जय श्रीकृष्ण
जय श्रीकृष्ण
भविष्य वाणी वर्तिली होती पुत्र आठवा
देवकीचा होईल कर्दनकाळ कंसाचा
निर्दयी झाला बंधू, बंदी केले वसुदेव देवकीला
मृत्यु केला कंसाने तिच्या सातही अर्भकांचा.
श्रावण अष्टमीला बारा वाजता कृष्ण जन्मला
झोपले द्वारपाल, तुटले साखळदंड, दार उघडले
टोपलीत घेऊन बाळ, वसुदेव निघाले गोकुळी
यमुनेच्या पूराला कृष्ण अंगठ्याने पाट फुटले.
कर्दनकाळ कंसाचा नांदू लागला नंदा घरी.
कृष्ण सावळा, गोड हसरा, मयूर पंख शिरी
शोभे लाडिवाळ नंद किशोर यशोदा बाळ
चमत्कार दावी अंगुलीवर धरुनी गोवर्धन गिरी.
कलिया मर्दन डोहात उडी मारुनी केले
गोप गोपिकांचे मटके फोडुनी खोड्या करी
दही दूध चोरी, दही काला सवंगडी संगती
मनोरा रचुनी माठ फोडी गोविंदा शिंक्यावरी.
बासुरी स्वर कानी पडतांच गाई गुराख्यांचा मेळा
मंजुळ स्वर ऐकुनी राधाही होई ती बावरी
रासलीला, रंगपंचमी खेळे गोप गोपी संग
युगायुगांतरी प्रेम ते भावे राधा जगदीश हरी.
