Sunita madhukar patil

Others

5.0  

Sunita madhukar patil

Others

स्वार्थी जगातील निःस्वार्थ प्रेम

स्वार्थी जगातील निःस्वार्थ प्रेम

6 mins
703


"मधुरा, अगं आवर लवकर, किती उशीर, पाहुणे येतच असतील..." आईचा आवाज ऐकताच मधुरा लगबगीने बाहेर आली..." हो गं आई, किती ही घाई, आणि आज काही विशेष घडणार नाही, नेहमीसारखे पाहुणे येणार मला पाहणार आणि नकार देऊन निघून जाणार... मधुरा आईला समजावण्याचा प्रयत्न करत होती... ती नेहमीप्रमाणे आज परत आईबाबांच्या आग्रहाखातर शोभेची बाहुली बनून लग्न नावाच्या बाजारात प्रदर्शनासाठी तयार होती...


मधुरा एका खेडेगावातील मध्यमवर्गीय कुटुंबातील हुशार संस्कारी आणि गुणी मुलगी... नावाप्रमाणेच मधुर आणि मितभाषी...सुंदर, बघताच क्षणी कोणीही तिच्या प्रेमात पडावं...

   देव सगळ्यांना सगळंच काही भरभरून देत नसतो... काहीतरी मागे शिल्लक ठेवतोच... सूर्य, चंद्रदेखील ग्रहणाच्या विळख्यातून सुटले नाहीत तर मानवी जीवनाचं काय घेऊन बसलात... मधुराच्या जीवनालासुद्धा पोलिओ नावाचं ग्रहण लागलं होतं... ती चार-पाच वर्षांची असताना साधं ताप आल्याचं निमित्त झालं आणि तिच्या एका पायातील शक्तीच नाहीशी झाली... तिच्या आईबाबांना तर काय करावं काहीच कळत नव्हतं, दुःखाचा डोंगरच त्यांच्यावर कोसळला होता... एकतर मुलगी आणि त्यात पोलिओ... राहून राहून तिच्या भविष्याची काळजी त्यांना सतावत होती... पण मधुरा मोठ्या धीराची निघाली... ह्या सगळ्या परिस्थितीवर मोठ्या जिद्दीने मात करत ती आज स्वतःच्या पायावर उभी होती...

  

वर्षभरापूर्वी डी.एड. केल्यानंतर गावातीलच सरकारी शाळेत प्राथमिक शिक्षकेची नोकरी तिला मिळाली होती... नोकरी करतच पुढील शिक्षण पूर्ण करायचं तिनं ठरवलं आणि म्हणूनच तिने बी.एड.ला प्रवेश घेतला होता... तिच्या आईबाबांना आता तिच्या लग्नाची काळजी वाटू लागली... काही चांगली स्थळं ही तिला सांगून आली पण प्रत्येक वेळी तिच्या सुंदरतेवर, तिच्या कर्तृत्वावर तिच्या अपंगत्वाने मात केली होती... तर काहींनी तिला तिच्या पोलिओ सोबत स्वीकारण्याची तयारी दाखवली पण हुंडा म्हणून भल्यामोठ्या रकमेची मागणी केली...

   आज ही मधुराला बघायला पाहुणे येणार होते... आणि घडलं ही तसंच मधुरा बोलल्याप्रमाणे पाहुणे आले, तिला बघितलं आणि नकार देऊन निघून गेले... तिलाही आता या सगळ्यांचा कंटाळा आला होता...

  

"आई, बसं झाल हं आता...इथून पुढे कोणी मला बघायला येणार नाही... नाही मला लग्न करायचं... ही कोण लोकं आहेत मला पसंद आणि नापसंद करणारे, मला नाकारणारे... नाही मला गरज लग्नाची, मी माझं अस्तित्व स्वतः निर्माण करीन, आणि दाखवून देईन या जगाला शरीराच्या सौंदर्यापेक्षाही माणसाचं कर्तृत्व, मनाची सुंदरता, संस्कार मोठे असतात... विचारांनी तो मोठा असतो... असल्या दुबळ्या, संकुचित विचारांच्या माणसांसोबत नातं जोडण्यापेक्षा मी एकटं राहणं कधीही पसंद करीन... मधुरा पोटतिडकीने आईबाबांना समजावण्याचा प्रयत्न करीत होती...

---------------------


     इकडे मोहन बऱ्याच दिवसापासून मधुराशी बोलण्याचा, आपल्या तिच्याबद्दलच्या भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न करीत होता... मधुराच्या शाळेत येण्या-जाण्याच्या वाटेतच त्याचं घर होतं... तो रोज तिला शाळेत येताजाता पाहात होता... लहानपणापासून तो तिची जिद्द, शिक्षणाबद्दलची आसक्ती, प्रतिकुल परिस्थितीवर मात करून केलेली जगण्याची धडपड हे सगळं बघत होता आणि तिच्या याच गुणांनी प्रभावित होऊन तो त्याच्याही नकळत कधी तिच्या प्रेमात पडला होता हे त्याचं त्यालाच समजलं नव्हतं... तो तिच्यावर मनापासून प्रेम करत होता... याच प्रेमाची कबुली देण्यासाठी तो धडपडत होता...

    मोहनला भीती होती ती तिच्या नकाराची, कारण दहावी नापास मोहन वडिलोपार्जित शेती करायचा... तो एक शेतकरी होता... दहावीत नापास झाल्यानंतर त्याने दोन वेळा परीक्षा दिली पण व्यर्थ... शिक्षणाच्या बाबतीत त्याचा हात थोडा तंगच होता... शिक्षणाचा नाद सोडून त्याने मग शेतीवर लक्ष केंद्रित केलं... आणि शेतीत त्याचा कोणी हात धरू शकत नव्हतं... तो जास्त शिकलेला नव्हता पण शिक्षणाचं महत्व तो जाणून होता...

   मधुराची आणि त्याची एकाच गावात राहात असल्यामुळे तशी तोंडओळख होती... तिला ही जाणवत होत की मोहन आपण शाळेत जायच्या वेळी किंवा परतण्याच्या वेळी वाटेत घुटमळतोय त्याला काहीतरी बोलायचं आहे पण तिने तिकडे दुर्लक्ष केलं...

   

एक दिवस हिम्मत करून त्याने तिच्याशी बोलण्याचा निर्णय घेतला... तो तिची वाट बघू लागला... ती दिसताच त्याच्या हृदयाची धडधड वाढू लागली..." मधुरा ऐक ना, मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे..." ती थांबली... त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघू लागली..." कुठून सुरुवात करू मला समजत नाही... कसं बोलू मला काही कळत नाही... शब्दांचे खेळ मला जमत नाहीत, मधुरा! म्हणून तुला स्पष्टच सांगतो तू मला खूप आवडतेस... मी तुझ्यावर खूप प्रेम करतो... मला तुझ्याशी लग्न करायचं आहे, मधुरा!

तिच्यासाठी हे सर्व अनपेक्षित होत...तिला काहीच सुधारेना.

ती घाबरली... आणि काहीच न बोलता तिथून निघून गेली... ती काहीच न बोलल्यामुळे मोहन विचारात पडला... त्या रात्री त्याला नीट झोपही नाही लागली... तिचं उत्तर काय असेल याचाच विचार तो करत होता...

  

इकडे मधुरालाही रात्रभर झोप आली नाही... लग्नासाठी तिला स्वतःहून कोणी विचारेल याची तिने कधी कल्पनाच केली नव्हती... तिला ही तिच्यावर दाखवलेली दया, सहानुभूती वाटत होती... तिला कोणाची सहानुभूती नको होती...

   दुसऱ्या दिवशी मोहन रस्त्यात तिची वाट बघत उभा होता... ती काहीच न बोलता पुढे निघून गेली... असे करत चार दिवस उलटून गेले... ती काहीच बोलत नाही हे बघून शेवटी न राहवून त्याने तिला विचारलं, "मधुरा! तुझं काय ठरलंय... मी तुझ्या उत्तराची वाट पाहतोय... काहीतरी बोल, असा जीव टांगणीला नको लावूस..." 

   "नाही मोहन मी तुझ्याशी लग्न नाही करू शकत...", ती म्हणाली. तो शांतपणे हसला आणि म्हणाला, "मला माहीत होत तु मला नकार देणार , अगं! तु एवढी शिकलेली , मी हा असा दहावी नापास , शेतकरी...तुला अजुन भविष्यात खुप प्रगती करायची आहे...नवीन यशाची शिखर गाठायची आहेत...तुझा आणि माझा मेळ कसा बसणार...हे माहीत असून ही मी स्वतःला तुझ्यावर प्रेम करण्यापासून नाही रोखू शकलो , गं !!! तुझी जिद्द , परिस्थितीशी चार हात करण्याची क्षमता यावर मी भाळलो आणि कधी तुझ्या प्रेमात पडलो हे मलाच समजलं नाही...पण एक गोष्ट लक्षात ठेव शेवटच्या श्वासापर्यंत मी तुझ्यावर प्रेम करीत राहीन..." एवढं बोलून तो आल्या पावली निघून गेला...

   "असं नाही रे मोहन मला फक्त कोणाची सहानुभूती नको होती... कोणाच्या दयेवर मला जगायचं नव्हतं... आत्तापर्यंत लग्नासाठी फक्त नकारच ऐकत आले होते... त्यामुळे खरं काय खोटं काय काहीच कळत नव्हतं रे! म्हणून तुझं खरं प्रेम मी ओळखू नाही शकले... तुझ्या डोळ्यातले भाव मला वाचताच नाही आले रे!", म्हणत ती रडू लागली... पण हे ऐकण्यासाठी मोहन तिथं नव्हता...

 

दुसऱ्या दिवशी शाळेत जाताना तिची नजर मोहनला शोधत होती... पण तो काही तिच्या नजरेस पडला नाही... असे बरेच दिवस निघुन गेले पण तो काही तिला दिसला नाही... राहून राहून ती त्याचाच विचार करत होती... आता तिची बेचैनी वाढत चालली होती... तिच्या डोक्यातून त्याचे विचार जातच नव्हते... जवळपास महिना उलटून गेला होता... आता काहीही करून तिला त्याला भेटायचं होतं... नकाराची बोचणी किती तीव्र असते हे तिला माहीत होतं... आणि याच बोचणीतून तिला त्याला बाहेर काढायचं होतं... तिने त्याच्या घरी जाऊन त्याला भेटायचं ठरवलं आणि एक दिवस शाळेतून परतताना त्याच्या घरी पोहचली...

   तिला पाहताच त्याच्या चेहऱ्यावर एक तेज झळकलं... पण क्षणातच ते नाहीस झालं..."तू का आली आहेस इथे... त्याने विचारलं..." मोहन, अरे कुठे आहेस तू... मागील एक महिन्यापासून तुला भेटण्यासाठी वेड्यासारखी तडफडतेय मी... त्या दिवशी तू तुझ्या भावना व्यक्त करून निघुन गेलास... मला बोलण्याचा एक मौका पण दिला नाहीस..." मधुरा रडतरडत बोलत होती..." आता बोलण्यासारखं काय शिल्लक आहे... तू मला नकार दिलास आणि तुझा निर्णय मला मान्य आहे... मला कोणतंही नातं तुझ्यावर जबरदस्ती लादायचं नाही... माझ्यामुळे तुला त्रास झालेलं मला आवडणार नाही..." मोहनला तिचा रडवेला चेहरा पाहवत नव्हता..." अरे आतापर्यंत सगळे माझ्याकडे सहानुभूतीच्याच नजरेने बघत होते आणि मला जगण्यासाठी सहानुभूतीच्या कुबड्या नको होत्या... तू ही माझ्यावर दया दाखवतोयस अस मला वाटलं... माझ्यासारख्या पोलिओ झालेल्या अपंग मुलीला कोणी स्वतःहून मागणी घालेलं याचा मी कधी विचारच नव्हता केला, रे! आणि कुणी घातलीच तर त्या बदल्यात त्यांना हुंडा म्हणून मोठी रक्कम हवी असायची... या सगळ्यामुळे मी तुझं निःस्वार्थ प्रेम नाही ओळखू शकले...

  

मी मागील एक महिन्यापासून तुझा विचार करतेय... उच्चशिक्षित, संकुचित बुद्धीच्या लोकांपेक्षा तू विचारांनी मोठा आहेस... तुला माझ्यापेक्षा कितीतरी चांगली मुलगी मिळाली असती पण तू मला माझ्या दोषांसोबत स्वीकारायची तयारी दाखवतोयस. एवढी विवेकबुद्धी, निःस्वार्थीपणा आजच्या स्वार्थी जगात कोणाकडे नसतो म्हणून तू ही मला आता आवडू लागला आहेस, मोहन!!! मधुरा व्यक्त होत होती आणि मोहन फक्त एकटक तिच्याकडे पहात होता..." काय!! काय म्हणालीस तू..." मोहनचा त्याच्या कानावर विश्वास बसत नव्हता..." हो, मोहन तूही मला आवडू लागला आहेस..." मधुरा परत म्हणाली...

   "म्हणजे हा अडाणी दगड तुला पसंद आहे." मोहनच्या डोळ्यात आंनदाश्रू तरळले..." अरे! दगडातूनच देवाची मूर्ती घडते आणि तिला देवत्व प्राप्त होतं... पण मी तुला देवाची उपमा नाही देणार कारण मला देव नको आहे... मला हवा आहे विश्वासाने माझा हात हातात घेणारा, प्रेमाने माझी साथ देणारा एक जीवनसाथी... आयुष्याच्या या वाटेवर मला तुझा सोबती बनायला आवडेल..." मधुराने आपलं मन मोकळं केलं होतं... मोहनने पुढे होऊन तिचा हात हातात घेतला आणि दोघेही रडू लागले... त्यांच्या अश्रूत सगळी नकारात्मकता, कडवटपणा वाहून गेला आणि दोघांचीही मनं स्वच्छ निर्मळ बनली...  


स्वार्थी जगापासून दूर निःस्वार्थ प्रेमाच्या विश्वात हरवलेले दोन जीव पाहून नकळत माझ्या ओठी दोन ओळी आल्या...

   

शेवटच्या श्वासापर्यंत तुझी साथ असावी।

मनमंदिरात माझ्या तुझ्या प्रीतीची ज्योत जळावी।।

नाते तुझे माझे असावे जन्मजन्मांतरीचे।

दूर कुठेतरी क्षितिजापलीकडे विश्व दोन जीवांचे।।  


Rate this content
Log in