परिपक्व
परिपक्व


आज माझं मन पुन्हा एकदा भरून आलं
मागच्या वेळी झालं होतं ना अगदी तसंच
मग डोळ्यांची शोधाशोध सुरू झाली
एका निर्मनुष्य कोपऱ्याची निवड झाली
मग एका मागे एक अश्रूंची लगबग सुरू झाली
थेंबांनी सुरुवात आणि धारांनी सांगता झाली
मग एक प्रयत्न झाला धारांनी तुकडे बांधण्याचा
आलेल्या परिस्थितीत उगाचच समन्वय साधण्याचा
मग दुरून कुणाची तरी हाक कानी आली
एकांताची साथ आता सोडण्याची वेळ झाली
मग सगळे तुकडे एकत्र करून त्यांचा गोळा केला
धारांनी बांधलेला होताच तो धोरण
ांनी घट्ट केला
मग एक स्मित चिकटवलं ओठांवर कालच्यासारखं
जसं सगळंच काही छान चाललंय अगदी नेहमीसारखंच
मग तसेच काही दिवस गेले काही लोटण्यात आले
पुन्हा एकदा मन तसंच भरून आलं... अगदी आधीच्या सारखं
मग आता पुन्हा एकदा कोपरा, धारा, बंधन आणि धोरण...
पण आज असं काही काही झालं नाही...
अश्रूच काय तर साधे डोळेसुद्धा पाणावले नाही..
मग मी मनाला भीत भीतच विचारलं
अरे हे सगळं असं, कसं काय झालं?
मग ते हळूवार पण धीराने म्हणालं
तुझं हळवं मन आता परिपक्व झालं