जथ्था परतीचा
जथ्था परतीचा
जथ्था चालला माघारी
परतीच्या पावलांनी
कशी अस्वस्थ झाली दुनिया
एका अदृश्य विषाणुनी
हातावरच्या पोटाला या
भ्रमंती चौफेर दुनियाची
कुणी इथला, कुणी तिथला
तऱ्हा सांगावी तर कुणा कुणाची
खळगं पोटाचं भरण्या
रोजचं रोंजदारीचं जगणं
स्तब्ध झाली दुनिया पर
पोटाला कळेना की हे वागणं
कोटी कोटीची उड्डाणे भरली
अवतरली जी ती मायभूमी
पण मायभूमीतलेच अंतर
चालुनही होईना की कमी
डोईवर संकटाचे ओझे
पायी चिकटाचे पाणी फोड
दमला जीव जेव्हा चालून
>मरण्याआधी निजला पटरीवर थोडं
भाकरीसाठी चाकरी दाहीदिशा
त्या भाकरीचीच झाली पटरीवर दशा
बेत होता नंतर घास तोडण्याचा
विस्कटल्या भाकऱ्या तशाच्या तशा
कोणी चालला एकला
कोणी घेऊन सोबत परीवार
वाट खुणवी घरची संकटात
पण संकटच मिरवते डोईवर
कधी थांबायचा हा प्रसंग
ज्याने झाला रंगाचा बेरंग
मरण इतकं झाले का स्वस्त
विचार करूनच थरथरते आता अंग
कसा हा विषाणू आला
ज्याने मी पणा खोडून दाखवला
उच्च, नीच, धर्म, जातपात सोडून
जथ्था, परतीच्या पावलांनी चालला