STORYMIRROR

Nasa Yeotikar

Others

3.8  

Nasa Yeotikar

Others

टीवी पाहिलेली आठवण

टीवी पाहिलेली आठवण

4 mins
8.4K


वीस-पंचविस वर्षा पूर्वीची गोष्ट आहे. त्या काळात कोणाच्या घरी लाइट नव्हते तर टीव्ही दूरची गोष्ट. रेडियो नावाची चालती बोलती वस्तू मात्र घरोघरी दिसून यायची. आकाशवाणी केंद्रचे अनेक चाहते होते. मात्र टीव्हीचे दिवाने अगणित होते. पण बघायला कुठे मिळायचे. ते दिवस आजही जशास तसे आठवतात. टीव्ही वर दर रविवारी "रामायण" मालिका चालू झाली होती. गावात कुणा कडे ही टीव्ही नव्हती, तेंव्हा तीन कि.मी. अंतरावर असलेल्या शेजारच्या गावात एका श्रीमंत व्यक्ती कडे टीव्ही होती. दर रविवारी न चुकता तीन कि.मी. पायी धावत पळत टीव्ही समोर जाऊन बसायचो. काही दिवसा नंतर खूप गर्दी होऊ लागली तर एक तास आधीच हजर व्हायचो. घरात मात्र कोणालाही याचा पत्ता लागू दिला नाही. मात्र एके दिवशी घरच्याना पत्ता लागलाच. त्याचे असे झाले की, ज्यांच्या घरी टीव्ही पाहायला जात असे तेच व्यक्ती एके दिवशी माझ्या घरी प्रकटले. बाबांची आणि त्यांची जुनी ओळख होती. त्याच ओळखीवर मी त्यांच्या घरात प्रवेश मिळविला होता. त्यांनी माझा विषय सरळ बाबांना सहज बोलता बोलता सांगून टाकले. झाले त्या दिवशी पासून माझे "रामायण" बंद झाले. माझ्यावर रविवारी कठोर पहारा होत होता. काय करावे सुचेना.
काही दिवसानंतर गावात एकाच्या घरी टीव्ही आली. तसे तीन कि.मी. पायी जाणारे आत्ता गावातच टीव्ही पाहण्यास जाऊ लागले. मी ही जाऊ लागलो. त्यांचे घर खूप मोठे होते. त्यामुळे लहान लहान मुले आम्ही सर्वात पुढे बसायचो आणि मोठी माणसे सर्वात मागे. आमच्या आजूबाजूला गावातील वयोवृद्ध आजी बसायच्या. टीव्ही वर राम किंवा सीता आल्या की ते हात जोडायचे आणि नमस्कार करायचे. मी मनात विचार करायचो की ते खरेखुरे राम-सीता नाहीत हात जोडायला. ते तर अरुण गोविल आणि दीपिका चिखलिया आहेत. पण कोण सांगणार त्यांना. मला रविवारची नेहमी प्रतिक्षा असायची. त्याच सोबत हे चालणारे चित्र कसे दिसतात? याची उत्सुकता पण असायची. या रामायण सोबत दर बुधवारी रात्री आठ वाजता प्रसारित होणारी "चित्रहार" याचेही आकर्षण होते. हे सुद्धा न विसरता पहायचो. क्रिकेट खेळण्याचा, ऐकण्याचा आणि पाहण्याचा भन्नाट शौक. बहुतांश वेळा शाळेला दांडी मारुन हे शौक पूर्ण केले. टीव्हीवर क्रिकेट मैच पाहता यावे यासाठी त्या घरातील मुलांशी मैत्री केली होती.
क्रिकेटच्या संघात त्या मित्राचा समावेश करण्यात आला. टीव्ही बघण्यासाठी त्याची प्रत्येक हट्ट पूर्ण केल्या जायचे. त्याच्या मनाविरुद्ध काही केले की टीव्ही पाहायला मिळायचे नाही या भावनेने आम्ही सर्व टीम त्रस्त असाय

चो. भारताचा क्रिकेट सामना असला की हमखास त्याच्या घरी दिवसभर बसून राहायचो. इकडे शाळा बुडली, अभ्यास बुडाले तरी काही देणे घेणे नव्हते. ही बाब घरच्याना शेवटपर्यंत कळू दिले नाही. वर्गात जेमतेम हुशार असल्या मुळे माझ्या घरा पर्यंत कधीच तक्रार गेली नाही. त्यावेळी सर देखील खूप छान होते. क्रिकेटचे वेड मात्र वर्षागणिक वाढत होते. मोठ्या संघात सहभाग घेऊन खेळू लागलो. गावात आमच्या संघाची चर्चा होऊ लागली. तेंव्हा घरात ही बाब कळाली तेंव्हा अभ्यास न बुडविता क्रिकेट खेळण्याची परवानगी मिळाली. लाईट नसेल तेंव्हा रेडियोवर समालोचन घरी ऐकत बसायचो. रस्त्याने येणारा जाणारा स्कोर विचारत असे आणि मी न थकता सांगत असू

टीव्ही पासून कसा दूर झालो? त्याचा एक अनुभव आपल्या सोंबत शेयर करायाला नक्की आवडेल
गावातील शिक्षण संपवून जवळच्या मोठ्या शहरात पुढील शिक्षणासाठी जाण्याची तयारी झाली. तेथे घरोघरी टीव्ही आहेत असे मी ऐकून होतो. त्यामुळे मनात लड्डू फुटू लागले होते की, आत्ता टीव्ही पाहायला मिळेल..! पण जेव्हा तेथे राहायला गेलो आणि जे अनुभव आले ते फार वाईट. गावात कोणाच्याही घरी डायरेक्ट जाता येत असे मात्र शहरात तसे करता येत नव्हते. कुणी ही आपल्या घरी टीव्ही पाहण्यास येऊ देत नव्हते. त्यामुळे माझी खरी पंचाईत सुरु झाली. रामायण, महाभारत, चित्रहार, आणि क्रिकेट हे सर्व मला पाहता येत नव्हते. रुमच्या शेजारी एक जोडपे होते, खूप मायाळू आणि प्रेमळ. त्यांच्याकडे अधुनमधून मी टीव्ही पाहू लागलो.
शनिवारी शाळेला दुपारी सुट्टी असायची. जेवण झाल्या नंतर थोडा वेळ अभ्यास करायचो. त्यानंतर सायंकाळी पाच वाजता मराठी चित्रपट चालू होत असे ते रात्री साडे सात पर्यंत चालत असे. असेच एका शनिवारी चित्रपट पाहण्यासाठी त्यांच्या घरी गेलो. रात्री साडे सात पर्यंत टीव्ही पाहून रूम वर परत आलो. पाहतो तो काय माझे वडील बंधू हजर. त्यांना पाहून मला खूप भीती वाटत होती. एव्हाना त्यांना कळले होते की मी टीव्ही पाहण्यास गेलो. त्यांनी मला खूप समजावून सांगितले. शेवटी एकच वाक्य म्हटले जे की मला आज ही आठवते " टीव्ही पाहायला खूप आयुष्य पडले आहे. आज अभ्यास केलास, मेहनत घेतलास तर पुढे पूर्ण जीवन टीव्हीच पहायचे आहे. पण आत्ता जर टीव्ही पाहत बसलास तर आयुष्यात तुला टीव्ही पाहता येणार नाही." त्यांच्या या बोलण्याने माझ्या मनावर खूप मोठा परिणाम झाला आणि मी नेहमीसाठी टीव्ही पासून दूर झालो.
खरेच टीव्ही चे आकर्षण लहानपणी वेगळीच असते नाही काय?


Rate this content
Log in