अंत प्रतिक्षेचा
अंत प्रतिक्षेचा
1 min
222
तुझ्याचसाठी जगते आहे
वाट पाहुनी थकते आहे
कोसळ ना रे गर्जत येथे
उकाड्यात या जळते आहे
ये ना उडवत तुषार ओले
कोरडीच मी रडते आहे
किती काळजी उरी करावी
वाट अजूनी बघते आहे
उंच आभाळ प्रकाशातले
प्रतिबिंब तुझे बघते आहे
अंगावरती घेना लोळण
स्पर्श मनी मी जपते आहे
रड एकदाच मांडीवरती
पापणीस मी पुसते आहे
आशेवरती डोळ्यांचीही
पात उगाची लवते आहे
मनास माझ्या घोर किती हा
पदर उराशी धरते आहे
अंत केवढा बघतो माझा
क्षणाक्षणाला स्मरते आहे
नकोच येऊ तिथेच राहा
उगाच का मी झुरते आहे?
