ढग्ग ढग्गोबा
ढग्ग ढग्गोबा
1 min
15
आभाळात कशी चालली मस्ती
ढगांची ढगांशी जुंपली कुस्ती
आज सगळे भिडले वरती
तुझी जास्ती का माझी जास्ती
बघुया कोणाची किती शक्ती
ढग्ग ढग्गोब्बा जय पावसाळा
धडका धडकी ढकल डाव
वार्याच्या रथात आले स्वार
विजेचा बाण अन जिरली सारी
हरुन उतरले डोंगरावरी
फुटून बरसले धरतीवरी
ढग्ग ढग्गोब्बा जय पावसाळा
ढगांची दुलइ कुडकुड थंडी
वानरसेना हरवली सारी
ढगाच्या मीठीत गंमत न्यारी
चोर तो पळतो भारी
हातात कसा येतच नाही
ढग्ग ढग्गोब्बा जय पावसाळा
डोंगराची अंघोळ पाणीच पाणी
नदीची पिल्ले पळतात कशी
त्यांच्या मागे टोळी आमची
बेडूक मधेच काढतो खोडी
माशांच्या पाठी कागदाची होडी
ढग्ग ढग्गोब्बा जय पावसाळा