दाम्या !
दाम्या !
दाम्याच्या उल्लेखा शिवाय माझे अन त्याचे बालपण पूर्ण होणार नाही . दाम्या माझ्या पाचवीला पुजलेला ! म्हणजे पाचवी पासूनचा वर्ग मित्र , ते थेट म्याट्रिक (मी ) होईपर्यत एकाच शाळेत .तो सातवीत , मी एस. एस. सी . होईपर्यंत थांबला . मी कॉलेज साठी आणि त्याने बाह्य जगातून ज्ञानार्जना साठी शाळा सोडली .
दाम्या चांगला माझ्या पेक्षा तीन -चार वर्षांनी मोठा . सॉलिड काळे चिप्प बसवलेले घनदाट तेलकट केस . वर्गात बाकावर बसला तरी उठून दिसायचा ! उंची मुळे वास्तव्य कायम मागच्या बाकड्यावर . काळा रंग दोन प्रकारचा असतो ,एक धुरकट , आणि एक तेलकट , त्यातला तो तेलकट काळा ! नाकी डोळी नीटस पण गबाळ रहाण. आडमाप कपडे . पण त्या काळी सगळ्यांचेच कपडे गबाळे असत . एक तर शिंपी चार दोन इंच माप ज्यास्त धरायचा ,का ? तर 'कापड धून अकस्त !',वर 'जरा वाढत्या अंगाच माप धरा ' बापाची सूचना ! मग काय विचारता ? शर्टाचे खांदे कोपरा कडे धाव घेत ! तर लांबी इतकी कि चड्डीची गरजच भासू नये ! किवा घातलेली दिसू नये ! त्या काळी चड्डी खराब झाली कि त्याच्या दोन पायाच्या बंद लाऊन दोन पिशव्या शिवायची हिकमत बरेच जण करत . दाम्याची चड्डी मात्र दोन पिशव्या एकत्र जोडल्या सारखी असायची ! त्या मानाने माझे कपडे व्यवस्तीत असत ,कारण मी नांदेड सारख्या 'शहरातून ' आलो होतो .
आम्हाला मराठी शिकवायला कामुलकर सर होते. तुळतुळीत टक्कल ,डेविड सारखे !(आजच्या अनुपम खेर किवा वैभव मांगल्य पेक्षा सुपर टक्क्लवाला सिने कलावंत ). दाम्या त्यांच्या टक्कलाला ' बेसनाचा लाडू ' म्हणायचा ! वर 'लाडू'च 'डल्लू ' करायचा !
"सुरश्या ,आज ' डल्लू बेसन ' इन करून आलय" असे सकाळी प्रार्थनेच्या वेळेस हळूच सांगायचा अन -लाईनीत उभा राहाचा .सर छान मराठी शिकवायचे . मृदू स्वभावाचे ,एका लयीत अन मनापासून शिकवाचे.
"दाम्या ,सर चागले आहेत ,अस नाव ठेऊ नकोस . " मी एकदा म्हणालो .
" अरे यार , ते तर आहेतच ,बम्ब्बाट शिक्व्त्यात ,पण त्यांना टक्कल का पडल्य म्हाईतय का ?"
"नाय ,का पडलय?"
"त्यान्ला दोन बायका आहेत !"हि असली माहिती दाम्याला कशी समजते कोणास ठाऊक ?मागे एकदा शिंदे गुरुजी बायकोची अंडरवेल धुतात म्हणून सांगितले होते ! थोडासा चावट आहे .
"त्याचा काय संबंध ?"
"आहे कि !,एकीचे केस काळे हैत अन एकीचे पांढरे !"
"असेनात , बायकाच्या केसान नवऱ्याला कस टक्कल पडत ?"
" तेच तर सांगतोय ! झाल काय कि काळ्या केस वालीन पांढरे केस उपटले,अन पांढरी केसवालीन काळे मग काय रह्य्ल -डल्लू बेसन !" हे असे त्याच डोक चालायचं .
सारी दुनिया त्याला 'दाम्या ' म्हणायची पण त्याची आई त्याला 'दामाजी ' म्हणायची .
कधी त्याच्या घरी गेलोतर , 'आमच्या दामाजी संग अब्यासाला येतजा कि ,तुज्या नादान काय तर बुक नाकाम्होर धरील ' म्हणायची , मग मी हि परीक्षा आलीकी त्याच्या कडे अभ्यासाला जात असे . पण दाम्या मात्र तोंडावर पुस्तक ठेऊन झोपी जाई !
"अस झोपणार असशील तर मी नाय येत अभ्यासाला . "
"आर ,अस करू नगस ,तुझ्या बरा अभ्यास नाय केला तर माय बोंबलल अन मग शिनिमाला पैस देणार नाय "
"पण तू पुस्तक तोंडावर ठेऊन का झोपतोस ? उशाखाली नायतर बाजूला का नाई ठेवत ?"
"तोंडावर पुस्तक ठीवलत त्यातली विद्या डोक्यात झिरपती ! पहिले मी पुस्तक उशाखाली ठीवायचो सगळ ज्ञान हतुरणात गळून जात आसन ! आता डोक्यावर पुस्तक ठीउन झोपतो तर जरा जरा लक्षात रहात्य !"
"पुस्तकातल ज्ञान ते वाचल्याने लक्षात रहात ,तोंडावर ठेउन झोपल्यान नाही . "
"अस आसन त मला येगळी काय तर आडिया करावी लागल !"
"त्या पेक्षा अभ्यास कर न "
"आता झोपतो ,सक्काळी उठून अभ्यास करीन "
रात्री 'सक्काळी' उठायचं म्हणून लवकर झोपायचा ,रात्री जगायचं म्हणून दुपारी जेवून झोपायचा !
माझा अन त्याचा कॉमन इंटरेस्ट म्हणजे सिनामा ! ब्लक अन्ड व्हाईट पासून ते गेवा कलर पर्यंत चे खूप सिनेमा आम्ही सोबत पहिले . त्या पेक्षा अधिक सिनेमांची पोस्टर ,मान वर करून रस्त्याच्या कडेला पायाला कळा लागेपर्यंत ,पहिली !
"सुरश्या ,नव पोस्टर लागलय !"एकदा तो धापा टाकत म्हणाला .
" खरच ! कोन्त्ता पिचर आहे ?"
"इंडिया और अन्डूक !"
"काय ? अस कस नाव अस्त ?"
"पोस्टर पायल ,झिंगाट पळत आलो तुला सांगायला ! म्हणून त धाप लागली "
"चल बर अपुन बगून येवू "
आम्ही दोघे पोस्टर लागलेल्या चौकात गेलो . तर खरेच ठळक इग्रजीत 'indiya aur anduk "!
पण त्याच्या खाली हिंदीत नाव होते .
" दाम्या ,मायला -बिंदिया और बंदूक -नाव आहे सिनिमाच !,पोस्टर चीपक्वताना Bindiya अन Banduk च B मुडपलय !"
" अस लफड झालय का ?"
परत घरी येताना दाम्या कसल्या तरी विचारात होता .
"सुरश्या सगळे नाव सम्ले तर ?"
"कोंचे नाव ?"
"आता इतके पिचर निग्त्यात ,कवर नाव पुरतील . कवातर नावच संपून जात्याल कि ! मग नव्या सिनिमाला कुठून नाव देणार ?"
आता हसू येतंय पण तेव्हा मी हि विचारातच पडलो होतो .
"काय्की ,त्याचं ते बघून घेतील ,आपल्याला काय करायचय ?'
एरवी दोन -दोन महिने कटिंग न जाणारे आम्ही दर पंधरा दिवसाला कटिंग साठी जाऊ लागलो . कारण आपला नंबर लागसतोवर जुना खाक "रसरंग " चाळायला मिळायचा ! रेडीओ वर' बिनाका ','अनोखे बोल ', कानात जीव ओतून डोक्याला डोके लाऊन ऐकायचो .
दाम्याचा लाडका हिरो जॉय मुखर्जी ! त्याला तो जोमिवाक्र्जी म्हणायचा . त्याचा सिनेमा सुटणे म्हणजे पाप !अन हिरोइन आशा पारेख !"जिद्दी " त्याने एकदा आशा पारेख साठी आणि एकदा 'पोपट लाल '(राजेंद्र नाथ ) साठी पहिला होता !
दाम्या, चड्डीतून विजारीत येण्याची स्टेज गाळून डायरेक्ट पॅन्टीत आला . मापाचे कपडे शिवायला आम्ही शिंप्याला भाग पडले होते . डोक्यावरचे केस कपाळावर घेऊ लागला . आम्ही पण 'मायला ,डीटो सुनील दत्त वनी दिसतोस दाम्या !'म्हणाला लागलो .
माझा कल शाळा बुडवण्याकडे असे तर दाम्या रोज शाळेत जायचा ,होमवर्क नाही केले तरी ! मला मोठे नवल वाटायचे . पण त्याचे रहस्य मी नववीत गेल्यावर कळले ! शाळेत शिक्षणा पेक्षा 'इतर 'हि बरच काही असते याची जाण ,' कोणीतरी ' रोखून बघतय हे कळू लागल्यावर आली ! एकदा दम्या दोन दिवस शाळेत आलाच नाही !घरी गेलो तर नेहमी तोंड भरून बोलणारी त्याची आई त्रोटक 'गावाला गेलाय ' म्हणाली . दोन दिवसांनी तो शाळेत आला .
"कुठ गेलतास ?"
"सुरश्या ,मी लग्न करणारय !"
"काय ?अजून शाळा संपली नाही तवर लग्न ?"
"आता मी सातवीत आहे अन ,आई म्हणती लगन कर. म्हणून मी अन बाप्पा सोलापूरला नवरी बगाया गेल्तो "
"नवरी !"
"व्हय , बाप्पानि सगळ पैलेच ठरवलय ! आता फकस्त लगीन ! सुरश्या तू पन लगीन करून टाक ! दोग एकसात करू !"
"आमच्यात नौकरी लागल्यावर लग्न करतात !"
"तू अभ्यासात पुढ अशील पन मी या बाबतित्त तुज्या पुढ जाणार ! "
उन्हाळ्यात त्याचे लग्न झाले . शाळा सुटली . मी ssc पास करून college ला गेलो . माझे त्याच्या घरी जाणे कमी झाले , संपर्क कमी झाला . मध्यंतरी त्याच्या बद्दल काही बाई एकू यायचे ,ते फारसे चांगले नसायचे . एकदा पाठमोरा दिसला झुकांड्या खात चालला होता , हाक मारली पण थांबण्याच्या ,बोलण्याच्या मनस्तितीत नव्हता .
चार सहा वर्ष्यानी अचानक समोरा -समोर भेटला . अस्थाव्यस्त अवस्था होती ! खोल गेलेले डोळे ,निस्तेज चेहरा ,मळकट कपडे . शाळेतली त्याचातली गोंडसता आणि निरागसता परिस्थितीने ओरबडून घेतली होती !
"कसा आहेस दाम्या ? " दिसत असूनही मी विचारले .
"सगळ सम्पल सुरश्या !,शाळा सोडली ,तुजी साथ सुटली , फालतू संगत लागली ,बापाच्या गल्ल्यातून पैसा उचलून ऐश करू लागलो ,बिडी काडी सोबत दारू कधी चिटकली कळलपन नाही ,बाप गेला ,धंदा हाती आला ,पर धंदा ,घर -गाडा ,माझी दारू मेळ बसना ! पैसा संपला ,बायकू सोडून गेली ! "चार वाक्यात त्याला धाप लागली . डबडबलेले डोळे तोंड फिरउन त्याने लपवले . बराच वेळ तो गप्प उभा राहिला .
" सुरश्या ,पुन्हा लहान होता येत कारे ? पुना आपण शाळेत जाऊ ! अभ्यास करू ! मस्त पिचर पन बगू !
क्षण भर त्याच्या डोळ्यात बालपण चमकून गेले !
"ते कस होईल दाम्या ? पण उद्या सिनेमाला मात्र जाऊ ,येतोस ?"
"खरच ! मी नक्की येतो ,पन -----पन तिकीट मात्र तू काढ . माझी लई कडकी आहे . "
"हो ,मीच काढतो ,फस्ट शोला ,लक्ष्मि टाकीजला ये ,मी वाट पाहीन " तो निघून गेला . उद्या सिनेमा सुटल्यावर त्याला चार समजुतीच्या गोष्टी सांगण्याचे मनाशी मी पक्के केले होते .
तो आला नाही ! कधीच आला नाही !मी अजूनही त्याची वाट पहातोय ! आजही सिनेमाचे पोस्टर नजरेस पडलेकि तो शेजारी खांद्यावर हात टाकून उभा असल्याचा भास होतो !