kanchan chabukswar

Others

4.5  

kanchan chabukswar

Others

धडपड

धडपड

8 mins
533


डॉक्टर निंबाळकरांच्या हॉस्पिटलमध्ये नुकतीच सुहासिनी रिसेप्शनिस्ट म्हणून लागली होती. डॉक्टरांचा हॉस्पिटल चार मजली मोठं, डॉक्टर स्वतः हृदयाचे विकार ठीक करण्यामध्ये निष्णात, तर डॉक्टरीणबाई स्त्री रोग तज्ञ. चार मधल्या मध्ये खालचे दोन मजले डॉक्टरीन बाईंचे तर वरचे दोन मजले डॉक्टरांच्या पेशंटचे.


सुहासिनी काही नर्स नव्हती किंवा कुठल्या स्पेशलायझेशन करून पण आली नव्हती, चार बहिणी मधली तीन नंबरची बहिण, हुशार, तारतम्य बाळगणारी, कष्टाळू, आणि चुणचुणीत, सध्या बीकॉम च्या तिसऱ्या वर्षाला शिकत होती. तसं बघितलं तर कॉमर्स आणि मेडिसिन यांचं काहीच नातं नव्हतं. पण साधी हिशोब बघणे, पेशंटच्या नोंद ठेवणे,, बिल बनवणे, इत्यादी बरीच सटरफटर काम म्हटलं तर महत्त्वाची म्हटलं तर नाही अशी सगळी कामं सुहासिनी सध्या करत होती. कामाच्या मध्ये वेळ मिळाला कि ती डॉक्टर यांच्या हाताखाली हॉस्पिटलमध्ये पेशंटची हालचाल पण विचारत होती. सुहासला डॉक्टर बाईंच्या मजल्यांवर फार मजा येई, तिचं मन तिथे रमत असे, आणि सगळ्यात जास्त मजा म्हणजे खूप पेढे खायला मिळत. बाळ झालं की बाळाचे बाबा आजी आजोबा हॉस्पिटल च्या सगळ्या नर्सेस ना आणि स्टाफला पेढे वाटत. त्याच्या उलट वरती डॉक्टर यांच्याकडे सगळे लांब चेहऱ्याचे पेशंट, त्यांचे नातेवाईक देखील तसेच.


सुहासिनी डॉक्टरांची अतिशय लाडकी होती, पटपट काम करण्यात ती तरबेज होती.


मुळामध्ये सुहासिनी ला घरी जाण्या मध्ये काहीही रुची नव्हती, म्हटलं तर दिवसाचे 12 तास देखील ती हॉस्पिटलमध्ये थांबायला तयार असायची. कारण असं होतं ना.

मोठी बहीण सुमती त्यांच्या गल्ली मधल्या पंचर काढणाऱ्या रमेश बरोबर पळून जाऊन लग्न करून बसली होती. आई-बाबांनी एक तिचा उल्लेख घरात करायचे टाळले. बघून बघून काय बघितला तर पंक्चर काढणारा रमेश.

 सुमती नंतर सुरेखा, तिचं पण तसंच, 22 वर्षाची झाली झाली, सगळं शिक्षण फुकटच केलं, कष्ट करून, स्वतःची फी मुली स्वतः भरत होत्या. उरलेले पैसे आईच्या हातावर ठेवत होत्या. पण घरामध्ये आई आणि बाबा कोणाच्याही लग्नाचं नावच घेत नव्हते.

तिने पण स्वतःचा मार्ग निवडला, एक दिवशी चक्क कम्प्युटर क्लास मध्ये शिकवणाऱ्या सुरेश ला घेऊन ती घरी आली. सुरेश ला बघून बाबांनी तर आकाशपाताळ एक केले,

"दिसायला बेकार आहे, जास्त काही कमवत नाही, असली प्रेम प्रकरण चालणार नाहीत "असं म्हणून घरामध्ये गोंधळ घातला. पण सुरेखाने ठरवून ठेवलं होतं, जातीबाहेर असला तरी तो एक चांगला मुलगा होता. त्याची स्वतःची खोली होती, ठीक ठाक कमवत होता, मुख्य म्हणजे निर्व्यसनी होता.


  एक दिवस रात्री सुहासिनी ला जाग आली, सुरेखा आपली पिशवी भरून कुठेतरी निघाली होती, सुहासिनी उठलेली बघून तिने तिला शपथ घातली. शेजारीच पलंगावर वडील झोपले होते त्यांनी तोंडावर चक्क पांघरून घेतलेलं होतं. खुडखुड आवाजा आला तरीपण आई पाठ वळवून झोपून गेली होती. सुरेखाने देवाला नमस्कार केला सुहासिनीचा गोड पापा घेतला आणि हलकेच दार उघडून ती निघून गेली.


 हळूच खिडकितुन बघितलं तर रिक्षामध्ये सुरेश तिची वाट बघत होता. रीतसर दोघांनी देवळामध्ये जाऊन लग्न केलं आणि गल्लीतलं घर सोडून दुसरीकडे राहायला निघून गेले. तेव्हापासून सुरेखा परत घरी आली नाही.

  नेहमी लवकर उठणारी आई त्या दिवशी मात्र झोपूनच राहिली होती. बाबा हि उशिरा उठले.

त्या दोघांची काम शांतपणे चालू होती जणू काही काही झालंच नाही. शेवटी सकाळी नऊ वाजता जशी सुरेखा घरात दिसेना तसं बाबांनी आईला विचारलं," सुरेखा क्लासला गेली का ग?"

" गेली असेल बहुतेक, आज तिचा एक पिरेड होता म्हणत होती." आई सपशेल खोटं बोलत होती.

दुपारी बारा वाजता शेजारच्या अण्णांकडे फोन आला, फोनवरती सुरेखाने आपल्या आणि सुरेश च्या लग्नाची हकिकत अण्णांना सांगितले आणि घरी सांगण्यास सांगितले.

" दुसऱ्या ही कारटी ने तोंडास काळे फासले" असं म्हणत बाबांनी परत खूपच गहजब केला.

" आम्ही लग्नासाठी मुलं बघत होतो आज कालच्या पोरींना फार घाई झाली आहे." असं काही बाही खोटंनाटं बोलून आक्रस्ताळेपणाने बाबांनी घर डोक्यावर घेतले. आई ने डोळ्याला पदर लावला. दुसरीही चिमणी घरट्यातून उडून गेली.


  डॉक्टर निंबाळकर यांच्याकडे आई स्वयंपाक करायला जात होते त्यांच्या देखरेखीखाली म्हणून सुहासिनी ला हॉस्पिटल मध्ये कामाला तिने लावून दिली.

 धाकटी सुचित्रा अजून शाळेत जात होती त्यामुळे तिच्या बाजूने आई-बाबांना काहीच काळजी नव्हती. शिक्षण मुलींचे म्हणून फुकटच होतं. आता खाणारी तोंड पण कमी झाली होती, खरं म्हणजे निमा स्वयंपाक एकटे बाबा जेवत होते.

आम्हा मुलींच्या वाट्याला उरलंसुरलं आणि आईला तर कधी कधी काहीच नसायचं.


   त्या दिवशी रात्री बऱ्याच उशिरा पर्यंत सुहासिनी सुचित्रा चा अभ्यास घेत होती त्यानंतर आईने केलेल्या पिठल्याची भात खाऊन दोघीजणी झोपून गेल्या. मध्यरात्रीनंतर केव्हातरी बाबा घरी आले. आईने पटकन गरम भात लावला आणि जेवायला वाढले.

" सुहासिनी ला किती पगार देतात ग?" बाबा विचारत होते.

" तिच्याकडे नीट लक्ष ठेव पोरगी मिळवत आहे पळून जाता कामा नये." बाबा जरा जोरातच आईला सांगत होते. आम्ही दोघी झोपलो असं वाटून आई आणि बाबांचं बोलणं चालू होतं.

" आता तरी या उरलेल्या दोघींची व्यवस्थित लग्न लावून देऊ या ना?" आई रडवेल्या स्वरात विचारत होती

" कशाला? हुंडा कुठून आणायचा? तुला काय वाटतं सुमती पळाली ते मला कळलं नसेल? आणि सुरेखा जाताना मला काहीच वाटलं नसेल? चार चार मुली जन्माला घालून बसलो आपण , मी एकटा कुठे पुरे पडणार ग?" बाबांच्या आवाजात एकदम नरमाई होती.


सुहासिनी ला तर आश्चर्याचा धक्काच बसला. म्हणजे तो राग तो आक्रस्ताळेपणा सगळं नाटक होतं तर.


   सध्या डॉक्‍टरांच्या हाताखाली म्हणून एक 35 वर्षाचे नवीन डॉक्टर आले होते. सुहासिनी जेव्हा डॉक्टरांना हिशोब द्यायला म्हणून त्यांच्या केबिनमध्ये गेली तेव्हा तिथे एक मध्यमवयीन गृहस्थ बसून त्यांचे रिपोर्ट ऐकत होते.

ते मध्यमवयीन गृहस्थ आता कायमच चेकअपसाठी डॉक्टरांकडे येऊ लागले. बोलता-बोलता कळलं की त्यांची बायको गेल्याच वर्षी निवर्तली आहे आणि मुले परदेशात आहेत. ब्लड प्रेशर च्या समस्येमुळे त्यांच्या मुलांनी डायरेक्ट डॉक्टर निंबाळकरकडे त्यांच्या अपॉइंटमेंट घेऊन ठेवल्या होत्या. त्यानुसार ते दर आठवड्याला डॉक्टरांकडे येत होते.


त्यांचा ब्लडप्रेशर घेणे, जुजबी तपासण्या करणे हे सर्व काम आता सुहासिनी कडे आलं होतं. त्यांच्या औषधांची फाईल देखील सुहासिनी व्यवस्थित ठेवत होती. कधीकधी श्रीकांत यांच्याकडे घरी देखील जाऊ लागली. श्रीकांत यांना दोन मुलगे, दोघेही अमेरिकेमध्ये शिक्षणासाठी गेले होते. श्रीकांत यांचं इंडस्ट्रियल भागामध्ये स्वयंपाकाच्या भांड्यांचा मोठा कारखाना होता. त्याचा व्याप भरपूर मोठा होता. बायकोच्या जाण्यामुळे श्रीकांत एकदम एकटे पडले होते.

बऱ्याच वेळेला सुहासिनी त्यांच्याकडे जाऊन, त्यांना ऑफिसच्या कामामध्ये देखील मदत करू लागली. घरी जाऊन ब्लडप्रेशर घेणे, वेळी प्रसंगी त्यांना इंजेक्शन देणे, त्यांची औषधांनी ठेवणे लागलेलं सामान मागवून घेणे इत्यादी बरीच कामं सुहासने आपण होऊन करू लागले.

अचानक काही कामासाठी श्रीकांत यांना जर्मनीला जावे लागणार होते. स्वयंपाकाच्या भांड्यांचा एक प्रकारचा मोल्ड तयार करण्यासाठी त्यांना काही मशिनरी घ्यायच्या होत्या. तसेच नवीन प्रकारचे पोळ्या तयार करायचे यंत्र देखील ते तयार करण्याच्या मागे होते. त्यांची दोन्ही मुले परत आल्यानंतर त्यांचा कारखाना बघणारच होती.

कामाच्या ताणामुळे श्रीकांत यांचा ब्लडप्रेशर बऱ्याच वेळेला वरखाली होऊ लागलं. त्यांना त्यांच्या सोबत जाण्यासाठी कोणीतरी विश्वासू माणूस हवं होतं.

डॉक्टर निंबाळकर यांनी त्यांच्या बरोबर जाण्यासाठी सुहासिनी योग्य आहे असं त्यांना सांगितलं. तिला ब्लडप्रेशर घेता येत होतं वेळ प्रसंगी इंजेक्शन देता येत होतं, औषधोपचाराची तिला पूर्ण माहिती होती, कंप्यूटर मोबाईल ती लीलया हाताळू शकत होती.श्रीकांत ला पण सुहासिनी बरोबर बरेच वाटत असे. एक तर तिने त्यांचा पूर्णपणे विश्वास प्राप्त केला होता.


जेव्हा आईने ही गोष्ट घरांमध्ये सांगितले की सुहासिनी जर्मनीला जाणार आहे तेव्हा परत नेहमीप्रमाणेच बाबांनी आक्रस्ताळेपणा चे नाटक सुरू केले. " तरण्याताठ्या मुलीला असे अनोळखी माणसाबरोबर परदेशामध्ये आम्ही पाठवणार नाही." बाबांनी नेहमीप्रमाणे कांगावा केला.

" परदेशामध्ये तिचं काही बरं वाईट झालं तर? जर अतिप्रसंग झाला तर?" असे काही बाही सांगत बाबांनी मोडता घालण्याचा प्रयत्न केला.


त्यादिवशी हॉस्पिटलमधून घरी परत येताना सुहासिनी अतिशय नाराज झाली, आपले लग्न बाबा काही लावणार नाहीत हे तिला माहिती होतं.

 श्रांत मनाने ती बागेमध्ये बसून राहिली. अचानक खांद्यावरती हात पडला. वळून बघितले तर सुरेखा.

तिने दुरवर बोट दाखवले, बागेच्या दुसऱ्या बाजूला सुमती कडेवरती एक आणि हाताशी एक अशा दोन पोरांना घेऊन उभी होती.

काय तो सुमतीचा अवतार! कळकट आलेली साडी, खोल गेलेली गलफड, हताश डोळे, कडेवरती शेंबडे पोर, आणि हाताशी अर्धवट कपड्यामध्ये चप्पल नसलेलं दुसरे पोर. तिघांच्याही डोक्याला तेलाचा थेंबही लागलेला दिसत नव्हता.

सुरेखा त्यामानाने बरी दिसत होती, झुळझुळीत स्वस्त साडी, चेहऱ्यावर तजेला, किंचित पुढे आलेले पोट, गर्भारपणाची चाहूल दाखवत होतं.

" प्रेमा बिमा मध्ये ना काही खरं नाही ग," डोळ्यातलं पाणी आवरत सुमती बोलत होती. "चार दिवसातच प्रेम उडून जातं"

जिन्या खालची खोली, सगळ्याचीच चणचण. अपुरे पैसे, अपुरे जेवण, अपुरे कपडे, मात्र वाढलेली शरीराची भूक. सुमती चा आयुष्य वाया गेल्यातच जमा झालेलं होतं. पोरांच्या साठी पाय ओढत ती कष्ट करत होती, कुठल्यातरी हॉटेलमध्ये भांडी घासायचे काम करत होती.

सुरेखा कम्प्युटर क्लास मध्येच जमेल तेवढे काम करत होती. सुरेशला हातभार लावत होती. तिची खोली सुमती पेक्षा बरीच मोठी होती. आणि खायला प्यायला तरी मिळत होतं.


बहिणीची लाज वाटावी का कीव करावी, सुहासिनी ला काही समजेना. त्या दोघींची अवस्था बघून तिच्या अंगावर ति तर सरसरून काटा आला होता, आई आणि सुमती मध्ये फारसा काही फरकच वाटत नव्हता,

आपल्या परदेश प्रवासाचे वृत्त त्यांना सांगावे की नाही असेच सुहासिनी ला वाटले.

राहवले नाही म्हणून ती बोलून गेली.


" जरूर जा ग , काही ही संधी सोडू नकोस, आणि आपल्या बाबांचा तर काहीच ऐकू नको. त्यांनी काय केले आपल्यासाठी? नुसता स्वार्थ तर बघितला. एकामागोमाग एक आपल्याला जन्माला घातलं पुढचं काय?" सुमती तळतळून बोलत होती.

"रमेश माझ्याकडे बघून शिट्या वाजवतोय, मला फशी पाडतोय, हे काय बाबांना समजत नव्हतं? कसलं ग त्याचे ध्यान, गोड गोड बोलून मला म्हणाला त्याचं मोठं घर आहे मित्राच्या घरी नेऊन त्याचं घर स्वतः म्हणून मला दाखवलं. रमेश दिसायला गोरागोमटा म्हणून मी पण बळी पडले ग" का नाही बाबांनी मला समजावले? का नाही आईने मला थांबवले?". " सुमती चे हुंदके थांबतच नव्हते,


        ते बघून तिची दोन लेकर देखील जोरजोरात रडू लागली. सुरेखाने ताबडतोब बिस्किटाचा पुडा ,केळी काढून दोघांच्या पुढे धरली, दोघांनी पण अधाशासारखं खायला सुरुवात केली.


" का नाही बाबांनी मला समजावले? आई पण बाबांना पुरती सामील, स्वतःच्या पोरी कोणाबरोबर पळतायेत याची तिने कधी काळजीच केली नाही. बाबा नीट कधी प्रेमाने शब्द पण बोलला नाही आणि आईने बेपर्वाईचे वृत्ती अंगीकारली. आपण सर्व त्यांना जड झाल्या आहोत ग" सुरेखाने देखील सुमती प्रमाणेच रडायला सुरुवात केली.


" सुहासिनी तू जरूर जा ग" " नीट विचार कर चांगला जोडीदार निवड, सगळे पैसे आईच्या हातावरती मुळीच देऊ नकोस." सुरेखा परत परत तिला सांगत होती.

घरी येताना सुहासीनी विचार करत आली आणि तिने एक निर्णय घेतला. ती पण आता वीस वर्षाची झाली होती सज्ञान झाली होती गेल्यावर्षीच मतदानाचा हक्क बजावला होता, आता तिने स्वतःसाठी मतदान करायचे ठरवले.

पासपोर्ट, व्हिसा ,कपडे, बॅग ,सगळा खर्च श्रीकांत नि केला, डॉक्टरीन बाईंनी तिला भरपूर सल्ले दिले आणि परदेश प्रवासासाठी तयार केल.


    जर्मनीच्या फ्रँकफर्ट एअरपोर्ट वरती उतरताना सुहासिनी ला आकाश ठेंगणं झालं होतं. तिच्या घराण्याच्या सात पिढ्यांनी देखील कधी विमान बघितलं नव्हतं. जर्मनीच्या मुक्काम, कामांमध्ये तिने श्रीकांतची डोळ्यात तेल घालून काळजी घेतली, त्यांच्या दोन्ही मुलांना वेळोवेळी श्रीकांतच्या तब्येतीबद्दल ची माहिती कळवत राहिली. मुलांनी केलेल्या आग्रहामुळे परत आल्यानंतर सुहासिनीने आपल्या मुक्काम श्रीकांतच्या बंगल्यावर ठेवला. आता ती त्यांची सेक्रेटरी कम असिस्टंट कम केअर टेकर आहे.

लग्न करायचं का नाही हा विचार सुहासिनी करतच नाही.

 श्रीकांत देखील सुहासिनीची व्यवस्थित काळजी घेतात, त्यांनी तिच्या नावावर भरपूर पैसे ठेवून तिचं पुढचं आयुष्य सुकर होईल याची व्यवस्था केली आहे. सुहासिनी चे शिक्षण चालू आहे, तिच्या शिक्षणाचे आणि सुचित्रा च्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी श्रीकांत यांनी घेतली आहे. आपल्या बहिणी पेक्षा चांगलं आयुष्य मिळविण्यासाठी तिची धडपड चालू आहे.


Rate this content
Log in