पाऊले चालती
पाऊले चालती
*साहित्य प्रकार - अभंग लेखन*
पाऊले चालती
पाऊले चालती |आळंदीची वाट|
दिंडीचा हा थाट | ज्ञानेशाच्या ||1
हालला कळस | निघाले माऊली |
खेळती पाऊली | भक्तगण ||2
जेजुरी मुक्काम | खंडेराया भेट |
अवघड वाट | घाटाचिया ||3
घोड्याचे रिंगण | वारकरी दंग |
नाचतात संग | माऊलीच्या ||4
सारे देव येती | पांडुरंग भेटी |
पंढरीत दाटी | वैष्णवांची ||5
तुळशीची माळ |कपाळी हो बुका|
देहुत हा तुका | शोभतसे ||6
घातला हा वेढा | भिमा चंद्रभागा |
जोडला हा धागा |अमृताचा ||7
भक्ताचेच लाड| किती केले देवा |
रुख्मीनीला हेवा | वाटलासे ||8
आबीर बुक्याची | तुला रे आवड |
झाली परवड | रुख्मीनीची ||9
आषाढी वारीत |आले सर्व संत |
मनी नाही खंत | संसाराची ||10
दुर्गा देशमुख
परभणी
