डायरी
डायरी


आज डायरी काढली
त्यावरची धुळ आधी पुसून घेतली
डायरीचं पहिलं पान काढलं...
एक दिड वर्ष तरी झालं होतं
डायरी काढून...
डायरीच्या पहिल्याच पानावर
तिच नाव होतं...
मी तिच्या नावावरुन अलगद हात फिरवला
आणि डोळे बंद केले...
डोळे बंद करताच तिची सारी मोहक तसवीर
माझ्या डोळ्यासमोरुन लाजत लाजत
अंग चोरुन जात होती...
तिच्या नावाला स्पर्श करताच आमच्यातल्या साऱ्या काही आठवणी पुन्हा नव्याने मला भेटत होत्या, त्या म्हणजे
शांत होत असलेल्या कोळशाला फुंकर मारुन कुणीतरी परत पेटतं करावं... अशाच...
इतक्या वेळ भटकत चाललेलं माझं मन
अस्वस्थ असलेलं माझं मन
तिचं फक्त नाव पाहूनच तिच्या जवळ घुटमळत होतं...
बहरत चाललेलं मन आता सगळी डायरी
चाळायला उतावीळ होऊन बसलं होतं...
आत्ता कुठं ठिणगी पेटली होती...
मी भराभर डायरीची सारी पानं चाळत जात होतो...
तिला परत वाचताना
तिला परत वाचताना
वाटेत...
वाटेत मला कुणी आडवायचं, कुणी विनाकारण थांबून घ्यायचं,
कुणी चौकशाच चौकशा करायचं... आमच्याबद्दल...
मी मात्र खूप कंटाळलो होतो यांच्या चौकशांना...
तेव्हाही आणि आजही...
डायरीत जिथं जिथं नवं कुणी ओळखीचं अथवा कुणी चौकशा करणारं माणूस भेटू लागलं...
मी ते पान दिसताच क्षणी मागचा पुढचा विचार न करता त्या माणसासकट मागे टाकू लागलो...
आपल्या माणसाला नेहमी आपण शोधायचं असतं आणि आपणच वाचायचं असतं... हे तिचंच वाक्य होतं...
आजही मी तिचं हे वाक्य चोरुनच वापरत होतो...
तिनं खूप काही लिहिलं होतं माझ्यासाठी
मला मात्र लिहिणं कधी जमलं नाही तिच्यासाठी
मी फक्त वेड्यासारखा तिच्यातल्या
वेड्या काळजाला वेड्यासारखीच दाद द्यायचो...
ती म्हणायची, शब्दांना खूप किंमत असते...
शब्दांना अर्थ असतो... शब्दांना भावना असतात...
शब्दांना आवाज असतो... शब्दांना हृदय असतं...
इतकं सुंदर लिहिणाऱ्या सुंदरीला
मी फक्त एकच म्हणायचो,
मला काही तुझ्या शब्दांचा खेळ फारसा कळत नाही
पण कधी वेळ पडली तर
पण कधी वेळ पडली तर
फक्त तुझ्यासाठी
मी या शब्दांपेक्षाही मोठा होऊ शकतो...
डायरीचं प्रत्येक पान स्वतःचं वय सांगत होतं...
त्यात एखादं पान असंही असायचं
जे नकळत आमच्या दोघांचीही वयं सांगून जायचं...
प्रत्येक पानावर तिने आमच्यातल्या
साऱ्या आठवणी लिहून ठेवल्या होत्या...
तिच्या इतकंच सुंदर
तिचं नाजूक अक्षर
त्या नाजूक हाताला ते नाजूक अक्षर
शोभून दिसणारं होतं...
लिहिण्याकरता कागदाला केलेला स्पर्शही नाजूकच असेल... नाहीss...
बघता बघता डायरीचं शेवटचं पान आलं
नेहमीसारखी मी डायरी बंद केली...
कपाटात परत ठेवली... शेवट न वाचता...
मी आत्तापर्यंत जेवढ्या वेळेस डायरी
हातात घेतली होती...
त्या प्रत्येक वेळेस मी कधीही
डायरीचा शेवट पाहिला नव्हता...
कारण,
कारण काहीही नव्हतं...
फक्त तिला दिलेला शब्द मी पाळत होतो...
मी वचन दिलं होतं तसं तिला...
बस्स इतकंच...
व्हेंटिलेटरवर आयुष्य जगत असलेली
हॉस्पिटलच्या सिंगल बेडवर
एकदम शांत शांत निजली होती...
मला तिने तिच्या जवळ बोलावून घेतलं होतं...
मी जवळ जाताच तिने तिचे नाजूक ओठ
माझ्या कपाळाला लावले होते...
मग मी ही परतफेड म्हणून
हळूच माझेही ओठ तिच्या कपाळावर ठेवले होते...
अखेर,
अखेर माझ्या कानात काहीतरी
कुजबुज करत तिने ही डायरी
माझ्या हातात दिली...
आणि अडखळत अडखळत बोलून गेली,
डायरीचं शेवटचं पान कधीही वाचू नकोस,
फिर मिलेंगे!..
मी होकार दिला...
होकार देताच तिचा हात
माझ्या हातातून निसटला
तो आजही निसटलेलाच आहे...