उपदेशाचा डोस
उपदेशाचा डोस
उपदेशाचा डोस म्हणजे
शहाणपणाचा टोला असतो
काळजावर घाव घालणारा तो भाला असतो
किती खोल असते ती जखम
सहन होत नाही
अरे पाठीवर हात ठेवून
लढ म्हणायला एकही पुढे येत नाही
मग आपणच आपले सावरुन
शहाणे व्हायचे असते
उपदेश देणाऱ्याला
आपल्या कर्तबगारीने
उत्तर द्यायचे असते
बघायचे असते
जमीन-आसमानाचे अंतर
वर आभाळाकडे बघून
आणि मोजायची असते
आपल्या यशाची लांबी-रूंदी
अरे आपल्या प्रयत्नात बळ असले की
अशक्य ते काहीच नसते
पंख छाटले तरी
गगनभरारी घ्यायला आकाश मोकळे असते
बघवले जात नाही
यश दुसऱ्याचे
सन्मान बघुन ते
स्वतःला जाळून घेतात
गळाभेट घ्यायला
पाय त्यांचे जड होतात
या जगात तर
पाय खेचणाऱ्यांची कमी नाही
तरीही लाथ मारून आपला मार्ग काढायचा असतो
उपदेश देणाऱ्याला उपदेशाचाच टोला हाणायचा असतो
