भाग १ .निर्णय !
भाग १ .निर्णय !
आजही तो असाच हताश होऊन बाहेर गच्चीत येवून सिगारेट ओढू लागला . हल्ली सारखं असंच होत होतं . गीता हल्ली असं का वागते आहे त्याला कळत नव्हतं . ती काहीतरी क्षुल्लक गोष्ट मनाला लावून घ्यायची आणि काही बोलायचा अवकाश की बोलणं पार विकोपाला जायचं .आज तर ह्या भांडणाचं पर्यावसन शेवटी घर सोडण्यापर्यंत ताणलं .
सिगारेटचे त्याला काही व्यसन नव्हते पण मन गुंतायला आणि विचाराला एका लयीत गुंतवायला हे असलं एकसुरी काहीतरी व्यसन मदत करायचं हल्ली .एक एक झुरका मारत , धुराचे वलय तोंडाबाहेर हळूहळू सोडत तो विचार करू लागला .किती सांभाळून घ्यायचं अजून तिला ?का पटत नाही तिला माझी कोणतीच गोष्ट ? मलाही तिने समजून घ्यावं कधीतरी !
' सगळे पुरुष सारखेच असतात. ' हे बायकांचे सर्रास बोलण्याचे समीकरण काही कळतच नाही .विचार केला तर ह्या बायकांना अश्या किती पुरुषांचा अनुभव असतो ,म्हणून सगळ्या पुरुषांना एकच माळेत गुंफतात ? आम्हाला आहे का हे असे काही बोलायची सोय ? अजून वेगळं काहीतरी डोक्यात घेणार !
भांडणाला कारण शोधायचं , मनात येईल ते नवऱ्याला बोलून रिकाम व्हायचं आणि परत नवऱ्यानेच रुसलेल्या बायकोची मनधरणी करायची . हा कुठला न्याय ???
विशाल आज खरतर हतबल झाला होता गीता पुढे . दोनच वर्ष झाली होती लग्नाला .पण एकमेकांना समजून घेणं तर लांबच राहील, त्यांच्यात जास्त भांडणच व्हायची . अगदी क्षुल्लक कारण असल तरी .
नवरा कामाशिवाय जास्त वेळ बाहेर राहिला की त्याचे बाहेर काहीतरी लफडेच असणार अश्या विचाराची ही मुलगी . किती समजावून सांगायचे आणि समजून घ्यायचे हिला ?
अडाणी पण नाही चांगली १२ वी झालेली आहे . इथे कोणाचा जाच नाही की माझे कुठले बंधन नाही .दर सुट्टीला बाहेर फिरायला नेण, शॉपिंग , महिन्यातून दोन तीन वेळा बाहेर जेवायला नेतो . सगळे हट्ट पुरवतो . मी कुठे कमी पडत असेल असे मला नाही वाटत . माझ्या ह्या जीव लावण्याकडे पण कधी कधी जेव्हा संशयाने बघते ना तेव्हा मात्र स्वतःचा राग येतो .
तिला कितीवेळा सांगितलं काहीतरी शिक , कामाव्यतिरिक्त पण बाहेर पडत जा म्हणून , पण ऐकेल तर शप्पथ !
ही घरी एकटी , दुपारी जेवायला सोबत असावी म्हणून ओढाताण करत मी फक्त तिच्यासाठी दुपारी जेवायला यायचं .होतो कधी उशीर , नाही जमत वेळेत यायला .असे काही झाले की बसल्या मॅडम रुसून .मग घरी येवून बसा हीची समजूत काढत , कितीवेळा न जेवता गेलो असेन .पण हिला काही नाही .
हल्ली तर आमचं नातं म्हणजे फक्त भांडण्यासाठी जुळलं आहे की काय असेच वाटत रहाते.किती दिवसात एकही क्षण दोघांनी मिळून आनंदात घालवला आहे असे आठवतच नाही . प्रत्येक नवरा बायकोमध्ये होतात भांडणं . पण इतकी ?
बास झालं आता मी नाही चालू देणार अजून हीचे नखरे .गेली ना माहेरी जावू दे .जेव्हा यायचं तेव्हा येईन , ह्यावेळी मी नाही जाणार तिची समजूत काढायला .
गच्चीत उभा राहून अजून दोन तीन सिगारेट संपवून तो मग शांत झाला आणि बेडमध्ये येवून झोपला .
गीताने घरातून बाहेर पडताच रिक्षा केली आणि नेहमीच्या मंदिरात जावून बसली .तिला माहित होतं थोडा वेळ गेला की विशाल येईलच मागे , त्याला माहित आहे मी चिडले की इथे येवून बसते ते .
तिला नेहमीप्रमाणे आजही वाटत नव्हतं की आज तिच्याकडून काही चूक झाली असेल. तिने दुपारी जेवायला विशालची वाट पाहिली पण त्याला यायला खुप उशीर झाला .तिने ऑफिस मध्ये फोन केला तर तो तिथेही नव्हता .तिला वाटलं येत असेल घरी तो अन अर्धा एक तास झाला तरी तो आलाच नाही .
तिने जेवण करून घेतलं , मागचं सगळं आवरून गेली झोपायला .१० मिनिटांनी विशाल लॉक उघडून घरात आला .तिला त्याची चाहूल लागली पण ती मुद्दाम बाहेर आली नाही . विशाल हातपाय धुवून तिला आवाज देत म्हणाला , " सॉरी डियर , अग रस्त्यात एका आजींना गाडीचा धक्का लागला आणि त्या पडल्या .अचानक समोर आल्या , कळलंच नाही मला . त्यांना मग दवाखान्यात नेलं . नशीब फक्त किरकोळ मार लागला बाकी जास्त लागलं नाही . गरीब होत्या बिचाऱ्या .काही बोलल्या नाही .मग त्यांना त्यांच्या घरी सोडलं , थोडे पैसे देवून आलो .त्यामुळे उशीर झाला . "
विशाल इतकं बोलला तरी गीताने काहीच प्रतिक्रिया दिली नाही की उठली नाही .
" गीता ,अग चल ना , मला उशीर होतोय ."
गीता रागात म्हणाली , " तुझं तू वाढून घे आणि जेव , मला झोप आली आहे ,"
विशाल आधीच खुप त्रासला होता , त्यात हीची भर .तरीही शांत रहात त्याने तिला जवळ जावून उठवायचा प्रयत्न केला , पण हीचा पारा काही खाली उतरेना .त्याला झटकत तिने तोंड वळवले .
" मला झोपुदे , तुला काय करायचे ते तू कर , तुला काही फरक पडत नाही कोणत्या गोष्टीचा , मी घरात एकटी असते , दुपारी वाटत तू आलास तर सोबत होईल तुझी पण तुला बाकीची समाजसेवा करणं जास्त महत्वाचे वाटत ना , मग जा कर समाजसेवा ."
विशालला कळेना , पण वाद नको म्हणून तो तसाच बाहेर आला , गितापण जेवली नसेल म्हणून मग तोही न जेवता बाहेर पडला .ऑफिस मध्ये एक तासभर काम करून तो परत घरी निघाला .येताना गीताला आवडते म्हणून आइस्क्रीम घेतली . घरी आला .बाईसाहेब अजून झोपल्या होत्या .मग त्याने हातपाय धुवून मस्त कॉफी बनवली स्वतःला आणि गच्चीत येवून कॉफी पीत बसला .
गीता उठली बाहेर येवून तिने पाहिले पण काहीच न बोलता किचन मध्ये जावून स्वतःसाठी चहा करून घेतला आणि हॉल मध्ये टिव्ही लावून बसली .विशाल तिच्या जवळ येवून म्हणाला ,
" चल आपण जरा बाहेर जावू , रात्री बाहेरच जेवण करू , आवर पटकन ,"
" मला नाही यायचे कुठे . मी घरातच बरी आहे . पहिलं त्रास द्यायचा मग गोंजारत बसायचं , बायका काय लगेच खुश होतात .सगळे पुरुष सारखेच , बायका म्हणजे खेळणं आहेत असच वाटत यांना ."
विशाल तरीही शांतपणे घेत म्हणाला , " काही पण काय विचार करतेस ग तू ? मी तुला सांगितलं ना येताना काय झालं ते , मी काही मुद्दाम केलं का ? कधी काम असतं त्यामुळे होतो उशीर , तुला किती वेळा सांगितलं , माझी वाट नको पाहत जावू , तू जेवण करून घेत जा .तू नाही ऐकत मग मी तरी काय करू ? "
शब्दाने शब्द वाढत गेला आणि दोघांचा आवाजही ...
आज गीता काही समजून घ्यायला तयारच नाही .गेली निघून रागात .
त्याने पण ठरवले आज जायचंच नाही हिच्या मागे .
आणि गीता विशाल आल्याशिवाय घरी परत जायचं नाही म्हणून अडून बसली .
मंदिरात बसून आता गीता कंटाळली .अंधार पडला , तिला घरातून निघूनही ३ तास झाले होते , विशाल अजून आला नाही म्हणून आता मात्र ती थोडी मनातून घाबरली .तो आलाच नाही तर ???
"मी पण नाही जाणार , काय समजतो स्वतःला ? मला काही किंमत आहे की नाही ?"
बाहेर पडूनही तीच डोकं काही शांत नाही झालं .अजून अर्धा तास वाट बघून रागाने धुमसत ती माहेरी निघून आली .
आई वडील धास्तावले हिला अश्या अवेळी आणि अशी एकटीच आलेली बघून .
दोघांच्या भांडणाची ह्यांना सवय होती पण आज एवढ्या टोकाला जाईल असे वाटत नव्हते दोघांना .
गीता शांत बसल्यावर त्यांनी विचारले काय झालं ते .
सगळं ऐकून घेतल्यावर त्यांना मुलीची चूक लक्षात आली .पण जावयाने लेकीला एकटीला नव्हतं येवू द्यायला पाहिजे म्हणून विशालचा त्यांना राग आला .
दुसऱ्या दिवशी गीताच्या वडिलांनी विशालला फोन केला आणि भेटायला येतो , घरीच थांब असे सांगितले .
अर्ध्या तासात ते पोहोचले . विशालने चहा करून दिला आणि मूळ मुद्द्याला हात घातला .
" बोला बाबा , मला माहित आहे तुम्ही काय म्हणणार आहात ते .हे काय नवीन नाही तुम्हाला पण !"
" मला आता कंटाळा आलाय हे निस्तरता निस्तरता , मला वाटतं तुम्ही गीताला विचारा की तिला जर माझे वागणे आवडत नसेल , माझ्यासोबत रहाणं जर तिला त्रासदायक वाटत असेल तर तिला जे योग्य वाटेल ते ती करायला मोकळी आहे .आता मी काही बोलणार नाही , तिच्या म्हणण्याप्रमाणे सारं होवू द्या ."
" काय बोलतो विशाल तू ? एकदम असा टोकाचा निर्णय घेणं योग्य आहे का ? " बाबा म्हणाले .
" अजून काही उपाय नाही माझ्याकडे बाबा , तिला समजून घेवून मी तर आता थकलोय . दर दोन दिवसांनी हिला भांडणाला काहीतरी कारण सापडतच .मी काम करू का हीचे नखरे सांभाळू बाबा ? स्पष्ट बोलतो बाबा मी , राग नका येवू देवू .तुमची मुलगी आहे कळतंय मला ,पण मला पूर्ण आयुष्य गीता सोबत असच काढावं लागणार असेल तर आत्ताच दोघांनाही आपला मार्ग बदलावा लागेल . मी कुठे कमी पडतो ते मलाच नाही कळत, तिला कितीवेळा म्हणलो असेन तू जरा बाहेर पडत जा , काहीतरी कोर्स कर , जे आवडतं त्यातलं काहीतरी शिक , पण नाही .कशाचीच आवड नाही .फक्त नवऱ्याने ती सांगेन त्या वेळी घरात हजार राहिलं पाहिजे. काय चालू असतं तिच्या डोक्यात तिचं तीच जाणो .तुम्ही मला सांगा ते काय माझं स्वतःचं ऑफिस आहे का , पाहिजे तेव्हा सुट्टी घ्यायला ? सुट्टी न मिळणं म्हणजे माझच काहीतरी नाटक असणार ,असा संशय घेवून ही पुन्हा भांडत बसणार ."
" बरं एवढं सगळं करून सुध्दा हिला समाधान नाहीच . काय करायचं सांगा तुम्हीच , तिच्या हट्टीपणामुळे आठवड्यातून दोन तीन वेळा तर उपाशीच जात असतो मी कामावर .अजून किती सहन करायचं मी पण ? माझे आईवडील पण येत नाही इकडे हल्ली हिच्या अश्या वागण्यामुळे ,मला नाही का त्रास होतं ह्या सगळ्याचा ? कधी आलो का तुमच्यापर्यंत काही तक्रार घेवून ?"
" पण आता बास झालं , तिला जमत असेल तर तिने रहावं नाहीतर तिला मार्ग मोकळा आहे .
" माफ करा मला ,जाऊ शकता तुम्ही !"
एवढं बोलून विशाल आतमध्ये निघून गेला .
गीताचे वडील हताश होवून उठले आणि एकही शब्द न बोलता निघून आले घरी .
क्रमशः
