अश्रुंचा अभिषेक
अश्रुंचा अभिषेक
विनंती करूनही देवा तू
पाऊस देत नव्हतास
तरीही शेतात राबायचो
घाम गाळून पेरणी करायचो
थोड्याशा आनंदातही सुखात राहायचो
कधीतरी शेतमळे फुलायचे
तर पाऊस अवकाळी यायचा
तोंडी आला घास हिसकावून घ्यायचा
लेकराबाळांचीही तुला कधी दया आली नाही
वर आभाळाकडे पाहून पाहून डोळे कधी थकले नाही
आता कुठे काळेभोर ढग पाहून चेहरे हसले होते
रिमझीम पावसात हिरवे सपान पाहिले होते
आताही सारे हिरावूनच घेतले
डोळ्यादेखत सारेकाही वाहू घातले
शेतासाठी पाऊस मागितला तुझ्याकडे
तर त्याने डोळ्यातून पाणी आणले
सुखासुखी जगण्यावर घाव का घातले
देवा दुःखात राहुन सुखाचे जगणे तुला सहन होत नव्हते म्हणून
तू फक्त जखमाच देत होतास
सुखाचे जगणे येऊ पाहात असताना
तू दुःख देऊन पळालास
कळतात तुला वेदना तरी
तू जखमा देण्याचे थांबवत नाही
न्याय तुझ्याकडे नसला तरी
अश्रुंचा अभिषेक केल्याशिवाय तू पाऊस देत नाही
पाऊस येण्याचे सारेच अंदाज चुकतात
देवा काय तुझे नियोजन समजायचे
अरे उसण्या भाकरीवर किती दिवस जगायचे
कधीतरी आमच्यावरही तुझी कृपा होऊ दे
आमच्याही आयुष्यात नवचैतन्याची पहाट येऊ दे
