अमूल्य ठेवा मैत्रीचा
अमूल्य ठेवा मैत्रीचा
आयुष्यामध्ये प्रत्येकाला
मित्रांचा सहवास हवा,
कारण त्यांच्यासोबत असता
अंगात भरतो जोश नवा
असेच होते मित्र सहा ते
एकमेकांचे जीव की प्राण,
सुखदुःखांचे वाटेकरी ते
मैत्री त्यांची होती महान
काळामागून काळ उलटला
सर्वांनी संसार थाटला,
कित्येक वर्षे होऊन गेली
कोणी एकमेका न भेटला
अशीच अचानक एकेदिवशी
भेट जाहली सर्वांची,
जाणीव सार्यांना होऊ लागली
पुन्हा आपल्या तारूण्याची
अचानक एकमेकांना भेटून
सगळे हर्षोल्हासित झाले,
बर्याच दिवसानंतर सगळे
आनंदाने न्हावून गेले
संसाराचा गाडा हाकताना
सगळेच हैराण होऊन जातात,
मित्रांसोबतचे काही क्षण
अगणित आनंद देऊन जातात
एकांतामध्ये सर्वांना दिसतो
जीवनातला त्रासच त्रास,
पण मित्रांच्या सोबत असता
होतो सर्व दुःखांचा नाश
क्षणभर झालेल्या भेटीमधूनही
सर्वांना मिळाला आनंद नवा,
जीवनात सर्वांनी जपावा
अमूल्य असा मैत्रीचा ठेवा...
