अहंकाराची इंगळी
अहंकाराची इंगळी
अहंकाराची इंगळी
डसू नये कोणा कधी
वेगळाच अवतार
नको कोणा तशी व्याधी....!!
विनाकारणच करी गर्व
चारचौघात बढाया
मायबाप आश्रमात
पुढे पोरं जातं वाया.....!!
नाही दिसे सानथोर त्यास
करी गरिबांची चेष्टा
नाही क्षणाचा भरोसा
अंतसमयी हाल अपेष्टा....!!
काही नेणार सोबत
रित्या हाती प्राण जाई
जिता हाय तोवर का
कमावण्याचीच घाई.....!!
अहंकाराची ती इंगळी
ठेवी ना रे माणसात
माणसाची माणुसकी
राहील का या जिवनात...!!
अहंकार करी घात
जप आतातरी गुण
ठेव पाय जमिनीवर
फेड जन्मदात्याचे ॠण...!!
कधी ओळख भुकेला
कधी ओळख तान्हेला
मोहरूपी या जगात
कसा एकटा चालला.....!!
नाही भरवसा घडीचा
जीव पाण्यावरचा बुडबुडा
ठेव विश्वास नात्यांत
नको जाऊ देवू तडा.....!!
नको अहंपणा ठेवू
रहा नम्रता ठेवून
भलेभले गेले रिते
जगी जन्माला येवून....!!
डोळ्यावरची झापड
थोडी बाजूला तू सार
अहंपणा नको ठेवू
नको माणूस रे हार...!!
माणसात शोध देव
माणुसकीने थोडे वाग
मायबाप जन्मदाते
जरी आला तुला राग....!!
एक खिसा भरलेला
तर एक रिताच चालला
गुण शोधती शेवटी
किती होता माणूस भला....!!
अहंभावातच गेलं
सारं आजचे आयुष्य
कोणा समजेल काय
काय असेल पुढचं भविष्य....?
अहंपणा मोठी कीड
नाही त्यावर औषध
नम्रता खरा दागिना रे
तेच खरे आहे मध.....!!
नको गर्व अहंकार
ठेव साधीच राहणी
आहे वरच्याचीच नजर
आहे त्याचीच पाहणी....!!
