आठवणीतली माय
आठवणीतली माय

1 min

23.3K
माय थोडी अनोळखीच होती!
दाटलेला कंठ तिचा सांगत होता
ती दुःखाने ग्रासलेली होती
हातावरचे फोड मात्र तिच्या
कष्टाची उदाहरणे देत होती ।।१।।
माय थोडी अनोळखीच होती!
उन्हाने तापलेल्या रस्त्यावर तिची
अनवाणी पावले झपझप पडत होती
तीच तिच्या आयुष्याचा प्रवास
अभिमानाने जगाला सांगत होती।।२।।
माय थोडी अनोळखीच होती!
फाटकं लुगडं न् गळ्यातील पोथ्यांची माळ
मायेची गरीबी संकोचुन सांगत होती
पण कमरेवरचं लेकरू खदकन हसून
मायेच्या छायेची श्रीमंती सांगत होती।।३।।
माय थोडी अनोळखीच होती!
डोळ्यांत क्षणभर दाटले पाणी माझ्या
मी न दिसेपर्यंत तिला न्याहाळत होतो
मृगजळात हलणाऱ्या पाठमोऱ्या आकृतीत
मी मात्र खरंच माझी माय शोधत होतो।।४।।