‘स्व'चा शोध...
‘स्व'चा शोध...


स्वतःला कुठेतरी हरवून जाण्याआधीच
स्वतःतल्या 'स्व' ला होतं शोधायचं
वाटा मिळत गेल्या अनेक
पण नेमका शोध कशाचा
हेच नेमकं मागे विरून गेलं...
मन लपंडाव खेळत राहिले...
'स्व'च्या वर्तुळाभोवती
पण खेळवणाऱ्या जाणत्या खेळाची
न जाणे कुणास ठाऊक
सुरुवात कळलीच नाही
अंत मात्र एवढ्यात आलाही...!...?
मी विचारले अंताला...
आणखी काही क्षण थांबला असतास
तर शोधला असता तो एक बिंदू
अंत मिश्किलीने उद्गारला...
सुरुवातीचा विचार करतांना
अंतालाही घेतलं असतं थोडं पारखून
तर दोन्हींचंही मिळालं असतं उत्तर
थांबायचं नेमकं कुठं
सुरुवातीच्या क्षणातच शोधलं असतंस...
मग विचारलं मी स्वतःला...
आता...दोन्हीही पारखे झाले का मला...?
अंतर्मन खंबीर होतं तसं...ते उत्तरलं...
बघ...निरागस आहे तुझं मन
एक संधी 'स्व' लाही देऊन बघ...
नव्याने सुरुवात नव्या सुरुवातीनिशी करशील
तर अंतही मनासारख्या घडवून आणशील...!