Unveiling the Enchanting Journey of a 14-Year-Old & Discover Life's Secrets Through 'My Slice of Life'. Grab it NOW!!
Unveiling the Enchanting Journey of a 14-Year-Old & Discover Life's Secrets Through 'My Slice of Life'. Grab it NOW!!

Gauri Kulkarni

Others

4.5  

Gauri Kulkarni

Others

दोन शब्द कौतुकाचे

दोन शब्द कौतुकाचे

4 mins
556


निखिलने लहानपणापासून आईवडील, आजीआजोबा सगळ्यांनाच दुसऱ्याचं भरभरून कौतुक करताना बघितलं होतं. म्हणजे ते उठसुठ कुणाचंही कौतुक करायचे अस नाही. पण जो खरंच काहीतरी छोटीशी का होईना कृती करतोय त्याचं ते कौतुक करायचे. पण ते सुद्धा असं की समोरच्याच्या डोक्यात हवा न जाता तो अजून अजून चांगलं वागण्यासाठी प्रयत्न करेल. निखिलला कळू लागलं तसा तो सगळ्यांना हा प्रश्न विचारायचा की समोरचा तर आपल्या बाबतीत चांगलं बोलत नाही किंवा खूप कमी बोलतो मग आपणच अस का करायचं??? तेंव्हा त्याचे आजोबा त्याला समजावून सांगत की,"समोरचा आणि आपण ह्यात हाच तर फरक आहे. आपण आपल्या डोळ्यांना, कानांना, मनाला फक्त चांगलं बघण्याची, ऐकण्याची आणि करण्याची सवय लावली आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टीत आपल्याला काही न काही चांगलं नक्की सापडतं. त्याचा खूप फायदा होतो बघ निखिल. आपण जेव्हा समोरच्या व्यक्ती मधून चांगलंच वाचतो न तेव्हा आपल्याकडे फक्त चांगलंच येतं. मग त्याच्यात नी आपल्यात बाकी पातळ्यांवर किती का फरक असेना आपल्या मनात त्याच्याविषयी नको ते विचार येतच नाहीत. सो आपण खुश राहतो हा झाला आपला फायदा.


आता जेव्हा आपण एखाद्या चांगल्या गोष्टी साठी त्या व्यक्तींचं मनापासून कौतुक करतो तेव्हा नकळत का होईना ती व्यक्ती सुखावते. त्यामुळे होत काय तिच्याही मनात आपल्याबद्दल चांगली भावना निर्माण होते. आणि त्याबरोबर ती अजून चांगलं काम करण्यासाठी तयार होते आपोआपच. अर्थात हे सगळं सगळ्यांच्या बाबतीत लागू होईलच अस नाही पण आपण मात्र आपलं काम करायचं. काही जणांना आपण जेन्यूईन आहोत हे लगेच कळतं काहींना उशिरा. पण कळतं हे नक्की आणि ह्या कौतुक ट्रॅकवर राहिल्याने आपल्या आयुष्याची गाडी मस्त चालते. कधी कधी ना माणसाला फक्त कौतुकाची गरज असते आयुष्यातल्या सगळ्या गोष्टींना तोंड देण्यासाठी. आपण फक्त न मागता देत राहायचं त्याला कुठे खर्च येतो??? तुला एक गंमतही सांगतो कौतुक करण्याची सवय लागली की तू पुढे विसरूनही जाशील कुणाला कौतुकाने काय बोलला होतास, पण हे समोरची व्यक्ती मात्र कधीच विसरणार नाही बघ. आणि कधीतरी अचानक आलेल्या वळणावर तुला ह्या कामाची फळं मिळत जातील न मागता."     ह्यातल्या काही गोष्टी निखिलला समजल्या काही नाही, पण आजोबांनी जे काही सांगितलं ते मात्र त्याच्या मनावर कोरलं गेलं होतं. जसं आपण म्हणतो की मुलं अनुकरणप्रिय असतात तसच काहीस पुढे निखिलच्या बाबतीत घडत गेलं. घरच्यांनी केलेले हे संस्कार त्याला उत्तम माणूस म्हणून उपयोगीपडत राहिले. पण आजोबांचं एक वाक्य मात्र त्याला अजूनही पटलं नव्हतं ते म्हणजे की,"अचानक आलेल्या वळणावर तुला ह्या कामाची फळं मिळत जातील न मागता." ते कसं होणार ह्याचा विचार कधीतरी त्याच्या मनात डोकवायचाच. त्याचीही प्रचिती त्याला आलीच लवकर. काही दिवसांनी तो ऑफिसमध्ये असताना त्याला एक फोन आला की तुमच्या आजोबांना चक्कर आल्याने ते फिरायला गेले असताना पडले आणि लोकांनी त्यांना जवळच्याच हॉस्पिटलमध्ये भरती केलं आहे. नेमके आईबाबा आणि आजी नसताना हे झाल्याने निखिलच्या लक्षात येईना काय करावे. तो तसाच हॉस्पिटलमध्ये पोहोचला पण तिथे जाऊन बघतो तर काय आजोबांवर आधीच उपचार सुरू केले होते. काहीतरी गुंतागुंत झाल्याने अर्जंट ऑपरेशनही करणे गरजेचे होते. त्याची प्रोसिजर पूर्ण करून डॉक्टर फक्त निखिलच्या सहीसाठी थांबले होते.


निखिल डॉक्टरांच्या केबिनमध्ये गेला आणि डॉक्टरांना बघताच त्याला आठवले की हा तर गावी आपल्या शेजारी राहणारा सूरज तो दहावीत नको त्या मुलांच्या नादी लागला होता. हे जेंव्हा त्याच्या घरी कळालं तेव्हा खूप मारलं होतं त्याच्या बाबानी त्याला. पण निखिलच्या आजोबांनी मध्ये पडत त्याच्या बाबांना समजावलं आणि एक संधी दे मुलाला असही सांगितलं. आजोबांच्या शब्दाखातर सुरजचे वडील तयार झाले. मग आजोबांनी सुरजला वेगळे घेऊन प्रेमाने समजावून सांगितले. काही दिवस सतत आजोबा त्याच्याशी बोलत. आजोबांच्या बोलण्याची पद्धतच अशी होती की सूरजच मन बदलून गेले. त्याने मन लावून अभ्यास केला अर्थातच मार्कही उत्तम मिळाले आणि त्याच वर्षी बदली झाल्याने ते सगळे दुसरीकडे शिफ्ट झाले. त्यानंतर आजच तो निखिलला भेटत होता आणि तेही एका निष्णात सर्जनच्या रूपात. आजोबांचं ऑपरेशन उत्तमरीत्या पार पडले. निखीलसह सगळेच चिंतेत डॉ ची वाट बघत होते. डॉ. सूरज समोर येताच सगळ्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. तसं त्याने हसत हसत सांगितले की आजोबा आता ठीक आहेत काळजी करू नका. फक्त शुद्धीवर येण्यासाठी वेळ लागेल. त्यानंतर मात्र तो आजीकडे वळला धीर गोळा करून इतका वेळ आजी कशीबशी शांत उभी होती. सूरज त्यांचे हात हातात घेऊन म्हटला, आजी आज मी जो काही आहे तो फक्त तुम्हा दोघांमुळे त्यावेळेस मला सावरत, वेळोवेळी कौतुक करत तुम्ही जर मला योग्य मार्गावर आणले नसते तर मी आज कुठेतरी हरवलेला असतो. मग अशा आजोबांना मी कसं बरं काही होऊ दिलं असतं? सगळ्यांच्याच मनाला ह्या कृतीने खूप आधार मिळाला. 


काही वेळाने आजोबा शुद्धीवर आले हे एक चांगल लक्षण होतं त्यांच्या रिकव्हरीच. थोड्याच दिवसात ते नीट फिरूही लागल्याने घरी आले. एक दिवस असच शांत बसलेले असताना त्यांनी निखिलला विचारलं काय रे मग मिळालं का तुझ्या प्रश्नाचं उत्तर? तसा निखील हसू लागला. तात्पर्य काय, तर कुणी कसंही असू दे, वागू दे आपण मात्र आपल्या मनाला लागलेली चांगली सवय सोडायची नाही. कळत नकळतपणे होत गेलेल्या चांगल्या कृतीचं फळ योग्य वेळी योग्य स्वरूपात मिळतंच हे नक्की. कौतुक केलं जाणं ही खूप महत्त्वाची भावना असते प्रत्येक व्यक्तीसाठी. कौतुक करताना ते अर्थातच मनापासून असेल तर समोरच्या माणसाला त्यातला खरेपणा जाणवतोच. तर थोडंस ट्राय करून बघू इतरांचं, त्यांच्या योग्य कामाचं कौतुक करू आणि ते ही वेळेवर. कोण जाणे कधीतरी तो वर बसलेला आपल्या नावाचा कौतुकाचा ब्लॅंक चेक कुणाहाती पाठवेल.


Rate this content
Log in