माय (my) लेक
माय (my) लेक
इटुकली पिटुकली
इवली ती धिटुकली
उमगले मज नाही
केव्हा मोठी झाली?
आलीस तू जेव्हा परी
तुला धरले हृदयाशी
किती कितीदा घेतले
गालगुच्चे सोनुलीचे
माझ्या घरी तू आलीस
नवचैतन्य घेवून
फुलला गं क्षणार्धात
सोनचाफा अंगणात
जशी जुईलीची कळी
मंद सुगंधित झाली
सोनकळी माझी मी
उमलताना पाहिली
तुझ्या काळजीने दाटे
मनी अनामिक हूरहूर
तुज पाहता पाहता
झाली तू आँखो का नूर
लेक माझी तू साजिरी
तुझी लडिवाळ वाणी
माझ्या डोळ्याचं तू पाणी
माझ्या स्वप्नांची तू राणी
माझा जीव माझा प्राण
तुझ्यामध्ये गं वसतो
तुझ्या सुखासाठी माझा
प्राण कंठाशी दाटतो
माझ्या मायेचा हा झरा
तुझ्यासाठीच वाहतो
तुझ्या सुखासाठी माझा
श्र्वास प्रश्वास चालतो
लेक माझी गं लाडाची
व्हावी किर्ती तिची मोठी
औक्षण करीते मी तिला
उदंड आयुष्यासाठी
जन्मोजन्मी येशील ना
पोटी माझ्या, माझ्या बाळा
भाग्यशाली मी होईन
तुझी माय म्हणवून
