चारोळ्या
चारोळ्या


नदीत तरंगणारा एक ओंडका
गेला आयुष्याला कंटाळून
इतक्यात बुडणारे दोन हात
बसले त्याला कवटाळून
वडाखाली वाटसरू
निवांत बसलेले
आणि जुंपलेले बैल मात्र
उन्हाने त्रासलेले
पक्षी सोडून गेले तसं झाड म्हणालं
उगीच का आयुष्य लांबवावं
ईतक्यात तिथून जाणाऱ्या वाटसरूला वाटलं
जरा ह्याच्या सावलीखाली थांबावं
मला खूपदा वाटतं
पहिल्या पावसात भिजावं
मातीचा सुगंध सुटल्यावर
त्या मातीतच निजावं
सोबत कुणीतरी लागतं
दुसऱ्या गावात नेउन सोडणारं
कारण मध्ये घनदाट रान लागतं
दोन गावांना जोडणारं
माझ्या मनात डोकावल्यावर
तुला एकच गोष्ट दिसेल
तुझंच प्रतिबिंब तुझ्याकडे
अलगद पाहून हसेल
"तू "
हा माझ्या आवडीचा विषय आहे
आणि तुझ्यासवे जगणं
हा त्यातला संक्षिप्त आशय आहे
तू आणि गुलाबाची कळी बघता
माझी फ़सगत झाली बघ काल
तू लाजताना ती उमलताना
दोघांचाही रंग लाल