पाणी
पाणी
1 min
127
आटले पाणी डोळ्यातले
आभाळानेच इतके दिले
दिले ते दान असे झोळीत
रितेच परि हात हे राहिले
रित्या हाताने आता अशी
स्वप्नांची राख सावडावी
उभा जन्मच वेचला तरी
चिताच दैवाने दाखवावी
जनावर, शिशूच्या डोळ्यात
हतबलता काठोकाठ भरते
कारूण्याचा डोह होऊनिया
मूक आक्रंदने कानात घुमते
मूठमाती देऊनी घरादाराला
काळीज आता गोठून गेले
जगण्याची झिंग ओसरून
फक्त प्राक्तनाचे बाहुले झाले
येईल पुढ्यात नवा डाव परि
स्वजनच न आता असे उरले
संचित म्हणून का उगाच असे
क्रूर चेष्टेने पट समोर मांडले?
खेळ तू डाव कितीही क्रूरपणे
हार न मारणार, तुझीच लेकरे
दोन हात करण्याचे पाठही
नियती तुझ्याचकडून घेतले
