आठवण
आठवण
येता आठवण तुझी
होई जीव वरखाली
कुठे गेलीस गे आई
तुझविन नाही वाली....!!
तुझा मायेचा गे हात
मऊ मोरपीस वाटे
आठवण येते तुझी
नित्य जीवनाच्या वाटे...!!
कसं लपवून ठेवू
सांग तुझ्या आठवणी
झाली मनाची काहीली
येई डोळा नित्य पाणी....!!
गणगोत गेलं सारं
दुरावली सारी माया
आईविन पोरं म्हणी
शेजारच्या त्या गं बाया...!!
तुझी वेणीफणी छान
जीव माझा गुंतलेला
का गेलीस गे सोडून
ध्यास तुझा उरलेला....!!
घट्ट नात्यांची ती वीण
तुझविण विणणार
तुझ्या आठवणी रोज
मला रोज छळणार.....!!
येई उरात धडकी
मन भरून येईल
आसुसल्या या जीवाला
कोण उसासा देईल....!!
तुझ्या आठवणी आई
आणी डोळ्यांत गे पाणी
किती मारू तुला हाक
किती करू विनवणी....!!
नित्य वाट मी बघते
कधी येणार गे आई
तुझ्याविणा मी एकटी
मन उदास गे होई....!!
कसा आला गे काळ
तुज घेऊनिया गेला
आठवणी हा उमाळा
वाटे विषाचा हा पेला....!!
