वारी
वारी
मी नुसतं घरात म्हटलं...
मी पंढरीच्या वारीला जाणार..
पांडुरंगा सोबत
चार गुजगोष्टी करणार..
दुःखाचं वाळवंट माझं
चंद्रभागेत भिजवणार..
सुखाच्या रिंगणात
भान हरपून फिरणार..
तर केवढा कांगावा
घरातल्या विठोबाने केला ..
कंबरेवर हात घेत...
मुलांचं काय..?
माझा डबा कोण देणार..?
आईशी बोललीस..?
काही जबाबदारीची जाणीव..?
नुसता माझ्या नावाने
मुक्त घोष केला...
मी नुसतं घरात म्हटलं..
मी पंढरीच्या वारीला जाणार..
सासूबाईंनी तर पार
'आवडी' च मौनचं घेतलं..
टाळ चिपळ्यांच्या आवाजानं
अवघं स्वयंपाकघर दुमदुमलेलं..
का तर मी नुसतं घरात म्हटलं..
मी पंढरीच्या वारीला जाणार..
छोटी मुक्ताई
वाट उडवून उभी राहिली..
मोठ्या जनीने
व्याकुळ
नजर दिली..
'आई' च्या टाहोचा
एकच गजर झाला..
कारण मी नुसतं घरात म्हटलं..
मी पंढरीच्या वारीला जाणार..
दारात तुळस थरथरली
अगं पाणी कोण घालणार...
कपडे वाळत घालताना
मन कोण मोकळं करणार..
रांगोळी घालताना
नवी गणितं कोण मांडणार..
हो तिने ही ऐकलं होतं.. .
मी पंढरीच्या वारीला जाणार..
ती दारातूनच म्हणाली
तु थांब इथचं.. नको करू वारी..
हिच तुझी पंढरी..
भरला संसार घरी,
पांडुरंगा हृदयी..
जन्मोजन्मी सलगी माझी..
कळवीन त्याला सारी,
सुख दुःख तुझी..
विठू राया उभ्या
जगाची माऊली
तुझ्याच रुपानं त्याची
घरी वावरते सावली...
तू नुसतं आज म्हणालीस
तू पंढरीच्या वारीला जाणार
अगं माऊलीविना हा
गाभारा मात्र रिता राहणार