कृष्णाचा पाळणा
कृष्णाचा पाळणा
पहिल्या दिवशी कृष्ण जन्मला
सारी पुण्याई आली फळाला
कंस मामाचा गर्व गळाला
जो बाळा जो रे||1
दुस-या दिवशी वासुदेव निघाले
यमुनेच्या पाण्याने स्पर्श हे केले
सगळे मार्ग मोकळे झाले
जो बाळा जो रे||2
तिस-या दिवशी झाला आनंद
खेळण्यात सारे दिसती दंग
माता पिता झाले यशोदा नंद
जो बाळा जो रे ||3||
चौथ्या दिवशी यशोदा बोल
सा-या नगरीत वाजवा ढोल
बोबड्या बाळाचे कळुद्या मोल
जो बाळा जो रे ||4||
पाचव्या दिवशी गोपिका नारी
दहीदुध घेऊनी जाती बाजारी
गोपाळ घेऊनी उभा मुरारी
जो बाळा जो रे ||5||
सहाव्या दिवशी गोपी बोलली
जशी कमळाची कळी खुलली
यशोदामाई कृष्ण झुलवी
जो बाळा जो रे ||6||
सातव्या दिवशी पुतना पावली
नंदाच्या घरी लवकर धावली
श्रीकृष्णाने तिची वाट लावली
जो बाळा जो रे ||7||
आठव्या दिवशी आठवा वार
यमुनेच्या काठी सगळे बेजार
कृष्णाने केले कालीयाला ठार
जो बाळा जो रे ||8||
नवव्या दिवशी शिंक तोडीले
बाळगोपाळानी माठ फोडीले
यशोदेने कृष्णाला बांधुन ठेविले
जो बाळा जो रे ||9||
दहाव्या दिवशी संकट भारी
पाऊस आला घेऊन सरी
संरक्षण करण्या उचलला गिरी
जो बाळा जो रे ||10||
अकराव्या दिवशी जमला मेळा
दहीदुध लोण्याचा गोपाळकाला
दहीहंडीचा प्रसाद झाला
जो बाळा जो रे ||11||
बाराव्या दिवशी कळस झाला
अंहकाराचा नाश हो केला
कृष्णाने वधले कंस मामाला
जो बाळा जो रे ||12||
