Participate in 31 Days : 31 Writing Prompts Season 3 contest and win a chance to get your ebook published
Participate in 31 Days : 31 Writing Prompts Season 3 contest and win a chance to get your ebook published

नासा येवतीकर

Children Stories


2  

नासा येवतीकर

Children Stories


गोट्या

गोट्या

5 mins 423 5 mins 423

आज दूरदर्शनवरील पुनः प्रक्षेपित होत असलेले रामायण मालिका पाहतांना गोट्याला म्हणजे सोहमला त्याचे 20-25 वर्षापूर्वीचे बालपण आठवून गेले. कोरोना विषाणूमुळे संपूर्ण भारतात लॉकडाऊन झाले होते. कोणीही घराबाहेर पडू नये, घरातच राहावे म्हणून सरकारने सक्तीचे आदेश काढले. घरात बसून बसून लोकांना कंटाळा येऊ नये म्हणून सरकारने पुनश्च एकदा जुनी मालिका रामायण दाखविण्यास प्रारंभ केले होते. आज ती रामायण मालिका पाहतांना गोट्याला ती मजा येत नव्हती, जी मजा त्याने लहानपणी अनुभवली. तो आपल्या भूतकाळात रमला. खरं तर त्याचे नाव सोहम होते पण घरात, दारात, गल्लीत सर्वत्र तो गोट्या या नावानेच प्रसिद्ध होता. त्याला ही कारण ही तसेच होते. सोहम अगदी लहान म्हणजे शाळेत जाण्याचे वय नसल्यापासून गोट्या खेळायचा. गोट्या असा खेळायचा की त्यात त्याचा विजय ठरलेला असायचा. त्याच्या खिशात नेहमी गोट्या असायच्या म्हणूनच त्याचं नाव गोट्या पडलं होतं. खूप वेळा त्यासाठी त्याला आई-बाबांच्या शिव्या देखील खाव्या लागल्या.


त्याचे वडील एका सरकारी शाळेत शिक्षक होते, त्यांची आणि गोट्याची भेट रविवार ते रविवारीच व्हायची. आई घरकाम आणि शेतीकम करायची. गोट्यापेक्षा एक मोठी बहीण होती. असे इनमिन हम दो हमारे दो असा त्यांचा परिवार होता. गोट्या घरात लहान असल्यामुळे सर्वजण त्याच्यावर जीवापाड प्रेम करायचे आणि तो देखील रडून रडून आपला हट्ट पूर्ण करून घ्यायचा. गोट्याचे शाळेत जाण्याचे वय झाले होते मात्र तो काही शाळेत जाण्यास तयार होत नव्हता. त्याची मोठी बहीण चौथ्या वर्गात शिकत होती. शेवटी एके दिवशी तिने गोट्याला घेऊन शाळेत गेली आणि त्याचा शाळेचा प्रवास सुरु झाला. सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे गल्लीमधले पाच सहा मुलं त्याच्या वर्गात त्याला दिसली त्यामुळे अजून आनंद वाटला. ते सर्वच मित्र मिळून शाळेत अनेक खेळ खेळू लागले, सोबत गोट्याचा खेळ देखील होताच. शाळेतून घरी आलं की दप्तर फेकून द्यायचं आणि खेळायला बाहेर जायचं हा त्याचा रोजचा दिनक्रम असे. दिवेलावणीच्या वेळी घरी यायचे, हातपाय धुयायचे, शुभम करोती म्हणायचं आणि जेवण करून झोपी जायचं. सकाळी उठलं की परत थोडा वेळ खेळायचं आणि स्नान करून शाळेला जायचं, या रीतीने तो हळूहळू मोठा होऊ लागला.


शाळेच्या अभ्यासापेक्षा त्याचा खेळण्यावर जास्त लक्ष होता. घरी येऊन त्याने कधी ही पुस्तक उघडून अभ्यास केला नाही त्यामुळे आईला त्याची काळजी वाटायची. चौथी बोर्ड परीक्षेच्या काळात त्याने अभ्यासाकडे लक्ष द्यावे म्हणून आईने विशेष करून वडिलांनी कडक सूचना केली. थोडा खेळ कमी करून त्याने बोर्डाचा अभ्यास केला आणि प्रथम श्रेणीत उत्तीर्ण देखील झाला. त्यापुढील शिक्षणासाठी शेजारच्या गावात जावे लागत असे. तो देखील त्या गावी जाण्यासाठी तयार झाला. तीन किमीवरच्या शाळेत काही मित्रासोबत चालत जायचा. त्या गावात एका श्रीमंत व्यक्तीच्या घरी एक टीव्ही होती. नुकतेच रामानंद सागर यांचं रामायण ही मालिका चालू झाली होती. ती मालिका दर रविवारी सकाळी नऊ वाजता दाखविल्या जायचे. गावात तर कोणाच्या घरी टीव्ही नव्हती. सुट्टी असून देखील गोट्या रामायण मालिका बघायला त्या गावात जायचा. छोटंसं घर सर्वजण दाटीवाटीने बसून बघायचे. मालिका संपल्यावर घराचा रस्ता धरायचा. रस्त्याने मग त्याच मालिकेविषयी चर्चा व्हायची. घरात कोणाला कळू नये म्हणून बॅट बॉल सोबत घेऊन जायचं आणि कोणी विचारलं कुठं गेला होता तर उत्तर ठरलेलं असायचा क्रिकेट खेळायला. रामायणची प्रसिद्धी पाहून त्या गावातील एकाने कलर टीव्ही आणली आणि रामायण बघायला पैसे लावले. कलर टीव्ही बघण्याची हौस पूर्ण करण्यासाठी सर्व मित्र एकत्र येऊन पैसे जमवायचं आणि कलर टीव्हीवर रामायण बघण्याचा आनंद घ्यायचा. एक दोन वर्षात मग गावातच एकाने टीव्ही आणली मग बाहेर गावी बघायला जाणे बंद झाले. मात्र शाळा बुडवून फिल्म बघण्याचा सपाटा चालू झाला. या शाळेत मात्र काही कडक शिस्त होती. रोज दोन वेळा हजरी व्हायची. अपसेन्ट असलं की दुसऱ्या दिवशी हातावर छडी पडायची. रोज वही पूर्ण करणे, शब्द पाठ करणे, शुद्धलेखन लिहिणे ही कामे करावे लागत असे त्यामुळे त्याला गोट्या खेळायला खूपच कमी वेळ मिळत असे. तरीदेखील तो गोट्या खेळणे सोडत नसे. रिंगणात सर्व गोट्या टाकायचे आणि सांगितलेली गोटी उडवायची, एक खोल गड्डा करायचा त्यास गल म्हणायचे, रेषेच्या आत सर्व गोट्या टाकायचे, गलीत जर गोटी पडली तर तीन वेळा मारण्याची संधी मिळायची अन्यथा एक वेळा. असेच दोन गल असलेला खेळ असायचा, त्या खेळात दोन्ही गल मध्ये एक एक गोटी पडली तर सर्व गोट्या जिंकले जायचे. या सर्व खेळात नेम धरून गोटीला मारणे खूपच महत्वाचे असायचे आणि त्यात गोट्या खूपच तरबेज होता. त्यानंतर हाताच्या मधल्या बोटाने टिचकी मारण्याचा खेळ कोण्या तरी झाडाखाली किंवा पडवीमध्ये रंगात यायचा. राजा राणी, टिक बॉम्ब, आस यासारखे अनेक खेळ गोट्या सहज जिकायचा. त्यामुळे सहसा कोणी ही त्याच्या सोबत खेळायचं नाही. म्हणून तो आपल्या पेक्षा मोठ्या असलेल्या मुलांसोबत खेळायचा. त्यांना ही जिंकू द्यायचा नाही. त्यामुळे अनेकदा वाद आणि भांडणं व्हायची. फक्त हेच नाही तर विटी दांडू, भोवरा, क्रिकेट यांसारखे खेळ देखील खेळायचा. त्याचा नेम सर्वात चांगला असल्यामुळे तो शक्यतो हारायचा नाही. घरात जे काही रिकामे डबे होते त्यात नुसत्या गोट्याच होत्या. गोट्यामुळे एक फायदा झाला. त्याचं गणित विषय खूप पक्के झाले. शंभर पर्यंतची अचूक गिणती असेल, मिसळणे म्हणजे बेरीज करणे आणि काढून टाकणे म्हणजे वजाबाकी करणे या क्रिया अचूक सोडवू लागला. एका काचेच्या भरणीत तो पन्नास गोट्या टाकून ठेवायचा आणि दुकानात ते दिल्यावर त्याला पंचवीस पैसे यायचे. यामुळे त्याला गुणाकार देखील चांगले जमू लागले.


इतर विषयापेक्षा गणित त्याला जास्त आवडू लागले. दुकानात पैश्याला एक गोटी मिळायची आणि हा मित्रांना आणि दुकानात देखील पैश्याला दोन गोट्या देऊन पैसे गोळा करायचा. गोट्या खेळता खेळता त्याला पैसे खेळायचा नाद लागला. पैसे मिळावे म्हणून आईचे ही लहान मोठे काम करून पैसे मिळवायचा. शाळा सुटल्यावर शेण गोळा करणे, हौदात पाणी भरून ठेवणे, दळण दळून आणणे असे काम तो मदत म्हणून नव्हे तर पाच-दहा पैसे आईकडून मिळविण्यासाठी करायचा. हे पैसे घेऊन मोठ्या मुलांसोबत आणि माणसासोबत तो पैसे ही खेळू लागला. ही गोष्ट जेंव्हा त्यांच्या वडिलांच्या कानावर गेली. तसे त्याचे वडील त्याच्यावर खूप रागावले. हा असाच खेळत राहिला तर वाया जाईल म्हणून त्यास शहरातल्या शाळेत नेऊन टाकले. येथून गोट्याचे जीवन पार बदलून गेले. त्याला खेळायला कोणी साथीदार मिळत नव्हता. सर्वच मुले शाळा आणि घर यातच व्यस्त असायची. तो गावी आला की मनसोक्त खेळायचा आणि परत शहरातल्या शाळेत जायचा. याचठिकाणी त्याला अभ्यासाचे मर्म कळाले. तो हळूहळू आपला खेळ कमी केला आणि अभ्यासात लक्ष द्यायला लागला. दहावीची परीक्षा विशेष श्रेणीत पास झाल्यामुळे शाळेत त्याचा सत्कार झाला होता. त्याचे जे साथीदार गावात राहिली ते गोट्याच्या यशाकडे आश्चर्याने पाहू लागली. तो मात्र या यशात खेळाचेच गमक आहे असे मनाला सांगत होता. खेळामध्ये जी जिद्द, चिकाटी, संयम आणि अवधान होतं, त्याचाच वापर अभ्यासात केल्यामुळे हे यश मिळविता आलं असा तो आपल्या भाषणात बोलताना सांगितले. चला जेवायला बसा या आवाजाने तो शुद्धीवर आला. खरोखरच लहानपणीचे दिवस सोन्याचे होते, आज ती मजा नक्कीच नाही असे मनात म्हणत तो जेवायला बसला.


Rate this content
Log in