दुःखाचा सोहळा
दुःखाचा सोहळा
1 min
130
इथं कुणब्याच्या भाळी,
आहे दुःखाचा सोहळा ||धृ||
मातीच्या उदरातून, इथं उगवलं सोनं
येई पीक धावून, जाई व्यापारी घेऊन
होई कुणब्याची होळी, व्यापाऱ्यांचा पोळा ||१||
घामाच्या थेंबाथेंबातून उगवे पिकाचा कोंब
इथं लाखमोलाचा रं, होय एक-एक ठोंब
किती पिकलं तरी, हाती राही पाचोळा ||२||
कष्टाचं रं फार काम, अंगातून गळे घाम
पोरं रानावनातूनी, फिरतीरं अनवानी
तिफणीच्या मागं त्यांची, पेरणीची शाळा ||३||
संसार फाटका अन्, व्याजाचा रं तडा
भेगाळलं मन सारं, बुजवीरं बापडा
रिकामीरं ओंजळ, भरलेला डोळा ||४||
इथं कुणब्याच्या भाळी .......
