चारोळ्या
चारोळ्या


शहरातलं जीवन धावतंय
घड्याळाच्या रिंगणात
माझी वाट बघत आई गावात
बसली असेल अंगणात
कुंपण घातलेल्या अंगणात येऊन
एक पाखरू माझ्यावर हसलं
कारण वरती न संपणारं
त्याचं आभाळ त्याला दिसलं
पाऊस खरोखर कधी कधी
वाटतो मला करूण
बरसायला लागल्यावर तो
सगळेच आडोशाला धरून
मी कामात व्यग्र
अन समोर पाऊस पडतोय रानात
भीती एकच की
मनातलं वादळ फुटणार मनातल्या मनात
रानातला पाऊस म्हणजे
पुन्हा भान हरवणार
आणि घरी कधी परतायचं
हे
पाऊसच ठरवणार
चालता चालता लहान मूल
तोल जाऊन पडलं
लागलं म्हणून नाही
तर चालता आलं नाही म्हणून रडलं
तुझ्या मनात काय आहे नक्की
काहीच मार्ग नाही बघ कळायला
अन एकीकडे तू म्हणतेस
दोघांचेही विचार हवेत जुळायला
झाडाची पानं म्हणजे त्यांचे अश्रू
दुःख अनावर होऊन गळतात
आणि ज्याला ते दुःख कळतं
त्याच्या वहीत ती आपल्याला मिळतात
कधी कधी डोळ्यांत पाणी येतं
सहज मनापासून हसल्यावर
अश्रूंनाही वाटतं नव्यानं झिरपावं
माणूस दुःखात नसल्यावर