"आवाज शिक्षणाचा"
"आवाज शिक्षणाचा"


जगात सर्व प्रगत देश विकसित असण्याचे कारण म्हणजे त्या देशातील प्रबळ शिक्षण, ताकतवान शिक्षण, तंत्रज्ञान विकसित करणारे शिक्षण.त्या देशातील प्रत्येक लोकप्रतिनिधी शिक्षणाकडे फार काळजीवाहू आहेत. लोकांना रोजगार देणारे शिक्षण, संस्कार देणारे शिक्षण, मूल्ये असणारे शिक्षण, शिस्त व गुणवत्ता विशेष जपणारे शिक्षण हे इतर देशात शिकविले जाते. त्या देशातील प्रखर राष्ट्रप्रेम, एकता,त्याग, जिद्द,हे त्यांच्या शिक्षणाचे मुख्य पैलू आहेत. त्यामुळे ही राष्ट्र जगात अव्वल स्थानावर आहेत. त्या ठिकाणची सर्व जनता देशासाठी विकास करतांना कष्ट करण्याची वृत्ती अंगी जोपासतात.तेथील सरकारने त्यांना समान शिक्षण देण्याचे सूत्र वापरले आहे.गरीब श्रीमंत सर्वांसाठी देशात एकच शिक्षण आंमलात आणले आहे. शिक्षणाला बाजारू स्वरुप येऊ दिलेले नाही. ठराविक वर्गाच्या हातात शिक्षण गेलेले नाही. शिक्षण सरकारच्या कक्षेत आहे. असे शिक्षण देशात प्रगती करते. जात, धर्म, वंश सर्वांना एक समान शिक्षण हे प्रगत राष्ट्राचे लक्षण आहे. आधुनिक तंत्रज्ञान, गुणवत्ताधारक अध्यापक वर्ग,अध्यापनाचे प्रशिक्षण देणाऱ्या सरकारी शिक्षण संस्था हे उत्तम विद्यार्थी घडवत आहे. शिक्षणाच्या सुधारणा हे त्या देशातील प्रगतीचे मुख्य कारण आहे.
सरकार तेथील अध्यापक वर्गाचा आदर जपते. समाज शिक्षकांबद्दल आदरणीय आहे. समाज, पालक, सरकार, शिक्षक, विद्यार्थी यांच्यात सुसूत्रता आहे. विद्यार्थ्याना स्वावलंबन लहान वयात शिकविले जाते.
या ऊलट परिस्थिती भारतात निर्माण झाली आहे. शिक्षणात सरकारी शिक्षणाला किंमत उरली नाही. सरकारी शिक्षणाबद्दल जानीवपूर्वक गैरसमज पसरविले गेले. त्यातून खाजगीकरणाला उधान आले. सरकारी व मातृभाषेतून शिक्षण देणाऱ्या शाळा धडाधड बंद पडू लागल्या. शिक्षणात विषमता निर्माण झाली. एकीकडे विकत शिक्षण तर दुसरीकडे सरकारी शिक्षण अशी दुय्यम शिक्षण अस्तित्वात आले. अशा महागड्या शिक्षणात ठराविक वर्ग शिक्षण घेऊ लागला. ऐंशी टक्के विद्यार्थी विकत शिक्षण घेत आहेत. वीस टक्के शिक्षण सामान्य वर्गातील विद्यार्थी सरकारी शाळेतून घेत आहेत. त्यामुळे भारतात शिक्षणात पैशांची स्पर्धा निर्माण होऊ लागली. सरकारचे समान शिक्षणधोरण अजूनही साकार झालेले नाही. याचे मुख्यकारण जे लोकशाहीत प्रतिनिधी आहेत ते बिल्डर आहेत,संस्थाचालक आहे .त्यांच्या खाजगी शिक्षणसंस्था,विद्यापीठ आहे. देशात शिक्षणात खाजगीकरण हा फार मोठा धोका आहे. बेकारीला आमंत्रण आहे. त्यामुळे देशातील शिक्षणाचे मूल्यमापन करतांना अनेक अडचणी येतात. महापुरुषांचे शिक्षणातील उद्दिष्ट नष्ट होत आहे. देशातील प्रगती साधताना हा एक धोका संभावतो. खाजगीकरणात विकास साधताना फार मोठा वर्ग शिक्षणापासून वंचित होत आहे. त्यांच्यासाठी वेगळा अभ्यासक्रम, नियम यामुळे दर्जेदार अभ्यासक्रम व कमजोर अभ्यासक्रम अशी व्याख्या करावी लागेल.आधुनिक शिक्षणाच्या सोई खाजगी शिक्षणात त्वरीत प्राप्त होतात. तंत्रज्ञान, संगणकीय शिक्षण यांमुळे काही विद्यार्थी स्पर्धेत तर काही अडचणीत जगताना दिसतात. त्यामुळे चांगली नोकरी, कौशल्य त्यांना मिळताना कमजोर शिक्षणाच्या डिग्रीमुळे मागे राहतात. ती स्पर्धेत टिकत नाही.
त्यामुळे शिक्षणात मतभेद दिसणार नाही असे शिक्षण सर्वांना मिळावे. शिक्षण सरकारी नियंत्रण कक्षेत असले पाहिजे. शिक्षणात कौशल्य,संस्कार, शिस्त, स्वावलंबन, राष्ट्रभक्ती,आधुनिकीकरण असायला हवे. खाजगी शिक्षण व सरकारी शिक्षण समान असले पाहिजे. अध्यापक वर्ग अध्यापक विद्यालयातून, महाविद्यालयातून, आधुनिक शिक्षण व्यवस्था, तंत्रज्ञान यानुसार प्रगत असावा. नव्या शिक्षण व्यवस्थेत जीवंत मनाशी तो एकरूप झाला पाहिजे. नव्या शिक्षणात त्याचे ज्ञान विकसित असले पाहिजे. शिक्षण आनंदमय वातावरणात दिले जावे. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक पात्रतेकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. घरातील वातावरण विद्यार्थ्यांना पोषक राहील याची काळजी पालक वर्गाने घेणे गरजेचे आहे.शालेय व्यवस्थापन शिक्षणात फार महत्त्वाचे आहेत. शाळेत शिस्तीला,वर्ग नियंत्रण करण्याला विशेष महत्त्व दिले पाहिजे. प्रत्येक शाळा प्रोजेक्टर, संगणकीय झाली पाहिजे. चांगल्या दर्जाचे अध्यापन, प्रयोगशील शिक्षण ही काळाची गरज आहे. अभ्यासक्रम कौशल्याधिष्ठित असला पाहिजे. गरीब कष्टकरी मजूर, शेतकरी व श्रीमंत वर्गाच्या पालकांच्या विद्यार्थ्यांना तेच शिक्षण असले पाहिजे. तेव्हाच खऱ्या अर्थाने पुढची पिढी शिक्षणात सशक्त भारत घड़ू शकते. आर्थिक दृष्टया मागास असलेल्या विद्यार्थ्यांना फी सवलत, स्कॉलरशिप मिळाली पाहिजे. खेड्या पाड्यात गरीब वंचित विद्यार्थ्यांसाठी शासकीय वस्तीगृह अभियांत्रिकी महाविद्यालय उपलब्ध व्हावी. शिक्षणाचे संगणकीकरण देशात झाले पाहिजे. शिक्षणातून उदरनिर्वाहाचे कौशल्य मिळाले पाहिजे. शिक्षणात गुणवत्ता फार महत्त्वाची आहे. त्यासाठी प्रामाणिक व हुशार विद्यार्थी यांच्यावर अन्याय होता कामा नये. शिक्षणात कॉपिला उत्तेजन देणाऱ्या मंडळींवर कडक कारवाई व्हावी. शिक्षण बोर्डात उच्च अधिकारी वर्ग कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता शिक्षणाचे पावित्र्य राखावे. योग गुणदान हा विद्यार्थी वर्गाचा अधिकार आहे. कॉपी पुरवणाऱ्या शाळांची मान्यता रद्द केली जावी. अनुदान बंद करावे. तेथील कर्मचारी वर्ग त्यात दोषी धरला जावा. अधिकारी नेमताना त्यांना पुरेसे संरक्षण देण्यात यावे. स्थानिक पोलिस न नेमता त्या ठिकाणी दुसऱ्या यूनिटचे पोलिस व अधिकारी नेमले जावे.प्रत्येक शाळेची गुणवत्ता तपासली जावी. सरसकट विद्यार्थी उत्तीर्ण करू नये. अनुतीर्ण होणार यांमुळे विद्यार्थी अभ्यास करू लागतील. शिस्तीसाठी ते फार मोठे पाऊल आहे. वर्गनियंत्रण मिळविण्यास मदत होईल.