त्या तिथे वाळवंटी
त्या तिथे वाळवंटी
त्या तिथे वाळवंटी
खेळ हा मांडलेला
वाट पाही भिडूंची
खेळीया थांबलेला
ज्ञानिया येत आहे,
पंढरी आज दारी
लेकरे काय झाली ?
माउलीला गमेना
बोलला तो तुकोबा
"सावळ्या, का परीक्षा
घेतसे लेकरांची
धीर तो सोडलेला."
मंद हासून बोले,
"तू किती पावसाळे
पाहिले रे तुकोबा,
पायवारीत येता ?
स्वच्छता या तनाची,
मुख्य आहे मनाची
सांगता तूहि लोकां
ऐकले का कुणीही ?
मीच केले उपाया.
हस्तप्रक्षालनाचे
मोल ते सांगण्याला
हे दिले वर्ष त्यांना."
यापुढे पायवारी
स्वच्छता पाळलेली.
जो कुणी मोल जाणी,
तोच येईल दारी."
"ठीक आहे, तरीही
विट्ठला विठ्ठला हे
नाम घेता मुखाने
होत जातेच वारी."
बोल ऐके तुक्याचे
भान जाई हरीचे
देउनी प्रेम दोघां
देत आलिंगनाला.