दुष्ट चेहरे नात्यांचे
दुष्ट चेहरे नात्यांचे
जे होते कधी माझ्यासंगे
संधी साधूनी झाले दूर,
वाटले त्यांना मी हो संपलो
संपून गेलाय माझा नूर
अनुभवांवर कटू अशा या
जीवन माझे वसले आहे,
दगाबाजीचे असंख्य खंजीर
या पाठीमध्ये घुसले आहे
स्वभाव माझा परखड इतका
खोटी स्तुती कधी जमली नाही,
म्हणूनच झटलो इतरांसाठी
तरी किंमत त्यांना कळली नाही
ऐश्वर्यामध्ये होतो जेव्हा
होते कडे मज आप्तजनांचे,
हळूहळू मग दिवस बदलता
गेले मुखवटे गळूनी त्यांचे
जोवर होते दिवस चांगले
गैरफायदा घेतला त्यांनी,
सांगून नाते रक्ताचे
मज गाफील ठेवले सगळ्यांनी
दुःख नाही मज आता त्याचे
हे घडणे होते जरूरीचे,
अन्यथा कळले नसते मजला
दुष्टरूप त्या नात्यांचे
आता मात्र सज्ज मी आहे
पुन्हा नव्या निर्धाराने,
हितचिंतक अन् हितशत्रू मज
उमजले या कटू अनुभवाने
शिखर यशाचे गाठण्याआधी
एकदा शून्य होऊनी जावे,
दिसतील मग जे दुष्ट चेहरे
टाळत त्यांना पुढे निघावे...!!!
