STORYMIRROR

Nishikant Deshpande

Others

3  

Nishikant Deshpande

Others

देव अंतरी बघावयाची

देव अंतरी बघावयाची

1 min
471


केली होती सर्व तयारी निघावयाची

आस मनी का जागवली तू जगावयाची?


कल्पतरूच्या झाडाखाली नाही बसलो

मनास भीती अभद्र इच्छा रुजावयाची


जन्मताच मी, कुमारिके का मला फेकले?

आई! कुठली रीत पाप हे धुवावयाची?


लक्तरात मी जीवन जगलो आज कशाला?

संधी देता तिरडीवरती सजावयाची?


ज्योत तेवते प्रकाश देण्या जगास, पण का?

परवान्यांना सदैव घाई जळावयाची


हवा कशाला व्यर्थ पसारा गणगोताचा?

हमी असावी चारच खांदे मिळावयाची


मावळली जात्यांची घरघर, सुरेल ओव्या

पुन्हा वाटते पहाट यावी दळावयाची


बिर्ला मंदिर जसे बांधले, नावामध्ये

बिर्ला असतो रीत देव का नसावयाची?


"निशिकांता"ने ध्यान लावण्या डोळे मिटले

ओढ लागली देव अंतरी बघावयाची


Rate this content
Log in