नासा येवतीकर

Children Stories

4  

नासा येवतीकर

Children Stories

बोले तैसा चाले

बोले तैसा चाले

3 mins
500


दाते सर सकाळी सकाळी चौथीच्या वर्गावर स्वच्छतेचे प्रसारक संत गाडगेबाबा हा पाठ शिकवीत होते. मुले अगदी तल्लीन होऊन दाते सरांचे बोलणे ऐकत होते. सर देखील अधून मधून काही तरी कथा, कविता किंवा प्रसंग सांगत असे त्यामुळे वर्गातील सर्वच विद्यार्थी लक्ष देऊन ऐकत असत. त्याचसोबत ज्यांचे लक्ष नसे त्याला उभं करून शिकविल्या भागावर प्रश्न विचारीत असे. प्रश्नांचे उत्तर आले नाही की त्यांची सजा ठरलेली असायची. संपूर्ण शाळेचा परिसर, वर्गखोल्या याची स्वछता करणे. त्यामुळे कोणी ही चुळबुळ करायचे नाही, सारेचजण सरांच्या बोलण्याकडे लक्ष द्यायचे.


पाठ शिकविताना संत गाडगेबाबा यांनी आयुष्यभर रंजल्या-गांजल्या, अनाथ, असहाय गोरगरिबांना अखंड सेवा केली. त्यांच्याप्रमाणे आपणदेखील गरजू लोकांना मदत केली पाहिजे. गरीब लोकांविषयी मनात कणव निर्माण होणे आवश्यक आहे तरच आपण माणूस आहोत अन्यथा नाही. सर असे काही जीवन जगण्याचे सार सांगत असताना वर्गासमोर पन्नास वर्षाची एक महिला येऊन उभी राहिली. काहीतरी कागद दाखवत होती आणि दुसऱ्याच भाषेत बोलत होती. सरांनी ते कागद हातात घेतलं, त्याला निरखून पाहिलं तर ते दवाखान्याची चिट्ठी होती.

सर त्या बाईला हिंदीत बोलले, क्या होना?

त्या बाईला मोडकी तोडकी हिंदी येत होती. त्यामुळे ती म्हणाली, थोडी मदत दे दो बाबा.


सर जो पाठ शिकवत होते त्याचे प्रात्यक्षिक कृती दाखविण्याची आयती संधी सरांना मिळाली होती. पण समाजात संधीसाधू आणि फसवे लोकदेखील खूप मोठ्या प्रमाणात असतात. म्हणून सरांनी अगोदर त्या दवाखान्याच्या चिठ्ठीवरील क्रमांकावर फोन केले आणि सर्व माहिती बरोबर आहे का हे तपासले. फोन केल्यावर त्यांना कळाले की, दवाखान्यात जो पेशंट दाखल झालाय त्याला किडनी स्टोन झालाय आणि ऑपरेशन करणे आवश्यक आहे अन्यथा त्याचा जीव धोक्यात आहे. सरांनी लगेच त्यांच्या ओळखीच्या एका सेवाभावी संस्थेला फोन केला, या पेशंटची माहिती दिली. त्या बाईला ती चिठ्ठी देऊन खिशातील शंभराची नोट दिली. मुलांनाही त्यांनी आवाहन केलं की, सदरील बाईचा मुलगा दवाखान्यात आजारी आहे, तिला आता खाण्यासाठी काही नाही, तेव्हा मी शंभर रुपये तिला देत आहे, तुम्हीदेखील खाऊसाठी आणलेले पैसे तिला द्यावे. मुलांनी मागेपुढे कसलाही विचार न करता, दुपारच्या सुट्टीत खाऊसाठी आणलेले पैसे तिला दिले. जवळपास शे-दोनशे जमा झाले होते. ते सरांनी तिला दिले व शाळा सुटल्यावर दवाखान्यात येतो असे बोलले. ती बाई तेथून निघून गेली.


शाळा सुटल्यावर सर थेट दवाखान्यात गेले, सेवाभावी संस्थेचे सचिव जे की सरांचे मित्र होते, तेदेखील तेथे आले. त्या पेशंटविषयी डॉक्टरांसोबत चर्चा केली. त्यांच्या उपचाराचा खर्च संस्था उचलत असल्याचे डॉक्टरांना सांगून ते दोघे बाहेर पडले. दोन-चार दिवसांनी शाळेत परिपाठ संपू लागला होता. त्यावेळी ती महिला आणि तिच्यासोबत तिचा मुलगा शाळेत आले. त्यांनी सरांच्या पायांवर लोटांगण घातले आणि तुमच्यामुळे माझा मुलगा वाचला, नाहीतर मेला असता, असे ती बोलू लागली.


यावर सरांनी त्या दोघांना हाताशी धरून उभं केलं आणि म्हणाले, मी काही केलं नाही, कर्ता व करविता तोच आहे, मी निमित्तमात्र आहे. तुम्हीदेखील इतरांना मदत करत राहा, हाच संदेश तुम्हाला दोघांना देतो. शाळेतील सर्व मुलं सरांच्या बोलण्याकडे लक्ष देऊन पाहात होती. बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले याची प्रचिती आज शाळेतील सर्वच मुलांना आली होती.


Rate this content
Log in