आणि अचानक ग्रंथालयात फुलांचा सुगंध दरवळू लागला. समीर ते पाहून आश्चर्यचकित झाला. त्याच्या चेहऱ्यावर दिव्य प्रकाश पडला होता. त्याला कळत नव्हते हे काय आहे.... त्याने इराला विचारले,"इरा हे काय आहे? ही तर जादू आहे!".


"हो, ही जादू आहे!"इरा म्हणाली 


"समीर हे बघ इथे, दिसले का तुला "


"हो दिसले इरा, हे खूप अमेझिंग आहे... it's miracle...wow! So so amazing!" समीर ते पुस्तक पाहून भारावला. 


पुढे पुस्तकाच्या पानांवरून आता अक्षरे नाचू लागली होती. त्यांनी समीरला त्याचे लहानपण दाखवले, त्याचे भय दाखवले आणि ते भय कसे दूर करायचे हेही सांगितले. समीरला जाणवले की हे पुस्तक केवळ इराचे नव्हते, तर ते अशा प्रत्येकासाठी होते ज्याला शब्दांची साथ हवी होती.



दोघांनी मिळून ठरवले की हे पुस्तकांचे जग सर्वांसाठी खुले करायचे. त्यांनी गरीब मुलांसाठी एक छोटेसे 'गोष्टींचे घर' सुरू केले. समीर तिथे चित्रे काढायचा आणि इरा त्या चित्रांना आपल्या जादूच्या पुस्तकातील शब्दांनी सजवायची. त्यांचे पुस्तकांशी असलेले नाते आता अधिक प्रगल्भ झाले होते.



काही वर्षांनी इराने स्वतः लिहिलेले पहिले पुस्तक प्रकाशित झाले. तिने त्याचे नाव 'निळे गुपित' असे ठेवले होते. तिच्या पुस्तकाच्या प्रकाशनाला समीरने सर्वात जास्त दाद दिली. इराने हे सिद्ध केले होते की, जर तुम्ही पुस्तकावर मनापासून प्रेम केले, तर ते पुस्तक तुमचे संपूर्ण आयुष्य बदलू शकते.



एक दिवस ग्रंथालयात अक्षय नावाचा एक छोटा मुलगा कोपऱ्यात बसून रडत होता. त्याला वाचता येत नव्हते. इरा त्याच्या जवळ गेली आणि तिने आपले ते जुने निळे पुस्तक त्याच्या हातात दिले. "हे घे, हे तुला रस्ता दाखवेल," ती प्रेमळपणे म्हणाली.


अक्षयने ते पुस्तक उघडले आणि पुन्हा एकदा त्यातून एक चांदीची चमक बाहेर आली. इराने दूरून पाहिले आणि तिला समजले की पुस्तकाची जादू कधीच संपत नसते; ती फक्त एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात असते. तिचे आणि पुस्तकाचे नाते आता अमर झाले होते. इरा खुश होती, ते पाहून समीर सुद्धा आनंदी होता. त्यांचे स्वप्न पूर्ण होत होते, पुस्तकाचे नाते जुळले जात आहे, अनंत काळापर्यंत ते जुळले जाणार होते. 

समाप्त.....

@® प्रणाली कदम 









Rate this content
Log in