तिच्या आधाराशिवाय
तिच्या आधाराशिवाय
प्रत्येक वळणावर घाव घालणारे बरेच असतात म्हणून तिला खाचखळग्यातून वाट काढीत पाय रक्तबंबाळ करून घ्यावे लागतात
स्त्रियांच्या वाटेला एक सरळ मार्ग नसतोच कधी
किती पर्व निघून गेलेत तरी आजही ती पूर्ण स्वतंत्र होण्याचीच वाट बघत असते
कपाळावरचा कुंकवाचा भार घेऊन स्त्री होण्याचं ओझं मिरवताना घाबरून जगते
कळत नाही काय असतो तिचा गुन्हा
ती सामर्थ्यवान असूनही केवळ हाडा-मांसाचा गोळा समजून तिला राबवून घेतात
तिच्या सन्मानाच्या वाटेवर फक्त काटेच असतात
तिच्या पायातली बंधनाची बेडी काढत का नाही कोणी
ती घरात नसल्यावर दिवसाही चांदणे दिसतात
आणि तिच्याशिवाय पुढेही सरकत नसतात
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तिच्या आधाराची गरज लागते
तरी तिचं कर्तृत्व अंधारातच असते
बुडत्याला फक्त काडीचाच आधार हवा असतो
एकदा तरी देऊन बघा तिला पूर्ण स्वातंत्र्य
म्हणजे तिच्या इच्छेने तिला जगता येईल
ज्याच्या नावाचा कुंकू कपाळावर असते
त्याच्या कुळाचा झेंडा अटकेपार मिरवता येईल
तिला फक्त लढायला बळ हवं असतं पाठीवर हात ठेऊन
आईपासून तर आजीपर्यंतची ती जबाबदारी घेते
तिच्या आधाराशिवाय घराला घरपण नसते
बंधनाच्या उपरण्याला
कर्तव्याची गाठ बांधून ती
सासरी येते
माहेरची साडी पांघरून ती हे जग सोडते
सुख तर तिच्या वाटेला कधी येतंच नाही
