बळीराजा
बळीराजा


गुरढोर घेऊन भल्या पहाटे
बाहेर पडला भर थंडीत,
हातात काठी अन् घालून धोतर
निघाला बळीराजा बघा बंडीत.
पाऊल टाकीत देशेन नदीच्या
जनावरांना पाणी दावलं,
सोडून गुरांना पाण्यातच
त्यानं गवताचं भार लावलं.
आला घरी परतूनी
अन् सुस्कारा त्यानं सोडला,
कारभारणीने ताट वाढलं,
त्यानं मुठीन कांदा फोडला.
झाला प्रहार दुपारचा
सूर्य आला डोईवर,
घेऊनी खुरप हाती,
निघाला राजा शेतावर.
भर उन्हात पोचला शेतात गडी
गाळून माथ्यावरला बोटांनी घाम,
भिजलेल्या चिंब अंगानच त्यानं
केलं सुरू रानातल काम.
>झाली बघा सायंकाळ
दिवे लागणीची वेळ झाली,
आटोपून शेतातल काम गडी
घरच्या रस्त्यानं पायी चाली.
झाली येळ सांची म्हणून
गोठा पुरा त्यानं साफ केला,
वासरास करून गाईच्या हवाली
गुन्हा स्वतः चा त्यानच माफ केला.
दिस सारा बुडून गेला
अंधाऱ्या रातीची वेळ आली,
रातची पंगत उठली अन्
गावची दार बंद झाली.
रात अर्धी उलटुन गेली
गावही सारा झोपी गेला,
मातुर हाकवण्यासाठी गवा रानातला
कंदील राजानं उभा केला.
तुडवीत अंधारी पायवाट राजा
काटेरी रानमाळातून घरी आला,
ठेऊनी पाटाच्या उशीवर डोकं
सुखाची झोप तो झोपी गेला.