काठावरचे शब्द
काठावरचे शब्द
काहीसे आभाळ डोळयात साठवलेले
ओल्या ओल्या डोळ्यात हलकेच पुसलेले
मनाच्या आर्त हाकेतून शब्द उमटलेले
समुद्र किनारी बसले असता शांततेत सांडलेले
क्षितिजापर्यंत पोचण्याआधीच,
शब्दांचा किनारा गाठायचा होता..
भिजलेला मनाचा काठ काठोकाठ,
भरलेला रिकामा करायचा होता..
अनपेक्षितपणे हदयात उमटलेला,
एक ओला उद्गार मांडायचा होता..
समुद्राच्या सोबतीने शब्दांतून वाहणारा तो
मनाचे ओझे हलके करणारा क्षण होता..
प्रत्त्येक लाटेबरोबर ऊर भरून,
येणारी सल हलकेच मांडत होता..
हसून मी असतेच तशीही पण
इतरांबरोबर स्वतः ला फसवणारा होता..
मनाच्या जखमा उगीच मांडते,
असंही वाटणारा सल होता
समुद्राची खोली शब्दांचा ठाव घेतांना
नवे क्षितिज दाखवणारा कल होता..
नेहमीसारखेच मनाला समजवतांना
आठवांचे गीत गाणारा कुणी होता..
त्या सुरावटीतून काळजातील,
उणीव भरून काढणारा तो होता..
