खाटीक
खाटीक
नेहमी सारखीचं एक पहाट आज रोजची वाटत नव्हती.
शांत या शब्दाला साजेशी अशी चिर्रर्रर्र शांतता होती.
रस्ते मोकळे आणि स्वच्छ.
नेहमी रस्त्यांवर दिसणाऱ्या फांद्या, पाने, पालापाचोळा आज अगदीच असं काही नव्हतं.
रस्ते साफ आहेत याचा एका अर्थाने आनंद व्हायला हवा कि दुःख हाच मोठा संभ्रम होता .
आज नजरेसमोरचं अगदी क्षितिजापर्यंतच दिसत होतं,
एरवी तीच नजर समोरच्या चार झाडांना धडकून परत यायची.
आज छातीत काहीशी जळजळ होत होती.
अचानक लक्षात आलं चक्क मला आभाळ स्पष्ट दिसू लागलं होतं.
एरवी अलगद मधेच झाडांच्या कुशीत झोपलेलीं सूर्यकिरणें
आज चक्क जमिनीवर वास्तव्याला आली होती.
माणसांच्या हाकेपेक्षा प्रेमळ होऊन हाक देणारे पक्ष्यांचे आवाज
आज ऐकूच येत नव्हते किंबहुना ओळखीची पाखरें सुद्धा आज दर्शन देत नव्हती.
कालपर्यंत झाडांच्या फांद्यांच्या कुशीत विसावणारी घरटीं सुद्धा आज दिसत नव्हती.
नेहमीच असणारी प्राण्यांची वर्दळ आज कुठे गेली?
अहो, त्यांचा जीव धोक्यात आहे त्यांना काल कळालं होतं, 
;
मुकी बिचारी ती सहनच करणार जे समोर वाढलं होतं.....
हतबल होते सर्व सारे
एकाकी अख्खी जात होती,
दूर नशीब पळालं होतं........
करतील तर काय बिचारी,
अहो त्यांचं घर जळालं होतं........
काय त्यांचा दोष साहेब काय त्यांचा दोष??
अहो माणसांना घरं खाली करण्यासाठी तुम्ही एक दोन महिने देता...
मुक्या प्राण्यांच्या बाबतीत मात्र तुम्ही तुमचे निर्णय परस्पर घेता?
साहेब काल जी झाडं तोडलीत ना त्यांत लहान रोपं सुद्धा होती बरं का.....
अगदीच तुमच्या लहान निरागस मुलांसारखी........
हलक्या मेंदूचे तुम्ही लोकं साहेब, तुम्ही तर थांबणार नाहीतच....
पूर्वी ओकलेले शब्द कुठे हरवले कि कायम वस्तीला वहीतच.....
पण जमलंच तर एक रोपटं लावून बघा, पुण्य मिळेल बरं का.....
अहो तुम्ही खुशाल जनतेसाठी देव म्हणून वावरतं असालही
पण आमच्यासाठी तुम्ही खाटीकंच, बरं का.....
पण आमच्यासाठी तुम्ही खाटीकंच, बरं का.....