उपकार सैनिकांचे
उपकार सैनिकांचे
मरताना पण हसतो
तो देशाचा सैनिक असतो,
देशासाठी आपुल्या
तो अविरतपणे लढत असतो
तारूण्याचे क्षण तो
स्वतःसाठी जगत नाही,
तरूणाईची उमेद सगळी
सदैव देशासाठी वाही
जीव अडकला त्याचा
आपल्या कुटुंबामध्ये जरी,
डोळ्यांत तेल घालून तो
असंख्य कुटुंबांचे रक्षण करी
ऊन, वारा, पाऊस, शत्रू
यांचे त्याला भय नसते,
देशासाठी लढण्याची
अदम्य जिद्द त्याच्यामध्ये असते
अतिरेक्यांचा हल्ला होतो
हाच मृत्यूला सामोरा जातो,
शत्रूंचा त्या खात्मा करूनी
आपल्या देशाची लाज राखतो
छोट्यांचा आधारस्तंभ अन्
आई वडिलांची आशा तो,
वाट पाहणार्या पत्नीच्या
ओल्या नयनांची भाषा तो
प्राण पणाला लावून ज्याने
आपणाला जीवदान दिले,
थोर असे उपकारच त्याने
आपणा सर्वांवर केले
कृतघ्न होऊन जर का आपण
विसरून गेलो उपकारांना,
किती यातना होतील सांगा
त्या असंख्य हुतात्म्यांना
स्वार्थ सोडूनी आपण सगळे
कृतज्ञतेची कास धरू,
एक होऊनी आपण त्यांच्या
भवितव्यासाठी कार्य करू
छोट्या छोट्या मदतीने मग
कुटुंब त्यांचे सुखी करू,
उदात्त अशा कार्याने करू या
मानवतेचे पर्व सुरू...
