बटन छत्री!
बटन छत्री!


बटन छत्र्या तेव्हा नव्यानेच आल्या होत्या बाजारात! ग्रुप मध्ये almost सगळ्या जणींकडे बटन छत्र्या होत्या. मी सुद्धा हट्टाने बटन छत्री मागीतली बाबांकडून. रेनकोट असताना नवी छत्री मिळणं शक्य नव्हतं !
मग नव्या छत्री साठी मी आणि माझ्या मोठ्या भावाने छोटसं नाटक केलं. त्याच्या सांगण्याप्रमाणे मी खोट्या खोट्या झोपेत मी हळुच "बटन छत्री, बटन छत्री" असं दोन तीन वेळा पुटपुटले. आईने ते ऐकलं आणि बाबांना ही गोष्ट सांगितली. दुसऱ्याच दिवशी बाबांनी माझी मागणी मान्य केली!
शेवटी अथक प्रयत्नानंतर नवी कोरी बटन छत्री मिळाली! मी लगेचच दुसऱ्या दिवशी ती शाळेत घेऊन गेले. आकाशी रंगाची नाजूक निळी प्रिंट असलेली माझी बटन छत्री!! कधी सर्वांना दाखवेन असं झालं होतं मला.
त्या दिवशी नेमका शनिवार होता म्हणून सकाळी मैत्रीणींना न भेटता एकटीलाच शाळेत जावं लागलं. जाताना अगदी थोडं शिवारलं. मी गरज नसताना ही छत्री उघडली. पण छत्री सर्वांना दाखवायची राहूनच गेली. छत्री थोडी ओली राहीली म्हणून तशीच बेंच मध्ये ठेवली.
शाळा सुटली. शनिवार अर्धा दिवस म्हणून आम्ही पांडव आनंदाने शाळेबाहेर पडलो. त्या दिवशी पाऊस पडलाच नाही. आणि मलाही नव्या छत्रीची आठवण राहीली नाही.
घरी पोहोचले तेव्हा लक्षात आले की छत्री नाही. डोळ्यातुन गंगा जमुना वाहू लागल्या. मनात विचार येत होते "घरी सांगू कसं? बाबा काय म्हणतील? आत्ता पुन्हा नवी छत्री कशी मागु बाबांकडे? पुन्हा जुना raincoat वापरावा लागणार! ".
माझा मायुस चेहरा बघून भावाने लगेच ओळखलं , काहीतरी गडबड आहे. माझा खरा buddy होता तो. त्याने खोदून खोदून विचारल्यावर मी त्याला खरं सांगून टाकलं, भोकाड पसरुन! त्याने माझी कशीबशी समजूत काढली.
एव्हाना घरी सर्वांना समजलं होतं माझी नवी छत्री हरवली. पण ओरडलो कोणीच नाही, सर्वांनी समजूत काढली " " अगं मिळेल छत्री. Tension नको घेऊ ".
दादा आणि मी दोघेही एकाच शाळेतले. माझ्यापेक्षा तो पाच वर्षांनी मोठा. त्याला खात्री होती की छत्री मिळणार.
सोमवार कधी उजाडतो याची वाट बघत रविवार काढला कसाबसा!
सोमवारी मैत्रीणींबरोबर शाळेत न जाता एकटीच गेले. शाळेत गेल्यावर केळुसकर बाईंना तडक भेटले. रडवेल्या सुरांत त्यांना सर्व प्रकार भीत भीत सांगितला. "अशी कशी विसरलीस छत्री? स्वत: च्या वस्तु स्वत: जपायच्या असतात. वेंधळी." त्यांच्या style मध्ये त्या ओरडल्या आणि मी कसनुसा चेहरा केला. " मिळेल तुझी छत्री. बघू. उगीच रडू नको. जा वर्गात आत्ता."
मी लगेचच वर्गात पळ काढला. शाळा सुटेपर्यंत छत्रीचाच विचार होता मनात !
दुसऱ्या दिवशी ही शाळेत गेल्यावर छत्री बद्दल विचारले. पण छत्री मिळाली नाही. मी आत्ता hopes सोडले. पुन्हा raincoat वापरायला सुरुवात केली. छत्री इतिहास जमा झाली होती. तरीही मी रोज office मध्ये जाऊन छत्रीची चौकशी करून याचीच. एव्हाना केळूस्कर बाईंना कळलं होतं की छत्रीसाठी ही मुलगी फारच emotional झाली आहे.
खरंच होतं!! तशा माझ्या हातून अनेक गोष्टी हरवल्या होत्या. पण ही छत्री!! छत्री मला काही केलेल्या स्वस्थ बसू देत नव्हती.
पाच दिवसांनंतर अचानक !! शाळा सुटल्यावर वर्गातून बाहेर पडताना त्या दिवशी केळूस्कर बाईंची हाक ऐकू आली " कदम , एक निळ्या रंगाची एक छत्री office मध्ये जमा झाली आहे. बघ तुझी छत्री आहे का ती ?" " हो बाई" असं म्हणून मी office मध्ये धावले आणि शिंदे कडे छत्री बद्दल विचारले. त्यांनी ही लगेच जमा झालेली छत्री काढून दाखवली.
माझीच छत्री होती ती! माझी बटन छत्री ! आकाशी रंगावर नाजुकशी dark निळी प्रिंट, नवी कोरी करकरीत! मी बाईंचे आणि शिंदेंचे आभार मानले. " अगं आपल्या शाळेत वस्तु जात नाहीत कुठेही. नीट सांभाळून ठेव आता ही छत्री" बाई म्हणाल्या.
मी छत्री घट्ट कवटाळून धरली. एव्हाना सर्व मैत्रीणी पुढे निघून गेल्या होत्या पण मला आज एकटं वाटत नव्हतं कारण माझी छत्री माझ्या बरोबर होती, माझ्या हातात!!
शाळेतून बाहेर पडले आणि पाऊस कोसळायला लागला. मी माझी बटन छत्री उघडली. आणि पाऊस कोसळतच होता बाहेर आणि आतही !!